मासळी खाणार त्याला देव देणार

>> शिरीष कणेकर

उशाशी माशांची टोपली नसेल तर कोळणीला झोप येत नाही असं म्हणतात. कोळणींना आपल्या समोरच्या मासळीची, पुरुष ग्राहकांची व आपली स्वतःची किंमत बरोबर कळलेली असते. हेमा मालिनी आईला बरोबर घेऊन फिरायची तशा या तरण्याताठ्या कोळीणी म्हाताऱ्या कोळीणींना घेऊन मच्छी बाजारात बसतात. एरवी त्यांचं तिथं काय काम? आमच्या सिटीलाइट मार्केटमध्ये फाटकापाशी (आय मीन, एंट्रीलाच) काही म्हाताऱ्या- आय मीन वयस्कर महिला, आय मीन हेमा मालिनीच्या आया – टोपलीत चिंबोऱ्या घेऊन बसतात. ‘‘लाखेच्या आहेत का?’’ असं विचारणाऱ्या चोखंदळ गिऱ्हाईकांची वानवा असल्यानं त्या तशा निवांत बसलेल्या असतात. जणू मंत्रालयातील कारकून बाया. चिंबोरीचं (म्हणजे खेकडे रे, नामुरादांनो!) कालवण बनवणं हे बापट-देवधर-गोरे यांचं काम नाही (खाणं हे मात्र यांचंच काम). ती मक्तेदारी कायस्थ व सारस्वतांची. बरं, खायचीय चिंबोरी तर खा ना; प्रत्येक वेळेला ‘‘थंडीच्या दिवसांत औषधी असतं.’’ या पोकळ समर्थनाची काय गरज आहे? कोणासमोर देत असता ते? तुमच्याबरोबर नळीतलं मास कौशल्यानं अलगद काढणारे तुमच्या घरातीलच असतात ना? मग तुम्हाला अपराधी का वाटतं? चिंबोरी खाताना अपराधी वाटतं तसं पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, बोंबील, कोळंबी, निवटे, हलवा ओरपताना का वाटत नाही? हे वाचल्याक्षणी गुप्ते, अधिकारी, ताम्हाणे, गडकरी, चित्रे आणि कर्णिक यांच्या घरातील रणरागिणी नवऱयाच्या मागे भुणभुण लावतील, ‘अहो, श्रावण संपला. जाताय ना फिश आणायला? तोंडाची चवच गेलीय.’’ पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्या-त्या घरातील बापूसाहेब, नानासाहेब, आप्पासाहेब चप्पल सरकवून, पिशवी घेऊन धाडधाड जिना उतरतील.

श्रावणात मटण-चिकन चालत नाही, पण काही निवडक लोकांना फिश मात्र चालतं. चालतं म्हणजे यांनीच ठरवलं की, चालतं म्हणून. म्हणजे श्रावणही पाळला गेला व फिशही हादडता आलं (साप भी मरे और लाठी भी न टूटे!). तुम्ही अस्सल खाणाऱ्याला ‘इन अॅक्शन’ पाहिलंय? ते फिशचा ‘काटा काढतात’ तेव्हा तो धुतल्यासारखा दिसतो. काही लोक तर ‘‘पृथ्वीवर जा आणि फिश खा’’ असा देवानं आदेश दिल्यागत खात असतात. ते मच्छी मार्केटमध्ये आले की, थरार पसरतो. मृत मासेदेखील क्षणभर डोळे किलकिले करून बघतात. आज आपल्याला याच्या पोटात सद्गती मिळणार आहे तर!

विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या ताटात रोज देवाचा मत्स्यावतार नसेल तर त्यांना जेवणात माती कालवल्यासारखं व्हायचं. त्यांच्या जेवणातील आवडीनिवडींविषयी सांगताना त्यांच्या सौभाग्यवती कौतुकानं म्हणाल्या होत्या, ‘‘सणावारी व न खायच्या वारी हिंदू धर्माच्या नावानं बोटं मोडत. ते हॉटेलात जेवायला जायचे.’’

पु. ल. देशपांडे हे दुसरे मराठी सारस्वत असेच मत्स्यप्रेमी. त्यांनी एकदा त्यांच्या अनुपम शैलीत लिहिलं होतं, ‘‘मरणोत्तर माझा देह समुद्रात टाकावा. ज्या माशांवर मी आयुष्यभर गुजराण केली त्यांना एक दिवस तरी माझ्यावर ताव मारू दे.’’

चिंबोरीवाल्या दोन-तीन कोळीणींच्या पुढे काही कोळणी कोळंबींचे छोटेखानी डोंगर करून शोकाकुल मुद्रेनं बसलेल्या असतात. जणू त्या कोळंबींच्या निधनाचा शोक करीत असतात. ‘‘घे दादा कोळंबी’’ त्या शोकाकुल मुद्रेत किंचितही फरक न करता म्हणतात.

‘‘मला बाधते.’’

‘‘बाधते तर पांढरी कोळंबी घे. ती नाही बाधत.’’

पांढऱ्या कोळंबीचा भाव व माझा हलका खिसा यांची सांगड घालत मी विचारमग्न उभा होतो तो मागून आवाज आला, ‘‘विचारदेखील करू नका. तुमच्या दोन प्रयोगांचं मानधन पांढऱ्या कोळंबीच्या एका वाटय़ात जाईल.’’

मी चमकून मागे वळून पाहिले. जयवंत दळवींची गोजिरी मूर्ती उभी होती.

‘‘तुम्हाला पांढऱ्या कोळंबीचा भाव माहित्येय की माझं प्रयोगाचं मानधन किती कमी आहे कळलंय?’’ मी म्हणालो, दळवी हसत हसत भिंगीचा पाला, मुडदुशा, शिवण्या किंवा अशाच कुठल्यातरी ‘अनवट’ मासळीच्या मागे गेले असावेत.

‘‘घे – घे, ताजा आहे रावस, बायको खूश होईल.’’ कोळीण मला म्हणते.

बायकोला खूश करणं इतकं सोपं नसतं हे तिला कोण सांगणार? मी दहा रावस घरी घेऊन गेलो तरी म्हणेल की, बाबा पंधरा घेऊन यायचे.

माझे मित्र म्हणतात की, शिरीषला म्हातारचळ लागलाय. म्हणूनच वाटतं, मी उत्साहानं ‘बाजार’ आणायला निघालो की, बायको ठामपणे म्हणते, ‘‘नको’’!…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या