गाढव कुठला!

>> शिरीष कणेकर

अमका तमका गाढव आहे, असं आपण सर्रास म्हणतो. हे गौरवोद्गार नक्कीच नसतात. बिनडोक या विशेषणाला गाढव हा मानवनिर्मित प्रतिशब्द आहे. आपल्या नावाचा शिवीसारखा उपयोग केला जातोय याची गाढवाला खेदयुक्त जाणीव असेल का? बिनडोक माणसाला थेट बिनडोक म्हणणं हे पुरेसं नाही का? त्यातून बोलणाऱयाचा तिरस्कार समोरच्या द्विपाद गाढवापर्यंत आय मीन माणसापर्यंत पोहोचत नाही का? वाक्युद्धात गाढवाला मधे आणण्याचे काय कारण? अन् सगळे प्राणीमात्र सोडून गाढवच का? त्यानं काय घोडं मारलंय? बाकीचे प्राणी (उदा. बोकड, कांगारू, रेडा, अस्वल…) हे बुद्धीचे मेरूमणी वाटतं? गाढवावर हा घोर अन्याय का? गाढवाला राग आला तरी ते दुगाण्या झाडण्यापलीकडे काय करू शकतं? कुंभारदेखील आपल्या गाढवाची बाजू घेताना दिसत नाही. सगळेच जण गाढवाला बेवारशी सोडतात. माझी (चार पायाच्या) गाढवाला सहानुभूती आहे. यावर माझा जाड चष्मेवाला मित्र छद्मी हसत म्हणतो, ‘असणारच. गाढवाची गाढवाला सहानुभूती नसेल तर कोणाला असेल? तुझ्या भूमिकेवरून एवढंच कळतं की तुम्ही गाढव एकमेकांना धरून असता. हॅ हॅ हॅ!’

इंग्लिशमध्येही ‘सो ऍण्ड सो इज ऍन ऍस’ (म्हणूजे अमूक तमूक गाढव आहे) असं म्हणतात. इंग्लिश गाढवाला आपल्याला हिंदुस्थानी गाढवाच्याच खुंटाला बांधून ठेवल्याचा राग येत असेल का? इथं पंक्तिभेद येतो का? कुठल्याही देशातील गाढवं एकमेकांशी गाढवाच्याच भाषेत बोलत असतील का? हिंदुस्थानातील व पाकिस्तानातील गाढवं सामोपचारानं बोलण्यासाठी आमनेसामने आली तरी विरुद्ध दिशेला तोंड करून एकमेकांना लाथा घालतील का? की हिंदुस्थानी गाढव ‘यापुढे कुठलीही आगळीक सहन केली जाणार नाही’ अशी पोकळ धमकी देईल?

एकदा एकजण ‘दारूचे दुष्परिणाम’ यावर लेक्चर देत होता. बोलता बोलता तो म्हणाला, ‘एका बालदीत पाणी व एका बालदीत दारू ठेवले तर सांगा, गाढव कुठे जाईल?’

“पाण्याच्या बालदीकडे’’ पाठीमागून आवाज आला.

“असं का?’’ वक्त्यानं विजयी सुरात विचारलं.

“कारण ते गाढव आहे.’’ उत्तर आले.

एका इंग्लिश ‘फ्रेजेस’च्या पुस्तकात ‘बॅरीडान्स ऍस’ असा वाकप्रचार आहे त्याचं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे – बॅरीडान नावाच्या कुंभाराकडे एक गाढव होतं. एकदा या गाढवापासून समान अंतरावर, पण विरुद्ध दिशांना त्याचं खाणं ठेवलं होतं. गाढवाला कळेना की कुठं जावं. दोन्हीकडे त्याचं मन ओढ घेत होतं. मग त्यानं काय केलं, तो एका दिशेनं चार पावलं जायचा. मग मन बदलून तो दुसऱया दिशेनं चार पावलं जायचा. पुन्हा पहिल्या दिशेनं. पुन्हा दुसऱया दिशेनं असं दिवसभर चालू राहिलं. कुठल्याच एका टेबलापाशी जाऊ न शकल्यानं अखेर त्या गाढवाचं उपासमारीनं निधन झालं. म्हणून निर्णय घेऊ न शकणाऱया माणसाला ‘बॅरीडान्स ऍस’ म्हणतात. माझ्या एका मित्राचं असंच झालं होतं. व्हिस्की प्यावी की रम हे त्याला कळेचना. एकदा हात व्हिस्कीकडे जायचा, लगेच त्याला रम खुणवायची. तो रमकडे वळला की व्हिस्की कॉलरला धरून त्याला आपल्याकडे खेचायची. हे असं पहाटेपर्यंत चाललं होतं. बाकीचे मस्तपैकी आपलं आपलं पेय घशाखाली उतरवत होते. माझा मित्र ‘बॅरीडान्स ऍस’चा चुलत भाऊ होण्याच्या बेतात होता. पण हे गाढव बुद्धिमान होतं. त्यानं सुवर्णमध्य शोधून काढला. त्यानं व्हिस्की व रम एकत्र करून ढोसले. त्याला लगेच चढली व तो (मागले) दोन पाय झाडू लागला.

तुम्ही मान्य कराल की, गाढव हा अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे. गाढवानं कुणाचा जीव घेतलाय अशी एकही दुर्घटना जगाच्या पाठीवर घडलेली नाही. गाढवं कुत्र्यांप्रमाणे चावत नाहीत (व त्यामुळे पोटात एकवीस इंजेक्शन्स घ्यावी लागत नाहीत.) मांजरांप्रमाणे बोचकारत नाहीत, वाघ-सिंहाप्रमाणे खात नाहीत, हत्तीप्रमाणे पायदळी तुडवत नाहीत, डुकरांप्रमाणे मुसंडी मारून सुळय़ांनी भोसकत नाहीत, सापांप्रमाणे विषारी दंश करीत नाहीत, अजगरांप्रमाणे गिळत नाहीत. तुम्ही गाढवाच्या जवळून गेलात तरी ते ढुंकूनही तुमच्याकडे पाहात नाहीत. वरातीत तुम्ही घोडय़ावर बसता म्हणून गाढव कधी ‘जेलस’ होत नाही की संतापानं लाथा घालत नाही. त्याबद्दल कृतज्ञ रहाणं दूरच राहिलं, पण माणूस गाढवाला मूर्ख, बेअक्कल, बिनडोक म्हणतो आणि तशा अवगुण संपन्न माणसाला गाढव म्हणतो. वा रे वा! गाढवात मूर्ख, बेअक्कल व बिनडोक गाढवाला माणूस म्हणत असतील का?…

मी पेपरात वाचलं, जयेश शहा नावाचा गुजराथी उद्योगपती त्याच्या मर्सीडिजमधून सुरतहून मुंबईला आला. सोबत त्याची बायको व मुलगी होती. त्याची मुलगी साइली हिला न्यूयॉर्कच्या कॉलेजात प्रवेश मिळाला होता. ती व्हिसा इंटरह्यूसाठी मुंबईला आली होती. इंटरह्यू झाला. ती पास झाली. तिला व्हिसा मिळाला. त्या आनंदात देवाचे आभार मानायला ते सिद्धिविनायकाकडे निघाले. वाटेत त्यांना इंजिनातून मांजराच्या पिल्लाचा आवाज ऐकू आला. त्यांनी गाडी थांबवून बघितलं आत कुठेतरी खनपटीत मांजराचं पिल्लू अडकलं होतं. ते तिथं कसं पोहोचलं हेच त्यांना कळेना. त्याला बाहेर काढण्याचे निष्फळ प्रयत्न केल्यावर जयेशनं मॅकॅनिकला बोलावलं. त्यानं सांगितले की, हे काम मर्सडिजच्या मॅकॅनिक करू शकतो. त्याला पाचारण करण्यात आलं. बॉनेट उघडून गाडीचे काही पोर्टस् काढल्यानंतरच त्या भेदरलेल्या पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवानं त्याच्या अंगावर साधा ओरखडाही उमटला नव्हता. या सगळय़ा प्रकारात काही तास गेले. सिद्धिविनायक राहून गेलं. नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम. पिल्लाचा जीव वाचवणे जास्त महत्त्वाचं होतं.

यावर आपण काय म्हणणार? – गाढव कुठला!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या