शिरीषायन 29 – मोठ्यांच्या छोट्या गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

चित्रकला व गणित या दोन विषयांची मला जन्मजात अॅलर्जी आहे. या दोन विषयांना माझी जन्मजात अॅलर्जी आहे, असंदेखील म्हणता येईल. मला एक रेषा सरळ मारता येत नाही (नो वंडर, पोरींवर लाइन मारण्यात मी इतका पराकोटीचा अपेशी ठरतो. त्यांना कळायचंच नाही की ही लाइन आहे. एकीला तर वाटलं होतं की, गंडेरी विकायला आलोय). गणितात पास झाल्याशिवाय माणूस एसएससीचा अडसर ओलांडू शकत नाही हे कळल्यावर मी अंतिम परीक्षेत काठावर का होईना, पास झालो.

चित्रकाराच्या रूपानं चित्रकला माझ्या आयुष्यात मागल्या दारानं चोरासारखी येईल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं. (स्वप्नात मला पंधरा रुपयांची पगारवाढ मिळायची व मी त्याचा वडापाव खायचो). दत्तात्रय पाडेकर हे ते कुंचलाधारक, जे चपला बाहेर काढून माझ्या मनमंदिरात प्रवेशमान झाले. (चित्रकार व गायक कायम झब्बा-पायजमा का घालतात? झब्बा-पायजमा घातल्यावर आपण चित्रकार आहोत की गायक हे त्यांना कसं कळतं?).
ते वाचक-फॅन म्हणून मला प्रथम भेटले (असावेत). आमचं काय असतं की, कोणी वाचक फॅन म्हणून भेटलं की, आमच्या लेखी त्याला दुसरं काही अस्तित्वच नसतं. स्वतःचं स्वतंत्र असं कर्तृत्वच नसतं. त्याची गरजच नसते. ‘‘मेरा बच्चा है, मेरा बच्चा’’ असं आम्ही ‘कभी खुशी कभी गम’मधल्या फरिदा जलालप्रमाणे म्हणत राहतो, पण यथावकाश मला कळलं की, हा बच्चा त्याच्या क्षेत्रात बापमाणूस होता.

दत्तात्रय पाडेकर हे नाव चित्रकलेच्या (फाइन आर्ट, अप्लाईड आर्ट, ग्राफिक, पेंटिंग यातले फरक विचारू नका. चपाती आणि भाकरीतला फरक मला कळत नाही. सासू आणि बायको यात जास्त तोंडाळ कोण आहे हेही मला सांगता येणार नाही) प्रांतात कान पकडून घेतलं जातं हे कळल्यापासून मी त्यांच्याशी बोलताना कानाची पाळी पकडूनच बोलतो. लोक म्हणतात, माझा कान कोणी कानपटीत मारल्यासारखा लाल झालाय.

पाडेकरांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आळे या खेडेगावात झाला. भलंमोठं एकत्र कुटुंब, पन्नासएक माणसं तरी असतील. घरची शेती. मुबलक गुरंढोरं. नुसती मेंढरंच साठ होती (म्हणूनच ‘माणसापरीस मेंढरं बरी’ हे पाडेकरांना लहानपणीच कळलं होतं). एवढी माणसं एका घरात मावणं शक्यच नव्हतं. स्त्रिया घरात झोपत- विशेषतः पावसाळ्यात. पुरुष मंडळी व मुलं शेतात झोपडीत झोपत. कसंतरी निभावून नेत.

‘‘किती माणसं अंदाजे शेतात झोपायची?’’ मी विचारलं. मला सगळं थ्रिलिंग वाटत होतं.
‘‘सदतीस’’ पाडेकर शांतपणे म्हणाले. काही केल्या ते चित्र माझ्या डोळ्यांपुढे येत नव्हतं.

पाडेकरांच्या दोन थोरल्या चुलतभावांनी शाळेत पंगा घेतला. या प्रकारानं पाडेकरांच्या वडिलांनी धसका घेतला. त्यांनी छोट्या दत्तात्रयला पॅक केले व शिक्षणासाठी गुजरातमध्ये बिलिमोरिया येथे पाठवून दिले. पाडेकर तिथं मॅट्रिक झाले, पण त्यांना चित्रकला या एकमेव विषयात गती होती. त्यांचे शिक्षक, मार्गदर्शक, गुरु भिपूभाई पटेल यांच्या सांगण्यावरून त्यांनी डीटीसी (ड्रॉइंग टीचर सर्टिफिकेट) कोर्स केला. ते पहिल्या वर्गात पास झाले. त्यानंतर पहिला वर्ग (व अनेकदा पहिला नंबर) त्यांनी कधीच सोडला नाही. त्यांनी गुजरातेत ‘फाइन आर्ट’च्या चार परीक्षा, मुंबईत ‘अप्लाइड आर्ट’च्या चार परीक्षा व नंतर पुन्हा गुजरातमध्ये ‘आर्ट मास्टर’ (अर्थातच पहिल्या वर्गात) केलं.

आतेभाऊ शिवाजी लोंडे व शिक्षक जसूभाई नायक यांच्या आग्रहावरून पाडेकरांनी मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. तिथं सगळेच वांदे होते. टाय लावलेले शिक्षक त्यांनी प्रथमच पाहिले (तत्पूर्वी ‘कंठलंगोट’ बघितलाच नव्हता.) इंग्रजीतून शिकवला जाणारा एक शब्दही त्यांना कळत नव्हता. डोक्यावर फिरणाऱ्या पंख्यांकडेही ते आश्चर्यानं बघत राहायचे. सहामाही परीक्षेत रिवाजाप्रमाणे ते पहिले आले. शिकवलेलं काही न कळता जर आपण पहिले येऊ शकतो, तर काहीच प्रॉब्लेम नाही हे त्यांच्या मनानं घेतलं. त्याच ‘जे. जे. स्कूल’मध्ये ते शिक्षक झाले. ते चक्क मराठीतून शिकवायचे. त्यांचं शिकवणं विद्यार्थ्यांना कळायचं, पण तरीही त्यांच्यातून कोणी पाडेकर निर्माण नाही झाला.

बऱ्यापैकी गट्टी झाल्यावर मी पाडेकरांना म्हणालो, ‘‘मला चित्रकला शिकवाल का?’’
नंतर काय झालं कळलं नाही. पाडेकर गायब झाले, फरारी झाले, परागंदा झाले. बेल्जियममध्ये लपून बसले असतील. आता मी पेपरात खालीलप्रमाणे जाहिरात देणार आहे.

‘श्री. दत्तात्रय पाडेकर यांस,
असाल तसे नेसत्या पायजम्यावर निघून या. तुम्हाला कोणी चित्रकला शिकवायला सांगणार नाही. तुमच्या कलेचे भोक्ते व अनेक मेंढरं तुमची वाट बघताहेत. लहानपणी तुम्ही खोडकर होतात, आजही आहात. फरक असला तर तो एवढाच की, तेव्हा तुम्ही अर्ध्या चड्डीत खोडय़ा करायचात, आता पायजम्यात करता. लवकर परत या. पायजमे तुमची वाट पाहतायत.
तुमचा,
(चित्रकार) शिरीष कणेकर

[email protected]