
>> सुहास मळेकर
तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल, काही माहिती हवी असेल किंवा तुम्ही द्विधा मनःस्थितीत अडकला असाल, तेव्हा गुगल किंवा तत्सम सर्च करण्याआधी तुमच्या घरात तशीच एक मोठी संस्था उपलब्ध आहे तिला एकदा विचारून पहा. प्रश्न नुसतेच सुटतील नव्हे, तर विशेष आपुलकीने आणि तुमचा फायदा पाहून निरपेक्षतेने सोडविले जातील. हो, ती प्रचंड अनुभवी संस्था म्हणजे तुमचे आईबाबा. त्यांच्याशी संवाद साधत राहिलात तर त्यांच्या आठवणींचीही उजळणी होत राहील. त्यांच्याकडे अनुभवांची पुंजीच आहे. दुर्दैव असे की, तरुण वयात या गोष्टींचे आकलन होत नाही. आईबाबा अनुभवाबरोबर आठवणींचे गाठोडे मनात बाळगून जगतात. एखाद्या प्रसंगातून असे आठवणीचे गाठोडे उघडले की, लक्षात येते आईबाबा म्हणजे आठवणी-अनुभवांचा समृद्ध ठेवा आहे. पहिल्यांदा जेव्हा एका मध्यमवर्गीय घरी सोफा आणला तेव्हाची एक गोष्ट सांगतो. काहीही मोठी वस्तू घरी आली की, गोडधोडासह त्याचा शेजाऱ्यांसह सोहळा करणे होतेच. सोफ्याच्या उद्घाटनाचा मान अर्थातच बाबांचा होता. त्या दिवशी या सोफ्याचा एकीकडे आनंद वाटला जात होता, तर दुसरीकडे बाबा मात्र शांतपणे नवीन सोफ्यावर पडून होते. संध्याकाळी जेवण झाल्यावर मुलाने म्हटले, ‘‘बाबाच झोपतील सोफ्यावर…बाकी आपण झोपू खालीच!’’ झोपता झोपता बाबांना हुंदका अनावर झाला, तेव्हा लक्ष गेले. ‘‘बाबा, काय झाले? कुठे दुखतेय का?’’ मुलाने घाबरून विचारले. आईसुद्धा घाबरून गेली. धाकटे काका काही वर्षे आधीच हार्टअटॅकने गेले होते. ‘‘काही नाही’’ म्हणत अश्रू टिपत बाबांनी लहानपणीची एक आठवण सांगितली. बाबा लहान असताना त्यांची आई गेली, पाठोपाठ बाबाही गेले. पाठीवरची भावंडे नातेवाईकांकडे विखुरली, बाबा स्वतः आणि पाठीवरचा भाऊ दोघे आठ-सहा वर्षांचे असताना एका श्रीमंत तालेवाराकडे दोनवेळ जेवून घरकाम, शेतीकामासाठी राहिले. बाबा सांगू लागले, ‘‘दिवसभराची कामे करताना धाकटा भाऊ सोबतच लुडबुड करी. रात्री जेवणे आटोपली की, त्या घरचे सगळय़ांचे अंथरूण घालून देण्याचे काम आम्ही करीत होतो. मऊ बिछाने घालून झाले की, भाऊ आणि मी बाहेर जाऊन त्यांच्या ओटय़ावर झोपत असू. मऊ मऊ बिछाना घालून झाल्यावर एकदा धाकटय़ा भाऊला हळूच त्यावर लोळून बघायचा मोह झाला आणि चुकून मालकाच्या मुलाने ते पाहिले. मालकाने भाऊला ढोरासारखे मारले होते आणि त्यानंतर आम्ही मऊ गादीवर झोपायचा मोह कायमचा आवरला. आता आपल्याच सोफ्यावर झोपताना मला भाऊ आठवला.’’ आईबाबा आठवणींचे ओझे घेऊन मुलांना वाढवत असतात. हवे तर बघा त्यांच्याशी गप्पा मारून!






























































