प्रासंगिक – जैन धर्माचा आत्मा : पर्युषण पर्व

>> सुभाषचंद्र सुराणा

भगवान महावीर यांच्यासारख्या 24 तीर्थंकरांनी स्वतःच्या आत्मशुद्धीने, तपोबलाने तसेच समता, क्षमा व संयमी जीवनाने आत्मबलाच्या जोरावर मोक्षमार्ग मिळवून सुखी जीवनाचा मार्ग दाखविला आहे. आत्मकल्याण, अहिंसा व चरित्र जीवनशैली जैन धर्माचा प्राण आहे, तर पर्युषण पर्व हा जैन धर्माचा आत्मा आहे.

हिंदुस्थानात अनेक उत्सव मोठय़ा उत्साहाने, भक्तिभावाने दरवर्षी साजरे होत असतात. जैन श्वेतांबर धर्मीयांचे पर्युषण पर्व यंदा 12 ते 19 सप्टेंबर या काळात संपूर्ण देश-विदेशात भक्तिभावाने साजरे केले जात आहे.या पर्युषण पर्वाचा अखेरचा सर्वात मोठा सण व विशेष महत्त्वपूर्ण दिवस ‘जैन संवत्सरी पर्व’ म्हणून ओळखला जातो. सालाबादप्रमाणे जैन संवत्सरी पर्वाचा अखेरचा दिवस हा गणेश चतुर्थीच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही हा दिवस आज संपन्न होत आहे. या दिवशी सर्व जैन बांधव आपल्या धार्मिक स्थळांमध्ये संवत्सरी प्रतिक्रमण करून 84 लक्ष (लाख) प्राणिमात्रांची क्षमायाचना करतात. तसेच प्रार्थना करून गेल्या वर्षांपासून आजतागायत कळत-नकळत झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून सर्व प्राणिमात्रांची अंतःकरणपूर्वक ‘मिच्छामि दुक्कडम’ म्हणत क्षमायाचना करून ‘खमत खामना’ म्हणत संवत्सरी पर्व साजरे करतात.

जैन धर्माच्या इतिहासानुसार त्यांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव (आदिनाथ भगवान) ते 24 वे तीर्थंकर भगवान महावीर या सर्व तीर्थंकरांनी जैन धर्माची मूलभूत तत्त्वे ‘आगम’ या धर्मग्रंथानुसार दृढ व मजबूत केली. या धर्मसंहितेनुसार या पर्युषण पर्वाच्या कालावधीत देशभरातील जैन मंदिरे, उपाश्रय, जैन स्थानक या धर्मपेंद्रातून वास्तव्यास असलेले जैन मुनी, गुरुमहाराज स्वामीजी मा. सा. इत्यादीद्वारे ‘आगम’ ग्रंथातील धर्मतत्त्वे, कल्पसूत्राचे वाचन जैन श्रावक-श्राविकांसाठी गुरू उपदेश, गुरू संदेश जीनवाणीनुसार आत्मचिंतनाद्वारे मार्गदर्शक व प्रेरणादायी होत असल्याने श्राविक भक्तीने तल्लीन होऊन जातात.

भगवान महावीर यांनी सर्व मानवजातीच्या आत्मशांती व आत्मकल्याणासाठी समता आणि शांतता संदेश सर्व जगाला दिला. त्यांनी अनेकांतवाद, सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह या तत्त्वांचा प्रसार केला.

पर्युषण पर्व म्हणजे आत्मशुद्धी करण्याचा एकमेव साधन प्रशिक्षण प्रकल्प होय. हिंदुस्थानातील अनेक धर्म अथवा सण त्या-त्या धर्माच्या महापुरुषांच्या अलौकिक कर्तृत्वातून, योगदानातून, त्यांच्या आध्यात्मिक आणि लोकोत्तर प्रेरणेमुळे साजरे केले जातात. भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म’, ‘जियो और जिने दो’, ‘सम्यक ज्ञानदर्शन चरित्र’, ‘संयम’ आदी संदेशांचा लोकभावनेतून प्रसार करून शुद्ध धर्मसाधनेद्वारे ज्ञान व चरित्र या दोन्हींच्या उपासनेद्वारे कर्माचे क्षय करून मोक्ष मार्गापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविण्याचे आत्मकल्याणाचे कार्य पर्युषण पर्वाद्वारे होते. आत्मकल्याण व आत्मशांतीची प्रेरणाशक्ती पर्युषण पर्वामुळे जैन धर्मीयांना प्राप्त होते. स्वतःच्या आत्मबलाद्वारे कठीण तपस्या करण्याचे सामर्थ्य या पर्युषण पर्वामुळे प्राप्त होते. आत्मबलाचे अवलोकन करून लौकिकार्थाने स्वतःची आत्मजागृती करून आत्मशुद्धीद्वारे पुण्यप्राप्ती करून मोक्षप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो. म्हणून या पर्युषण पर्वाला लोकोत्तर पर्व, आत्मशांती पर्व, क्षमापर्व, समग्य आत्मवादी इत्यादी नावाने सर्व जगात ओळखले जाते.
(ज्येष्ठ पत्रकार)