
>> सुहास मळेकर
नवनव्या समस्यांनी ग्रासलेला समाज पाहता सध्या अजिबात स्थैर्य नाही. एकीकडे निसर्गाने मानवाला धडा शिकविण्यासाठी दंडच थोपटले आहेत की काय असे वाटते, तर दुसरीकडे महागाईने लोकांना खूपच त्रस्त केले आहे.
तळहातावर पोट असणाऱया रोजंदारीवर जगणाऱया मजूर कामगारांविषयी तर स्वतंत्र लिहिता येईल. मात्र विरोधाभास असा आहे की, सधन संस्कृतीत नवीन समस्या उद्भवत आहेत. जेवढे नवे चंगळवादी शोध तितकी मुलांची चंगळ. वेगाने पळणारा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप त्यात भरीस आहे. सोशल मीडियासाठी वापरले जाणारे हे तंत्रज्ञान नवीन असताना प्रगतीचे महाद्वार खुले झाल्याचा आनंद देत होते.. किंबहुना त्यातून फक्त चांगले घेता आले तर ते अजूनही योग्यच ठरेल, परंतु नवीन पिढीकडून त्याचा अति आणि गैरवापर होऊ लागल्यामुळे आज अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत.
पुस्तक वाचन संस्कृती तर लयाला गेली. सोशल मीडियातून मिळणाऱया माहितीवरून मुले स्वतःला विद्वान समजू लागली. त्यांना सांगावेसे वाटते, ‘बाबांनो, या पलीकडेसुद्धा एक विश्व आहे.’ मोबाइलशिवायचे बैठे खेळ, मातीतले खेळ मुलांची आवड राहिलेली नाही. त्यामुळे नवीन मानसिक, शारीरिक आजार डोके वर काढू लागले आहेत.
आता हा ’स्मार्टफोन’ जिवावर उठला आहे. जेव्हा बदनामी, गैरफायदा, ब्लॅकमेल, खून, आत्महत्या इथपर्यंत मजल गेली तेव्हा ती नक्कीच समस्या होऊन राहिली आहे. या गोष्टींचा गैरवापर खूप वाढला आहे. या सगळय़ाचा शेवट काय असा कधीतरी प्रश्न पडतो. पालकांनी तर जाणीवपूर्वक मुलांकडे लक्ष ठेवायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. बाळ सहा-सात महिन्याचे झाले की, उलट घरातली मोठी माणसेच कौतुकाने सांगतात, ‘मोबाइल चांगला कळतो हो त्याला!’
थांबायला हवे हे सगळे. आपण खूप व्यसनाधीन झालो आहोत, त्या गर्तेत गेलो आहोत. लक्षातच येत नाहीये आपल्याला योग्य दिशा कोणती ते. नाही म्हटले तरी पुढची चिंता विसरून ‘मिळालाय तो आजचा दिवस चंगळ करू’ ही मानसिकता वाढत चाललेली दिसते. सोशल मीडियाचा स्वैर वापर होऊ लागल्यामुळे एखादी बातमी खरी की खोटी, शहानिशा न होता घराघरांत पोहोचू लागली. त्यामुळे समज-गैरसमज वाढले. समाजात तेढ निर्माण होऊ लागला. परस्परविरोधी माहिती, सल्ले, उपदेश, त्यांचे अवलंबन, अनुकरण… कशाचा कशाला मेळ नाही. अश्लीलतेने तर हद्दच पार केलीय. जग जवळ आले असले तरी माणूस माणसापासून दूर गेला आहे. आई अलिप्त, बाबा अलिप्त… मुलांची तोंडे भिन्न दिशेला. प्रत्येक जण आपापल्या विश्वात असतो. संस्कृतीचा चोळामोळा झाला आहे.
नुकताच एक हलकासा विनोद वाचला. पूर्वी एक रबरी बॉल खरेदी करायला अकरा जण पैसे जमवत. आता बॉल एकटा खरेदी करू शकतो, पण खेळायला अकरा जणच नाहीयेत. यातला विनोद बाजूला ठेवला तर बाब गंभीर आहे हे लक्षात येईल. त्यानिमित्ताने खरेच मागे वळून पाहावेसे वाटले. या विषयावर बोलण्यासाठी विद्वत्तेची गरज नाही. यातून मार्ग काढायला मात्र विद्वानांची फौज हवी. तारू भरकटला आहे. योग्य दिशा देण्यासाठी समाजाला संवेदनशील मार्गदर्शकांची गरज आहे.




























































