मी असा का?

>> सुहास मळेकर

‘मी असा का’ हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडत असेल किंवा तुम्हाला वारंवार त्याची जाणीव होत असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत समजावे. आपण स्वतःला चाचपून पुढे पुढे सरकत राहिलो तर चूक होण्याची वेळ येत नाही. वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते.

एखादी महत्त्वाची गोष्ट करायची असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण एकूण आधी घडलेल्या गोष्टींचा आढावा घेतो आणि मग निर्णय घेतो. पण आपल्या वैयक्तिक जीवनात केवळ प्रसंग आल्यावरच आढावा घेण्याची वेळ येऊ नये म्हणून जीवनात मागे वळून पाहात रहा आणि स्वतःलाच विचारा, ‘मी काही चुकत तर नाही ना…?’ पहा, बरेच प्रश्न सुटतील. चुकत असेल तर वेळीच लक्षात येईल आणि कुठे वाहवत जात असू तर आवर घालता येईल.

सिंह दहा-बारा पावलं पुढे जातो आणि संकटाची चाहुल घेत मागे वळून पाहतो, ‘माझी पडलेली पावले योग्यच आहेत ना?’म्हणून जीवनात या मागे वळून पाहण्याला आपण ‘सिंहावलोकन’ म्हणतो. माणसाला यशासारख्याच आर्थिक, मानसिक, शारीरिक व्याधीसुद्धा जडत असतात. माणूस नावाचा प्राणी सर्वसामान्यतः सदैव गर्तेत जात असतो. एखादी व्यक्ती पहिल्यांदा चांगल्यासाठी खोटे बोलते. मग पुनः पुन्हा खोटे बोलते. त्याची सवय लागली की खोटे बोलणे सरावाचे होते. एखादी व्यक्ती सतत कपट-कारस्थाने करत असते. ती त्या गर्तेत इतकी खोल जाते की, कालांतराने तिला तिचं वागणं सामान्य वाटू लागतं. मात्र सामान्यजनांत ती कपट-कारस्थानी म्हणून ओळखू येऊ लागते. एखादा माणूस व्यसनात अडकून जातो. त्याला कळत नाही की, तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. एखादी व्यक्ती हिंसकसुद्धा असते. छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून हिंसा करत ती इतकी हिंसक होते की तिला कळत नाही आपण कुठवर आलोय ते. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली. अशा प्रकारे एखादा संगतीने किंवा परिस्थितीने एखाद्या गर्तेत नकळत ओढला जातो. पहिल्या टप्प्यावरच ‘माझी पडलेली पावले योग्यच आहेत ना?’ हे जर आपण स्पष्ट केले तर पुढची चुकीची पावले पडणार नाहीत. वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून जीवनात प्रत्येक टप्प्यावर मागे वळून पाहणे-सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.

याउलट यशस्वी माणसे सिंहावलोकन करतच योग्य मार्ग निवडतात. ते त्यांच्या कार्यात इतके मग्न असतात की, त्यांना विशेष फरक पडत नाही. त्यांना यशाचे भान नसते आणि मग आपण म्हणतो ती व्यक्ती महान असूनही किती साधी आहे, ती व्यक्ती अजून जमिनीवर आहे. हे यशाचे भान नसणे हेसुद्धा त्या व्यक्तीचे गर्तेत जाणेच असते मात्र ते सजग असते. माणूस सदैव गर्तेत जगत असतो. फक्त ती गर्तता जाणीवपूर्वक असेल तर ते यश असते, अन्यथा ती व्याधी ठरते.