
>>शुभांगी बागडे
जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत आणि तेवढीच प्रचंड इच्छाशक्ती या जोरावर नियतीने पारड्य़ात टाकलेली संकटे कशी दूर करता येतात आणि उत्तुंग ध्येय कसे साध्य करता येते याचा चालता बोलता आदर्श म्हणजे इल्मा अफरोज.
हौसले जिनके अकेले चलने के होते है,
एक दिन उनके पीछे ही काफिले होते है.
या ओळी सार्थ करणारा इल्मा अफरोज या मुलीचा प्रवास. देशाच्या सुरक्षेची धुरा हाती घेणाऱ्या आयपीएस ऑफिसर इल्माच्या मागेपुढे आज पोलिसांचा ताफा असतो; पण कधीकाळी याच इल्माने ‘एकला चलो रे’ म्हणत घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली होती. उत्तर प्रदेशातील कुंदरकी हे इल्माचं गाव. गाव छोटं असलं तरी इल्माने स्वप्नं मात्र मोठी बघितली. मुख्य म्हणजे या स्वप्नांच्या पूर्तीसाठी लागणारे संघर्षाचे, चिकाटीचे आणि जिद्दीचे पंखदेखील तिच्याकडे होते. तल्लख बुद्धी आणि हुशारी तर जन्मजातच होती. त्या जोरावर आणि नियतीने मार्गात टाकलेले संकटांचे काटे बाजूला करीत इल्मा गेल्या वर्षी ‘इल्मा अफरोज, आयपीएस’ बनली. 2018 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जे 990 यशवंत ठरले त्यात इल्माचा क्रमांक होता 217. कुंदरकी गावातील एका छोटय़ा शेतकऱयाच्या या मुलीचा हा प्रवास जेवढा थरारक तेवढाच स्फूर्तीदायक आहे. जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत आणि तेवढीच प्रचंड इच्छाशक्ती या जोरावर नियतीने पारड्य़ात टाकलेली संकटे कशी दूर करता येतात आणि उत्तुंग ध्येय कसे साध्य करता येते याचा चालता बोलता आदर्श म्हणजे इल्मा अफरोज. शेतकऱ्याची मुलगी आयपीएस ऑफिसर बनली, पण या दोन शब्दांच्या अल्याडपल्याड अनेक सुखदुःखांनी, काटेरी वाटांनी, जिद्द आणि सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या संघर्षाने तिची सोबत केली. कुंदरकी येथील इल्माचं कुटुंब छोटंसंच. वडील छोटे शेतकरी. शेतातून मिळणाऱ्या मिळकतीतून गुजराण होत असल्याने हौसमौजेला वाव नव्हता, पण सुपीक मातीत रुजणारा कोंब जसा कशालाच न जुमानता फुलतो, मोठा होतो तसंच इल्माचं झालं. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिचं पितृछत्र हरपलं. इल्माच नंतर कुटुंबप्रमुख बनली. अर्थात ती हे दुःख कवटाळीत बसली नाही. ती खंबीरपणे उभी राहिली. 14 वर्षांच्या इल्माने शेतात काम करायला सुरुवात केली. सोबत मुलांच्या शिकवण्या घेणं, दुसऱयांच्या शेतात राबणं हेही चालूच होतं. दुसरा पर्यायच नव्हता. हे करताना शिक्षण थांबतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण हार मानेल ती इल्मा नव्हेच याच धारणेनं ती चालत राहिली. यापूर्वी आईवडील आणि भाऊ हेच इल्माचं जग होतं. इतर कोणाहीपेक्षा आपल्या अब्बूवर इल्माचा खूप जीव होता आणि अब्बूही तिची खूप काळजी घेत. प्रसंगी तिचे केसही विंचरत. म्हणूनच वडिलांचं नसणं स्वीकारताना इल्माने लांब वाढलेल्या केसांनाही कात्री लावली. वडील आणि मुलगी या नात्याचं केव्हढं हे भावपूर्ण रूप! या प्रतिकूल परिस्थितीतही इल्माचे उच्च शिक्षणाचं ध्येय जराही डळमळीत झालं नाही. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत गावातच तिनं बारावीचा टप्पा पार केला. पुढे दिल्लीतील स्टीफन महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला आणि शिक्षणाचे आकाशच तिच्यासाठी जणू खुले झाले. त्याला गवसणी घालण्याइतकी बुद्धी, चिकाटी, संघर्ष करण्याची इच्छाशक्ती इल्माकडे होतीच. त्याच जोरावर तिने शिष्यवृत्त्या मिळवत उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठांचे उंबरठे ओलांडले. ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश हा तर तिच्यासाठी सुवर्णक्षण ठरला. पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क, जकार्ता अशा विविध ठिकाणी तिने शिक्षण घेतले. क्लिंटन फाऊंडेशनसाठीही तिने काम केले. हे करीत असताना छोटय़ा-मोठय़ा नोकऱया, दुकानांमध्ये सहाय्यक, शिकवणी असा तिचा संघर्षही सुरूच होता. मात्र हिंदुस्थानच्या मातीची ओढही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. इथे येऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचं स्वप्न तिला खुणावत होतं. इल्मानं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण झालं नाही असं नियतीलाही मान्य नसावं. इल्मा हिंदुस्थानात आली. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात गेल्या वर्षी अव्वल यशही मिळवलं. देशसेवा करण्याची ही संधी मिळाल्याचं समाधान तिला आहे. एवढं यश मिळवूनही तिची साधी राहणी आणि विचारसरणी बदललेली नाही. संघर्षमय यश संपादन करणाऱ्यांसाठी इल्मा आज एक रोल मॉडेल बनली आहे. स्त्री आणि स्त्रीत्व यांना कमी लेखणाऱ्यांसाठी इल्मा अफरोज हा एक धडा आहे. देश-विदेशात फिरूनही इल्माला येथील मातीचा सहवास हवासा वाटतो, शेतात राबण्यात आनंद वाटतो. इल्माचा हा ‘कुंदरकी ते आयपीएस व्हाया ऑक्सफर्ड’ हा प्रवास फक्त चकीत करणारा नाही, तर परदेशी शिक्षणात, तेथेच स्थायिक होण्यात धन्यता मानणाऱ्या आणि स्त्रियांच्या पंखांमध्ये बळ नसते असे म्हणणाऱ्यांच्या डोळय़ांत अंजन घालणारा आहे. सावित्रीच्या लेकींचा हा प्रवास अर्थातच निरंतर चालणारा आहे. इल्मा अफरोज ही या मार्गावरील एक ‘माइलस्टोन’ ठरली आहे.



























































