लेख – बहुराष्ट्रीय कंपन्यांची जीवघेणी चलाखी

>> सूर्यकांत पाठक

अलीकडच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून केली जाणारी खाद्यपदार्थांमधील हेराफेरी वारंवार उघडकीस येत आहे. सरकारने नुकताच बोर्नव्हिटाची आरोग्यदायी पेय म्हणून जाहिरात करण्यास मनाई करणारा आदेश दिला. नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अन्यही उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कंपनीने युरोपमधील बाजारपेठांपेक्षा विकसनशील देशांमध्ये साखरेचा जास्त वापर केला आहे. आता कंपनीने 30 टक्के साखर कमी केल्याचा दावा केला आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतला हे स्वागतार्हच आहे; पण ग्राहकांनी याबाबत जागरुकता दाखवण्याची गरज आहे.

सकस आणि चौरस आहार असणे ही काळाची गरज आहे. मात्र अलीकडच्या काळात बाजारात मिळणाऱया खाद्यपदार्थातील पोषणाचा दर्जा घसरत असल्याने आणि त्यातही फास्ट फूडचा बोलबाला होऊ लागल्याने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. प्रामुख्याने तरुणाईत जंकफूडची वाढणारी सवय ही चिंताजनक पातळीवर येऊन ठेपली आहे. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने शंका उपस्थित होत आहेत. या कंपन्या जाहिरातींच्या माऱयाने आपली उत्पादने आरोग्यवर्धक असल्याचे सांगत असल्या तरी सत्य बरेचदा वेगळेच असते. अलीकडेच एनर्जी ड्रिंक्स म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘बोर्नव्हिटा’मधील साखरेचे असणारे अति प्रमाण उघड झाले असून ते पेय आरोग्यवर्धक श्रेणीतून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घराघरांमध्ये मूल पाच वर्षांपेक्षा अधिक वयाचे झाले की त्याला बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन यांसारखी पेये देण्यासाठी पालकांची जणू स्पर्धाच लागलेली दिसते; अशा पालकांचे डोळे उघडणारे हे पाऊल आहे.

अन्नपदार्थाविषयी वाढत्या जागरुकतेमुळे अलीकडेच बहुराष्ट्रीय अन्नपदार्थ उत्पादन कंपन्यांचा खरा चेहरा उघड होत आहे. बोर्नव्हिटा हा लहान मुलांसाठी आरोग्यवर्धक असल्याचे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात मुलांनी एकदा प्यायल्यानंतर त्याची गोडी लागावी यासाठी त्यामध्ये अतिरित प्रमाणात साखर मिसळली जात होती. म्हणजेच लहान मुलांना, तरुणांना चटक लावण्याचे कामच उत्पादक कंपनीकडून केले जात होते. त्याची तपासणी केल्यानंतर सरकारने हे पेय आरोग्यवर्धक असल्याचे सांगू नये, अशी तंबी दिली आहे.

या आदेशानंतर धक्का बसलेल्या बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेने खुलासा करत लहान मुलांसाठीच्या पदार्थांमधील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे सांगितले आहे; पण मग इतकी वर्षे ही अतिरित शर्करा ज्या मुला-तरुणांच्या शरीरामध्ये गेली असेल त्याचे काय, हा प्रश्न उरतोच. या उत्पादनाची सवय लागावी यासाठीच भारतासह विकसनशील देशांमध्ये या पदार्थात साखरेचे जादा प्रमाण वापरले जात होते, हे निष्पन्न झाले. ‘पब्लिक आय’ या स्वित्झर्लंडमधील स्वयंसेवी संघटनेने आणि इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्कच्या निष्कर्षात काही धक्कादायक खुलासे झाले होते. यात बोर्नव्हिटामध्ये प्रमाणाबाहेर साखर असल्याचे आढळले होते. नेस्ले कंपनीने युरोपातील बाजाराच्या तुलनेत भारतात आणि अन्य विकसनशील देशात म्हणजेच आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत अधिक साखर असलेल्या उत्पादनाची विक्री केली. सरकारच्या आदेशानंतर नेल्से इंडियाने आपल्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत साखर कमी केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे ही कंपनी नेस पॅफे, सेरेलॅक, मॅगी यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांची निर्मिती करते. पण विकसित आणि विकसनशील देशांमधील उत्पादनांमध्ये कंपनीकडून कसा भेदभाव केला जातो, हे यानिमित्ताने लक्षात आले.

निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे शोषण करणारे युरोपीय आणि पश्चिम देश हे वर्षानुवर्षांपासून लोकशाही देशांना अशाच प्रकारे फसवत आले आहेत. आरोग्याला हानीकारक असलेल्या या पदार्थांच्या नियमित सेवनातून अनेक आजार होतात. विशेषतः वजन वाढून स्थूलपणा येतो आणि एकदा स्थूलपणा आला की पुढील काळात अनेक व्याधी या सहव्याधी म्हणून जडतात. आज बाजारात मिळणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची कोणतीही शीतपेये, डबांबद ज्यूस, एनर्जी ड्रिंस, बिस्किटे वापरून पाहिल्यास त्यात साखरेचे, सोडय़ाचे, मिठाचे प्रमाण अधिक असते. या खाद्यपदार्थाचा समावेश अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थात होतो. अलीकडेच ब्रिटिश जर्नलच्या एका खुलाशानुसार अशा खाद्यपदार्थामुळे जीवनमानावरही नकारात्मक परिणाम होतो. आपल्या आहारात अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर शरीरात कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, नैराश्य यासारखे आजार बळावतात. भारतात अलीकडेच अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे. आपल्या देशातील ग्राहकराजा जागरुक झाला तर या गोष्टी थांबविल्या जाऊ शकतील. त्याचबरोबर खाद्यपदार्थात किती प्रमाणात साखर आणि मीठ आहे त्याचा उल्लेख पॅकवर ठळक शब्दांत नमूद करणे गरजेचे आहे. कमी साखर असेल तर त्याचे प्रमाण किती आहे, हेदेखील सांगणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात साखर आणि मीठ यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा ही सक्षम असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्यात प्रयोगशाळा स्थापन करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱया पदार्थांची वेळोवेळी चाचपणी करायला हवी. तसेच दोषी आढळणाऱया कंपन्यांवर कठोर कारवाईचीदेखील व्यवस्था हवी. तसेच दिशाभूल करणाऱया जाहिरातींना चाप बसवायला हवा.

एका अभ्यासानुसार, इंडियन एनर्जी ड्रिंक्स आणि स्पोर्टस् ड्रिंक्सचा सध्याचा बाजार हा 4.7 अब्ज डॉलरचा आहे. मात्र यामध्ये बहुतांश एनर्जी ड्रिंक्स हे अतिशर्करायुक्त आहेत. असे असूनही एनर्जी ड्रिंक्सची विक्री ही दरवर्षी 50 टक्क्यांनी वाढत आहे. युवकांकडून त्याचे अधिक सेवन केले जात आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण यामुळे तरुणांना अकाली वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढले असून खुद्द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अॅथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर विकल्या जाणाऱया फूड प्रॉडक्टची माहिती योग्य रीतीने द्यावी, असे ‘एफएसएसएआय’ने सांगितले आहे.

आज बोर्नव्हिटाचे प्रकरण समोर आले असले तरी यानिमित्ताने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजारातील सर्वच उत्पादनांवर एकदा क्ष-किरण टाकणे गरजेचे आहे. मागील काळात याच कंपनीच्या मॅगी या उत्पादनामध्ये शिशाचे प्रमाण अधिक आढळले होते. मध्यंतरी मॅकडोनाल्डस् या बहुराष्ट्रीय ब्रँडच्या बाबतही असेच घडले होते. मॅकडोनाल्ड्स या आंतरराष्ट्रीय रेस्टारंट चेनच्या अहमदनगर येथील रेस्टारंटवर एफडीएने कारवाई केली असता या कंपनीच्या बर्गर, नगेट्स अशा खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार चीजला पर्याय म्हणून दुय्यम दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

आज जागतिकीकरणाच्या काळात अनेक प्रगत पश्चिमी राष्ट्रांशी व्यापार करार होत आहेत, मुक्त व्यापार करार होत आहेत. त्यातून येणाऱया काळात अनेक उत्पादने भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. त्यांची गुणवत्ता तपासून पाहणे आणि भारतीय प्रकृतिमानाच्या दृष्टीने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच जिवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास अशा कंपन्यांना तत्काळ शासन करणे आवश्यक आहे.

(लेखक अ. भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)