सेंद्रिय शेतीतील विरोधाभास

>> श्रेणिक नरदे

शेतीचा कस राखला जावा, उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला जातो. मात्र हे मुद्दे पटवून देताना परंपरागत शेती पद्धतीबाबत कॅन्सरसारख्या आजारांची भीती दर्शवली जाते. जे अत्यंत चुकीचे आहे. सेंद्रिय शेती पद्धतीत सध्याच्या घडीला अनेक त्रुटी आढळून येतात. शेती हा व्यवसाय म्हणून करणाऱया शेतकऱयासाठी यातील व्यावहारिकता आणि उत्पादकतेचं गणित जुळवणं केवळ कठीण असतं.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सातत्याने कोल्हापूर जिह्यातील शिरोळ तालुक्याविषयी कॅन्सरसंबंधी अफवेला ऊत आलं. वेगवेगळय़ा माध्यमांतून, समाज माध्यमातून या बातमीरूपी अफवा पसरायला सुरुवात झाली आणि हळूहळू राज्यभर नव्हे तर देशभर हा मुद्दा चर्चेला आला.

ती अफवा अशी की, शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे 34 हजार रुग्ण आढळल्याचं वारंवार सांगितलं जाऊ लागलं. काही माध्यमांनी तर पार 60 हजार कॅन्सरग्रस्त रुग्ण असल्याच्या बातम्या दिल्या. वारंवार या बातम्या बघताना, ऐकताना, वाचताना आश्चर्य वाटू लागलं. जरी हा आकडा फुगवून सांगितला असला तरी आपण साधारण 20 हजार जरी रुग्ण धरले तर तालुक्यात 55 गावे. मग प्रत्येक गावात किमान 350 कॅन्सर रुग्ण आढळायला हवे होते. मात्र प्रत्यक्षात तसं काही चित्र आढळलं नाही.

सुरुवातीला स्वतःहून आम्ही एक सर्व्हे केला तर 20 हजार लोकसंख्येच्या गावात 12 कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळले. त्यावरून हा आकडा काही फारसा नसल्याचं लक्षात आलं होतं. तालुक्याच्या आरोग्य विभागाला विचारणा केली असता त्यांनी घरोघरी आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हे करणार असल्याचं सांगितलं. या सर्व्हेनंतर आकडा आला तो 242 रुग्णांचा अधिकृत आकडा जाहीर केला गेला. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीहून अत्यंत कमी असल्याचंही सांगितलं गेलं. ही माहिती सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱयांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने आम्ही एक पत्रकार परिषद आणि शेतकरी-ग्राहक परिषद घेऊन ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न केला.

असत्य आणि भडक अफवा या जोरदार पसरतात. तशीच ही कॅन्सरची अफवा संबंध देशभरात पसरली होती. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं कालांतरानं लक्षात आलं आणि तज्ञांनी, डॉक्टरांनीसुद्धा काहीही तथ्य नसल्याचं मान्य केलं.

ही अफवा पसरत असताना शेतकऱयांची नाहक बदनामी होत होती. जे अफवा पसरविणारे लोक होते त्यांनी कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या वापरावर आक्षेप नोंदविला होता. जो खोटा होता. आजही देशभरात सेंद्रिय शेती गटाकडून ही अफवा राजरोसपणे पसरविली जाते. कीटकनाशक फवारल्याने आणि रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेला शेतमाल खाल्ल्याने कॅन्सर होतो, अशी अफवा अनेक मोठी मंडळी बिनदिक्कतपणे पसरवीत असतात. मात्र कोणत्याही शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी याबाबत काहीही आक्षेप नोंदवलेत असं आढळलं नाही.
हिंदुस्थान देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या आजच्यापेक्षा निम्मी होती, तरी आपला देश या लोकसंख्येचं पोट भरेल इतकं अन्नधान्य उत्पादित करू शकत नव्हता. परकीय धान्य आणि अन्नावर आपल्या देशाला अवलंबून राहावं लागत होतं. तिथला निकृष्ट दर्जाचे आयात करून आलेलं धान्य रेशनिंगवर आपली जनता खात होती.

आज आपण आपल्या पोटाची गरज भागवून परकीय देशांत आपला शेतमाल निर्यात करून त्यातून परकीय चलन मिळवून अर्थव्यवस्था बळकट करण्यात आज हिंदुस्थानातील शेतकरी योगदान देत आहे. पण या विकासाच्या, उत्पादन वाढीच्या चक्राला कुठेतरी खीळ घालण्याचं काम समाजातील काही मंडळी आणि घोर पर्यावरणवाद्यांकडून होत आहे.

सेंद्रिय शेती करण्यासाठी कोणतंही बंधन आपल्या राज्यात नाही तरी शेतकरी सेंद्रिय शेती का करत नाही? शेतकरी दरवर्षी महागडी नव्या वाणाची किंवा संकरित बियाणे का घेतो? महागडी खते का विकत घेतो? या प्रश्नांमध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात गाढव मेहनत कमी करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट शेतकऱयांचं असतं. ते सेंद्रिय शेतीने साध्य होत नाही म्हणून शेतकरी सेंद्रिय शेती करत नाही. विषमुक्त अन्न अशी एक टर्म कॉइन केली गेली आणि त्याखाली विविध आजारांची भीती पसरवली. यातील तथ्य जाणून घेऊया.

एका फवारणी पंपाची क्षमता 15-20 लिटर एवढी असते. त्यामध्ये जास्तीत जास्त 20 मि.लि. कीटकनाशक म्हणजे 1 लिटर पाण्यात 1 मि.लि. कीटकनाशक. संपूर्ण एक लिटर औषध शेतकरी एका रोपावर, वेलीवर किंवा भाजीच्या पुंजक्यावर फवारत नाही. एका सेकंदापेक्षा कमी वेळात एका रोपाची फवारणी होते. मग त्यावर कितपत विष असेल, याचा साधा विचारही ही मंडळी करताना दिसत नाहीत. एक ग्रॅम पेक्षाही कीटकाचं वजन कमी असतं. तिथं मनुष्य जिवाचं वजन हे किलोमध्ये असतं.

शेतकरी तो भाजीपाला साधारण आठवडय़ाने नेतो, या काळात ऊन, वारा, पावसाचा परिणाम, त्यानंतर शेतकरी भाजी धुतो, तो शेतमाल बाजारात येतो, किरकोळ व्यापारी त्यावर परत पाणी शिंपडतो, त्यानंतर ती भाजी ग्राहकाकडे येते, ग्राहक ती भाजी निवडतो, परत धुतो, शिजवितो. या सगळय़ा प्रक्रियेत त्यात विषाचा किती अंश शिल्लक राहतो, तर काहीच राहत नाही. जरी राहिला तर त्याचं प्रमाण नगण्य असतं. त्यातून मनुष्यास धोका सहसा होत नाही. ही सत्य परिस्थिती आपल्या डोळय़ांसमोर आहे. तरी काही मंडळी ही उंदराला हळकूंड सापडावे आणि त्यानं त्याचं दुकान थाटावे अशी ही विषमुक्तची दुकानं थाटली गेलेत, जाताहेत याचा सुशिक्षित, शहरी वर्गातील आणि समाजातील जाणकार मंडळींनी नोंद घेणे गरजेचे आहे.

रासायनिक खतांबाबतीतही शेतकरी वर्गात प्रबोधन होऊन, सूक्ष्म सिंचनातून आवश्यक तितकीच खते माफक प्रमाणात सोडली जातात. शेतजमिनींची काळजी ही त्या शेतकऱयाला इतर कुणाहीपेक्षा जास्तीची असते. आज शेती करणारी पिढी ही लिहिता-वाचता येणारी असून ती सुशिक्षित आहे. तिला आपले, आपल्या जमिनीचे, आपल्या ग्राहकवर्गाचे हित कशात आहे याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे शेतीची चिंता भलत्याच लोकांनी वाहण्यात तसा काही विशेष अर्थ नाही.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतमालाचे उत्पादन वाढले. आवक वाढल्यानंतर दर कमी होणे हा बाजारपेठेचा नियमच आहे. प्रत्येक पिकाला हमीभावाचे संरक्षण देणे आज रोजी किंवा कधीही शक्य होईल असे वाटत नाही. हमीभावाची मागणी करणारे लोक अर्थनिरक्षर असतात आणि त्यातून परत आधुनिक तंत्रज्ञानाला शिव्याशाप देणारी मंडळी पुढे येते. त्यांचं मत असं असतं की, उत्पादनवाढीमुळे दर पडला, मग या तंत्रज्ञानाचा फायदाच काय?

हा दोष तंत्रज्ञानाचा नसून तो आपल्या देशात राबविल्या जाणाऱया कृषी धोरणांचा आहे. आजही आपला देश तेलबिया, खाद्यतेल, डाळी यांची मोठय़ा प्रमाणावर आयात करतो. हे उत्पादन देशांतर्गत होऊ शकतं. मात्र व्यवस्थेतील लोकांच्या निरुत्साहामुळे शेतकऱयाला त्या पिकांचं उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात अपयश येतं. त्यामुळे शेतकरी फायदेशीर पिकांकडे वळतो आणि तिथंला बाजार घसरतो. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा दोष नसून तो धोरणांचा आहे.

आजही आपला देश प्रक्रिया उद्योगात मागे असून शेतमालावर प्रक्रिया झालेल्या गोष्टींसाठी आपल्याला परकीय देशांवर विसंबून राहावं लागतं. यासाठी दगडफेक, रास्ता रोको, चक्काजाम, उपोषण, सक्ती किंवा बंदी करून हे प्रश्न सुटणार नाहीत. प्रक्रिया उद्योग जसे कापड गिरण्या, तेल गिरण्या, कारखाने उभारून ते चालवून सुबत्ता आणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा विरोध करून काहीही साध्य होणार नाही.

(लेखक प्रयोगशील शेतकरी आहे.)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या