टिवल्या-बावल्या : बाशिंगबळ

>> शिरीष कणेकर

नवरात्र संपले, दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘उठा, मोरेश्वरपंत. जागे व्हा यदुनाथ. मध्यानीचा सूर्य तळपायला लागलाय. तुमची रात्रीची झोप आता तरी आवरा. हा लाचार बाप तुमच्या विनवण्या करतोय.’

‘आधी सांगा, हे अभूतपूर्व मार्दव व आर्जव तुम्ही बोलण्यात कुठून आणलंत?’ मोऱ्यानं आळोखेपिळोखे देत विचारले.

‘तुझी आई म्हणत होती की मोऱ्याचं आता लग्न करायला हवं. तुम्ही त्याला योग्य मान देऊन त्याच्याशी योग्य त्या आदरानं वागा. तुम्ही ‘मोऱ्या गाढवा’ म्हणत राहिलात तर त्याची वधूही त्याला गाढवा म्हणूनच हाक मारायला लागेल. ते बरं दिसेल का? माझं म्हणणं होतं की गाढवाला वेगळ्या मानवी नावानं हाक मारणं हा गाढवाचा अपमान नाही का? पण तुझ्या आईशी कोण वाद घालणार?…’

‘आता कळलं, मी स्वतःला ‘ममाज बॉय’ का म्हणवून घेतो ते? तिलाच माझी काळजी. तुम्ही फक्त लाथा घालता आणि गाढव मात्र मी. मोऱ्या फुरंगटून म्हणाला. अशा वेळेला तो गाढवापेक्षा उभ्यानं झोपणाऱ्या घोडय़ासारखा जास्त दिसतो असं मोरूच्या बाबांचं अव्यक्त मत होतं. मोरूच्या आईच्या भीतीपोटी ते व्यक्त व्हायला धजावत नव्हते. मागे एकदा ते त्यांच्या सासूला मगर की घुबड म्हणाले होते. तेव्हाचं मोरूच्या आईचं रणचंडिकेचं रूप अद्याप विसरलेले नव्हते. सासरेबुवांनी मात्र चोरून, लपून कुजबुजत्या आवाजात त्यांचं अभिनंदन केलं होतं.

‘लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते, नवरदेव?’

‘हाच तुमचा प्रॉब्लेम आहे, बाबा.’ मोरू पडल्या पडल्या कूस बदलून म्हणाला, ‘शिक्षणाचा आणि लग्नाचा अर्थाअर्थी काही संबंध आहे का? तसं असतं तर अशिक्षितांची लग्नच झाली नसती. लग्नाला उभं राहण्यापूर्वी विद्यापीठाचं पदवी प्रमाणपत्र सादर करावं लागतं हे तुम्हाला कोणा (दुसऱ्या) गाढवानं सांगितलं? तुम्हाला लॉजिक हा विषय नव्हता वाटतं? आई सांगत होती की कॉलेजात तुम्ही पुढल्या गेटनं आत जायचात आणि तसेच मागल्या गेटनं बाहेर पडायचात?’

‘माझं चारित्र्यहनन करणं एवढंच काम तुझ्या आईला आहे.’ मोरूचा बाप वैतागून म्हणाला.

‘असंच काही नाही. ती उत्तम स्वयंपाकही करते शिवाय तिनं आता माझं लग्नही काढलंय.’

‘निकम्या मुलाचं लग्न.’

‘निकम्या बापाच्या गुणी मुलाचं लग्न. करेक्ट युअरसेल्फ.’

‘बरं, लग्नाच्या आधी काही नोकरीधंदा असणं तुला गरजेचं वाटत नाही का?

‘नाही बुवा.’ मोरू बिछान्यात उठून बसत म्हणाला, ‘तशी अट सरकार, न्यायालये, पोलीस, सामाजिक संस्था, स्त्री संघटना कोणीच घालत नसतात. म्हणजेच नवऱ्या मुलाची बेकारी ही त्याच्या लग्नाच्या आड येत नसते. फक्त त्याचे जन्मदाते वडील नसती खुसपटं काढून त्याला विरोध करू पाहतात.’

‘वधुपक्षानं हे प्रश्न उपस्थित केले तर?’

‘तुम्ही वधुपक्षाच्या बाजूनं बोलणी करायला येणार आहात वाटत? हा असला उरफाटा ‘स्टँड’? तुम्ही घरभेदी आहात. आपल्याच पोटच्या पोराच्या भावी वैवाहिक सुखात तुम्ही विष कालवायला निघालायत. शेम ऑन यू.’ मोरू तावातावानं म्हणाला.

‘तू मुलीचं पोट कसं भरणार?’ संताप आवरत मोरूच्या बापानं विचारलं.

‘कोणत्या मुलीचं?’

‘अरे गा।़।़, मुलीचं म्हणजे बायकोचं. आता कोणाच्या बायकोचं तेवढं विचारू नकोस. तुला स्वतःचं पोट भरता येत नाही तर तिचं कसं भरणार, असं मी विचारत होतो.’

‘मी कशाला तिचं पोट भरायला पाहिजे? आई भरेल. माझंही पोट आईच भरते. जेवायला एक ताट जास्त घ्यायचं. आहे काय आणि नाही काय!’

मोरूचा बाप मोरूकडे थक्क होऊन बघत राहिला. नुकतंचं जन्मलेलं दुपटय़ात गुंडाळलेलं तान्ह बाळ मोठं होऊन मोऱ्या होईल असे तेव्हा त्याच्या बापाला चुकूनही वाटलं नव्हतं.
‘तुमची पोरंही तुझी आई पोसेल, सांभाळेल, वाढवेल आणि शिकवेल असंच की नाही? त्यांची फक्त ताटं घ्यायची. आहे काय आणि नाही काय!’

‘बरोबर. आता कळलं तुम्हाला. मलाही आता कळलं की तुमचा जन्म झाला तेव्हा एक कुजकट मूल जन्माला आलंय असं अवघा मोहोल्ला का म्हणत होता ते. जरा बाजूला व्हा. मला जाऊ द्या. मला आईशी लग्नाविषयी तपशिलात बोलायचंय. तिला सायली कशी वाटते हेही विचारायचंय. तुम्हीदेखील वाटलं तर सायलीच्या बाबांबरोबर ‘बार’मध्ये बोलू शकता…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या