समन्वयातून करू आपत्तींवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास एस. औंधकर

केवळ हवामान काय असेल याचा अंदाज आता पुरेसा नाही तर जीवन आणि उपजीविका वाचवण्यासाठी पुढील हवामान कसे असेल, याची माहिती देणारी प्रभावी व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी हवामानातील धोक्यांची पूर्वसूचना उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते.

बदलत्या हवामानाचा परिणाम आता जगाच्या अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. वातावरण, हवामान आणि पाण्यामुळे होणाऱ्या घटनांचे प्रमाण अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत. लोकसंख्येची वाढ, वाढलेले शहरीकरण आणि मोठय़ा प्रमाणात झालेला पर्यावरणाचा ऱ्हास यामुळेच अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय हवामानशास्त्र आणि जलविज्ञान सेवा, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विकास संस्था यांच्यातील अधिक समन्वयातून आपण या आपत्कालीन परिस्थितीत उत्तम तयारी अथवा प्रतिबंध करू शकतो. यासाठी योग्य वेळी, योग्य ठिकाणी कृती करण्यास तयार असणे आणि सक्षम असणे हे अनेक लोकांचे जीव वाचवू शकते.

दरवर्षी जागतिक हवामान दिवस हा 23 मार्च 2022 रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे आपत्तीची ‘लवकर सूचना आणि लवकर कृती’ आणि येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जलवातावरण आणि हवामान माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे ठरते.

बदलते हवामान आणि लोकसंख्या वाढ हे खूप मोठे आव्हान आहे. मौल्यवान पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नैसर्गिक, मानवनिर्मित अशा आपत्तींशी सामना करणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील नवकल्पना या सर्वात प्रभावी उपायांपैकी एक. उपग्रह आपत्ती पूर्वसूचना प्रणालीचा वापर करून येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करणे, आपत्कालीन नियोजन आणि सज्जता, आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापन आणि त्यानंतरच्या पुनर्स्थापनेच्या प्रयत्नात खूप आवश्यक आहे. अंतराळ युगाची सुरुवात झाल्यापासून अनेक देशांनी आपापले आधुनिक उपग्रह अंतराळात पाठवलेले आहेत. याद्वारे दररोज हवामान व वातावरणविषयक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. आपत्ती व्यवस्थापन उपग्रह बुद्धिमत्तेच्या वापरामुळे सरकार, स्थानिक अधिकारी, आपत्कालीन सेवा आणि पर्यावरण संस्थांना फायदा होऊ आहे. उच्च अवकाशीय आणि हाय रिझोल्युशन सॅटेलाइट फोटोंमुळे जंगलात लागणाऱ्या आगीपासून ते येणाऱ्या महापुराबाबत आता आपत्तीच्या वेळेआधीच माहिती मिळत असल्याने आता याला आपण प्रभावी प्रतिसाद देत आहोत. उपग्रहाकडून मिळत असलेल्या माहितीकडून येत असेलल्या आपत्ती संदर्भात इत्थंभूत हवामान व वातावरणाची निरीक्षणे केली जातात आणि याच्या धोक्याची आणि तीव्रता लक्षात घेऊन मूल्यांकन करायला सोपे जाते. आपत्तीनंतरही आपत्तीचा प्रभाव किती होता आणि झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच नुकसानीचा विमा दाव्याचे प्रमाणीकरण करण्यात खूप मोठी मदत मिळते.

नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना देणारी डॉपलर रडार यंत्रणा

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे तीव्र वायुमंडलीय घटना घडत आहेत, जसे की चक्रीवादळे आणि तीव्र गडगडाटी वादळे, गारपीट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे मालमत्तेचे आर्थिक नुकसान आणि मानवी जीवनाचा मोठा नाश होतो आहे. या घटना आपल्या देशात वारंवार घडत आहेत. म्हणूनच, येऊ घातलेल्या आपत्तीचा धोका कळण्यासाठी या धोकादायक वातावरणीय प्रणालीला समजावून घेणे खूप आवश्यक आहे. यासाठी गेल्या चार दशकांमध्ये, रडारच्या उत्क्रांतीनंतर, हे तंत्र हवामान व वातावरण प्रणाली शोधण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी एक संभाव्य साधन म्हणून उदयास आले आहे. विविध प्रकारच्या डिस्प्लेसह एकत्रित उच्च शक्तीचे एस, सी, आणि एक्स-बँड डॉपलर रडार, हवामान व वातावरण प्रणालीच्या गुणात्मक अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहेत. एकूण पर्जन्यमानाचे परिमाणात्मकाचे मापन घेणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे अचानक पूर येण्याचा, गारपिटीचा अंदाज लवकर येतो. डॉपलर रडार प्रणाली ही वातावरणातील इतर परिमाणांसोबत एकत्रितपणे तपासून घेतली जाते. आपल्या हिंदुस्थानातील तिन्ही समुद्री किनारपट्टीवर वादळे-चक्रीवादळे शोधणारे रडारचे पुरेसे नेटवर्क आहे, जे आपत्ती व्यवस्थापनाच्या उद्देशाने गेल्या दोन दशकांपासून प्रभावीपणे काम करत आहे. मात्र देशातील मध्यवर्ती भागात गेल्या काही वर्षांपासून गारपीट व ढगफुटीसारख्या घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. महाराष्ट्रात सद्यस्थितीत मुंबईच्या कुलाबा येथील नेव्हीनगर व नागपूर येथे अत्याधुनिक डॉपलर रडार यंत्रणा उभारण्यात आली असून लवकरच राज्यात संभाजीनगर, सोलापूर व रत्नागिरी येथे ही यंत्रणा बसविणार आहेत.

एक्स-बँड डॉपलरची मागणी मंजूर

नोव्हेंबर 2021 मध्ये मराठवाडा आणि एकूणच मराठवाडय़ासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळावी यासाठी संभाजीनगर येथे एक्स-बँड डॉपलर रडार बसविण्यात येणार आहे. या रडारमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे तसेच मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांतील भूभागातील हवामानाचा अचूक अंदाज घेणे सोपे जाईल. अशा प्रकारचे डॉपलर रडार सरकारतर्फे बसवण्यात येत असल्याने, यातून उपलब्ध होणारा डाटा चोवीस तास पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असावा. जेणेकरून सर्व दिवशी शेतकऱ्यांना हवामानाचा /आपत्तीचा अचूक अंदाज देता येईल.

डॉपलर रडार कसे कार्य करते

डॉपलर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर गेल्या चाळीस वर्षांपासून केला जातो आहे. डॉपलर रडारद्वारे विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडल्या जातात. ढगांना धडकून परत परतणाऱया लहरी ढगांची ‘एक्स रे’प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉपलर रडारद्वारे ढग सरकत असतानाचीही अचूक माहिती मिळवता येते. डॉपलर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. 350 किलोमीटरपर्यंतच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एक तास आधी 100 टक्के खात्रीपूर्वक सांगता येते. तसेच परतीचा पाऊस आता सुरू होईल, डॉपलर रडार यंत्रणेने तो कोठे आणि किती होईल याची माहिती मिळाल्यास, प्रशासनाला आपत्कालीन अलर्ट देणे शक्य होईल आणि जीवित; तसेच वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होईल. एकूणच या वर्षीच्या जागतिक हवामान संघटनेच्या येणाऱया जागतिक हवामान दिवसाच्या ‘आपत्तीची – लवकर सूचना आणि लवकर कृती’ या संकल्पनेला खूप महत्त्व प्राप्त होते.
(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत)
[email protected]