अवती / भवती – कुण्या गावातून आलंय येडं!

>> सुहास मळेकर

निसर्गाचा आस्वाद घ्यायला पिकनिकला जाणारे निसर्गप्रेमी असतातच असे नाही. काही निसर्गाचा आस्वाद घ्यायला जातात, तर काही निसर्ग ओरबाडायला जातात. मग ते प्लॅस्टिकचा खच रचून केरकचरा करणे असो की, ऐतिहासिक स्थळांची मोडतोड करून त्यावर आपले नाव कोरणे असो, की आणखी काही. जितका माणूस जास्त सुशिक्षित तितका तो निसर्गापुढे जास्त अशिक्षित ठरावा अशी परिस्थिती आहे. तुमच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम आणि निसर्गानुरूप जगण्याची आस्था असली तरी तुम्ही आपोआप चांगले वागता. किमान प्रत्येकाने आपापल्या परीने नीट वागले तर योग्य परिणाम साधला जाऊ शकतो.

जरा लक्ष दिले तर आपल्या आजूबाजूला काही बेफिकीर माणसे पाहायला मिळतात. याउलट निसर्गावर प्रेम करणारी माणसे आणि नियम पाळणारी सामान्य माणसे कधी-कधी वेडी ठरतात त्याची एक गंमत सांगतो. आठवडाभर तुफान पाऊस आणि रिपरिप चालूच होती. आम्ही सर्व मित्र मिळून मान्सून पिकनिकला माळशेजला चाललो होतो. कार्यालयीन काम होते म्हणून मी मागे राहिलो होतो. दुसरा एक मित्र सोबत थांबला होता, पण प्रवासात मध्येच जॉइन होणार होता.

हातातलं काम आटोपून मी एसटी स्टॅण्ड गाठलं. एसटी डेपोतून ठरावीक बस पकडण्याची मला सूचना होती. त्याप्रमाणे तो सोबत थांबलेला मित्र एका थांब्यावर बसमध्ये चढणार होता. बस सुरू झाली. धो-धो पाऊस कोसळत असल्याने बसमधील खिडक्या बंद करूनदेखील भिजायला झाले होते. हळूहळू प्रवाशांनी बस भरली. त्या गर्दीत आलेपाकवाल्या मामांनी ‘‘आलेपाक आलेपाक’’ ओरडत हजेरी लावली. या प्रवासात मळमळ, उलटय़ा पण होतात की काय? उगीच मनात येऊन गेलं.

मामांकडून मी आलेपाक खरेदी केला. त्यानंतर पंडक्टरला ‘‘थांबा थांबा’’ म्हणत ते घाईघाईत उतरून गेले. पंडक्टर तिकिटं फाडून झाल्यानंतर जागेवर जाऊन बसला. बाहेर छान वातावरण असल्याने हेडफोन लावून मी मस्त जुनी गाणी ऐकायला सुरुवात केली. इतक्यात शेजारचा माणूस खाकरून गाडीतच पचकन पायाजवळ थुंकला. ‘‘काय करता राव? पायाजवळ गाडीतच थुंकताय!’’ मी वैतागून विचारलं. वेडा आहे वाटतं? अशा आविर्भावात उलट त्यानेच माझ्याकडे पाहिलं. उगीच पंगा नको म्हणून काहीच बोललो नाही, पण पुढे प्रवासात तीन-चार वेळा तसेच झाले तेव्हा मात्र असह्य झाले. मित्र आला की, त्याला बघून घेऊ मनात म्हटले. मित्र चढणार होता तो स्टॉप आला. जरा हायसे वाटले. तो स्थानिक असल्यामुळे आता त्याची मदत मिळणार होती. तो बसमध्ये चढला, मला शोधत पाठीमागे आला आणि जवळ येऊन तोपण तसाच खाकरून गाडीत पचकून म्हणाला, ‘‘हेय मित्रा, कसा आहेस?’’ विषयच संपला होता, काय बोलणार?
माझा शेजारी अजूनही तसाच माझ्याकडे बघत होता. हे कुठल्या गावातून आलंय येडं?