शिरीषायन – तलत नावाचं मोरपीस

>> शिरीष कणेकर

सुरुवातीलाच कबूल करतो (कबूल करायला हा काय गुन्हा आहे की प्रमाद?) की तलत मेहमूदच्या आवाजाला मर्यादा होत्या. सो व्हॉट! तशा माझ्या लेखनालाही मर्यादा आहेत. पण तरी तुम्ही मला आपलं मानलं आहेच ना? तलत, मुकेश (आणि मी) यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ का म्हणू नये? हा विनोद झाला. आता मुद्दय़ाकडे वळतो.

माझ्याच एका पंचवीस-तीस वर्षे जुन्या लेखाच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकून मी उरीची भावना बोलून दाखवतो –

‘परमेश्वरानं माणसाला दिल दिलं आणि मग या दिलाला पाझर फोडण्यासाठी, रडवण्यासाठी नि रक्तबंबाळ करण्यासाठी तलत मेहमूद नावाचं मोरपिशी शस्त्र्ा अवनीवर धाडून दिलं. दर्द हा तलतच्या गाण्याचा आत्मा आहे. कारुण्य हे त्याच्या आवाजाचं मर्म आहे. तागडी घेऊन सूर तोलणाऱया बनियांसाठी किंवा स्वरांचं विच्छेदन करणाऱया मुडदेफरासांसाठी ही हळवी, हळुवार, रुलानेवाली कातर चीज नाही. हा खास दिलवाल्यांचा सवतासुभा आहे. आयुष्याचा काटेकोर हिशेब मानणाऱया बुद्धिवादी कारकुंडय़ांना इथे मज्जाव आहे.’

पराभूत प्रियकराची विफल दास्तान तलतच्या आवाजात गहिरी होऊन ठणकू लागते. ‘मेरा करार ले जा’ अशी तो प्रार्थना करतो. ‘शामे गमकी कसम’ तिला देऊन बघतो. ‘कहाँ हो कहाँ मेरा जीवन सहारे’, असा टाहो फोडतो. ‘तुम्ही बताओ कहाँ छुपे हो के हर जगहपे मै ढूंढ आया’ अशी विनवणी करतो. ‘मेरा प्यार मुझे लौटा दो’ असा रडवेला त्रागा करतो. तरीही ती येत नाही. ‘कम से कम तुम मेरा उजडा हुवा घर देख तो लो’, अशी मनभरणीदेखील व्यर्थ जाते. ती अजूनही येईल अशी वेडय़ा मनाला खोटी आशा लावणाऱया ओढीला तो ‘दो राहा’मध्ये हात जोडून सांगतो, ‘अब तो मेरा दामन छोड दो बेकार उम्मीदो, बहुत कुछ सह लिया मैने, बहुत दिन जी लिया मैने.’ सारं संपलं. तो म्हणतो, ‘गये जिंदगी का यार न मिला कोई सहारा.’ अजूनही त्याला शिकवा आहे, ‘किस्सा है मेरी बरबादी का और शोक से दुनिया सुनती है.’ त्याचा आसमानवाल्याकडे शिकवा आहे, ‘मौतही दे दे के अब शिकवा जबाँपर आ गया’…
सैगलप्रमाणे गायक-नट होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. मुकेशप्रमाणेच ती फसली. भारतीदेवीबरोबरचा ‘समाप्ती’ हा त्याचा पहिला बंगाली चित्रपट पडला. ‘दिल-ए-नादान’, ‘वारिस’, ‘डाकबाबू’, ‘रफ्तार’, ‘एक गाव की कहानी’ व ‘सोने की चिडिया’ हे त्याचे सर्व चित्रपट पडले. ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूरमे गाते है’ या विचारसरणीला तो कवटाळून बसला व उदबत्तीसारखा विझून गेला. त्यानं चित्रपटांना कधी संगीत दिले नाही. पण संगीतकार म्हणून नाव न देता त्यानं ‘तुमने ये क्या सितम किया’, ‘गमे आशिकी से कहे दो’, ‘गुनगुनाने हुवे गाते हुवे’, ‘बहारे जिस्मो जाँ है’ या गैरफिल्मी गीतांना चालीत बांधलं.

तलत पाकिस्तानात गेला असताना त्याला विचारण्यात आलं, ‘नूरजहान हिंदुस्थानातच राहिली असती तर लता मंगेशकरला भारी पडलं असतं ना?’

‘नाही’. तलत ताडकन् म्हणाला, ‘नूरजहानला भारी पडलं असतं.’

तलतचं उत्तर पाकिस्तान्यांना रुचलं नव्हतं. लता शतकातून एकदा होते, अनिल विश्वास हा सर्वश्रेष्ठ संगीतकार होय व सी. रामचंद्र हा राजा माणूस होता, या तीन श्रद्धांपासून तो अखेरपर्यंत तसूभरही ढळला नाही. दिलीपकुमारपासून राजेश खन्नापर्यंत व व्ही. शांतारामपासून शशी कपूरपर्यंत सर्वांसाठी ‘सूट’ होणारा आपला आवाज एकाएकी ‘मिस्फिट’ कसा झाला हेही त्याला अखेरपर्यंत कळले नाही. तो कोणाला विचारायलाही गेला नाही. ‘आज मेरा मन बीन बजाये’, ‘नाच मेरे मन नाच’, ‘ये खुशीका समा’ ही उडती, नाचरी गाणी तलतनं गायली खरी, पण त्यात तो रमलाय असे वाटत नाही.

मी निवडलेल्या तलतच्या सर्वश्रेष्ठ गाण्यांत मी त्याच्या अनेक उत्कृष्ट रचनांचा समावेश करू शकलो नाही. दहाच्या यादीत काय काय घेणार? या गाण्यांवर एक नजरा टाका – ‘ये हवा ये रात’ (‘संगदिल’ – सज्जाद), ‘एक मै हूँ’ (‘तराना’ – अनिल विश्वास), ‘के आज फिर मेरा दिल’ (‘गुनाह’ – रोशन), ‘जाये तो जाये कहाँ’ (‘टॅक्सी ड्रायव्हर’-एस. डी. बर्मन), ‘जब किसीके रूखपे’ (‘अनमोल रतन’ – विनोद), ‘ऐसे टूटे तार’ (‘गवैय्या’ – राम गांगुली), ‘मै पागल’ (‘आशियाना’ – मदन मोहन), ‘जिंदगी देनेवाले सुन’ (दिले नादान’ – गुलाम महंमद), ‘ऐ गमे दिल’ (‘ठोकर’ – सरदार मलिक’), ‘मेरी यादमे तुम ना’ (‘मदहोश’- मदन मोहन), ‘मुहोब्बत तर्क की मैने’ (‘दो राहा’ – अनिल विश्वास), ‘गर तेरी नवाजिश’ (‘गुलबहार’ – खय्याम), ‘सपनों की सुहानी’ (‘शिकस्त’ – शंकर-जयकिशन), ‘खडा हू देरसे’ (‘अलिफ लैला’ – श्यामसुंदर).
तलतबरोबर एक युग संपलं. एका भावयात्रेचा अंत झाला. या यंत्रयुगातील एका आर्त भावनेचा चेंदामेंदा झाला. आजही त्याच्या उमेदीच्या काळातील गाणं कुठून कानावर आलं की गलबलून येतं. वाटतं त्याला म्हणावं, म्हण रे म्हण, ‘दो राहा’मधलं साहिर लुधियानवी लिखित अनिलदाचं गाणं…

‘तेरा खयाल दिल से मिटायॉ नही अभी
बेदर्द मैने तुझको भुलाया नही अभी ।।धृ।।
कल तूने मुस्कुराके जलाया था खुद जिसे
सीनेका वो चराग बुझाया नही अभी ।।धृ।।
गर्दन को आज भी तेरी बाहोंकी याद है
चौखट से तेरे सरको उठाया नही अभी ।।धृ।।
बेहोश होके जल्द तुझे होश आ गया
मै बदनसीब होश मे आया नही अभी ।।धृ।।

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या