लेख – अन्न नासाडीचे भेदक वास्तव

>> सूर्यकांत पाठक

अन्न हे पूर्णब्रह्म आहे हा संस्कार भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीच्या मनावर रुजवत आली आहे, परंतु बदलत्या काळात ‘युज अँड थ्रो’ या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला आणि त्यातूनच अन्नाची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली. गावाखेडय़ांत, गरीब कुटुंबांमध्ये अन्न नासाडीचे प्रमाण कमी असून शहरांमध्ये ते प्रचंड आहे, ही बाब सुशिक्षित व सधन वर्गाने लक्षात घ्यायला हवी. आपल्याला अन्न धान्योत्पादन वाढविण्यावर भर देण्याऐवजी जेवढे उत्पादन घेत आहोत, त्याचा योग्य वापर केला आणि अन्न नासाडी टाळली तरी दुसऱया हरित क्रांतीची गरज भासणार नाही.

अन्नाच्या नासाडीसंदर्भात अलीकडेच संयुक्त राष्ट्र संघटनेने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जगभरात दररोज जवळपास एक अब्ज ताटांइतके अन्न वाया जाते असे दिसून आले आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 किलो अन्न वाया घालवतो, असे हा अहवाल दर्शवतो. अर्थात ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. तसेच जगभरातील एकूण उत्पादनाच्या 30 टक्के खाद्यान्न वाया जात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. एकटय़ा अमेरिकेत वाया जाणाऱया अन्नाचे प्रमाण हे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या आफ्रिकी देशांची गरज भागवणारे आहे. त्याच वेळी इटलीत वाया जाणारे अन्न हे इथिओपियाची भूक भागवणारे आहे. अन्नाची ही नासाडी एकूण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनात एक तृतीयांश योगदान देते. या अहवालात वाया जाणाऱया अन्नामुळे उत्सर्जित होणाऱया ग्रीन हाऊस गॅसच्या हवामान बदलावर, पर्यावरणावर आणि पोषणावर होणाऱया परिणामांची चर्चा केली आहे ही अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. कारण अन्न सुरक्षेबरोबरच पर्यावरण वाचविण्याचा मुद्दादेखील यात मांडला आहे.

अन्न नासाडीच्या मुद्दय़ाचे गांभीर्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला जगभरातील खाद्य पदार्थांच्या उपलब्धतेबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. जगाची लोकसंख्या सध्या सुमारे 7.8 अब्ज आहे आणि ती 2050 पर्यंत नऊ अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जगभरात अन्नाधान्याचे उत्पादन पाहता ते 14 अब्ज लोकांसाठी पुरेसे आहे. याचाच अर्थ आपण गरजेपेक्षा दुप्पट उत्पादन घेत आहोत. समाजातील एका घटकासाठी त्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक आहे, तर त्याच वेळी दुसरा वर्ग अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत आहे. ही विसंगती आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

ज्येष्ठ कृषी अभ्यासक देविंदर शर्मा यांच्या मते, आपण या समस्येवर दोन मार्गांनी तोडगा काढू शकतो. पहिले म्हणजे जगातील ढासळते पर्यावरण पाहता आपण धान्योत्पादनावर कमी भर द्यायला हवा आणि दुसरीकडे अन्नाची नासाडी रोखायला हवी. यानुसार आपण जगाची गरज तत्काळ भागवू शकतो. तसेच यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी राहील आणि गरजेपेक्षा अधिक धान्योत्पादन करण्याची आवश्यकताही राहणार नाही. हरित क्रांतीप्रमाणेच ही एक क्रांती करण्याची गरज आहे. ही क्रांती झाल्यास पृथ्वी, पर्यावरण, नैसर्गिक स्रोत, जैवविविधता, वन जमीन या सर्व घटकांना होणारे नुकसान कमी राहू शकते. या कामात सर्व देशांना सामावून घ्यावे लागेल. विशेषतः विकसनशील देशांना. कारण तेथे अधिक झळ बसत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार अन्नाच्या एकूण नासाडीपैकी 60 टक्के भोजन हे घरगुती पातळीवरच वाया जाते आणि 13 टक्के पुरवठा साखळीत खराब होते. सर्वात कमी रिटेल म्हणजेच दुकानात नुकसान होते. ग्रामीण भागात भोजनाची सर्वात कमी नासाडी होते, असे म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे आपल्या धर्मात मनुष्यप्राण्याबरोबरच प्राणिमात्राचाही विचार केला आहे. वास्तविक आपण जेव्हा अन्न सुरक्षेचा विचार करतो तेव्हा त्यात मनुष्याबरोबरच प्राण्यांचाही समावेश होतो. गावात मनुष्याबरोबर गाय, श्वान, पक्षी आदींचीदेखील अन्न सुरक्षा पाहतो. त्यामुळे अन्न पदार्थ शिल्लक राहिला तरी तो वाया जाऊ दिला जात नाही. गावातील कुत्रे, शेळय़ा, गायी, म्हशी यांना दिला जातो. खराब झालेल्या अन्नाचे पंपोस्ट केले जाते. म्हणून अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ग्रामीण भागाकडून शिकायला हवे. शहरांमध्ये बहुतांश फ्लॅटमध्ये व घरांमध्ये राहिलेले अन्न एकतर बेसिनमध्ये टाकून पाण्याद्वारे ड्रेनेजमध्ये ढकलले जाते किंवा डस्ट बिन बॅगमध्ये भरून कचऱयात टाकले जाते. पशुपक्ष्यांना अन्न देण्याचा विचार शहरात फारसा दिसतही नाही आणि तशा सुविधाही फारशा नाहीत. अलीकडील काळामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाऊ लागल्याने वाया जाणाऱया अन्नापासून कंपोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणायला हवी.

शहरांमधील अन्न नासाडीमध्ये हॉटेल आणि समारंभांमध्ये होणारी नासाडी अधिक दिसून येते. आपण सहज जरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये नजर टाकल्यास उच्चशिक्षित, उच्चभ्रू म्हणवले जाणारे आणि आलिशान गाडय़ांमधून आलेले लोक हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या डिशमध्ये सर्रास अन्न पदार्थ सोडून जाताना दिसतात. त्याचे जराही वैषम्य त्यांना वाटत नाही. या वर्गाला अन्नाची किंमत काय असते हे कोण समजावणार? जेवणाचे ताट चाटूनपुसून स्वच्छ करण्याचा संस्कार या वर्गात ‘बॅड मॅनर्स’खाली गणला जातो. विशेष म्हणजे हाच वर्ग गरीब लोक अन्न वाया घालवतात, असा आरोप करताना दिसतो. वास्तविक गरीब, ग्रामीण भागातील नागरिकांना खूप कष्टाने दोनवेळचे अन्न मिळते. त्यामुळे ते अन्न वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. या अहवालात ‘जी-20’ देश (ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन, अमेरिका) आणि युरोपीय संघ यांनी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे. पॅनडा आणि सौदीनेदेखील चांगले यश मिळवले आहे. अन्य देशांनीदेखील यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

लुधियाना येथील आयसीएमआरची संस्था सीफेटने (सीआयपीएचईटी) भारतातील अन्न नासाडीबाबत केलेल्या अभ्यासात म्हटले, अन्नधान्याच्या साठवणुकीत सर्वात कमी नुकसान गहू आणि तांदळाचे होते. सर्वाधिक नासाडी फळ आणि भाजीपाल्यांची होते. यात काही फळे, जसे पेरूचे सर्वाधिक नुकसान होते. कारण त्याचे सेवन पक्ष्यांकडून केले जाते. याप्रमाणे टोमॅटोदेखील खूप वाया जातो.

अन्न पदार्थांची नासाडी ही दोन मार्गाने होते. एक म्हणजे ताटात टाकून दिले जाणारे अन्न पदार्थ आणि दुसरे म्हणजे पुरवठा साखळीत होणारी नासाडी. ते रोखण्यासाठीदेखील प्रयत्न हवेत. तिसरी गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या काळात पदार्थ वाया जात असल्याने शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढते. ज्या पॅकेटमध्ये हे पदार्थ सीलबंद करून विक्रीसाठी ठेवले जातात, तेदेखील कालांतराने वाया जातात आणि दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टी रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलले गेले नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघ अन्न नासाडीबाबत अगदी वेळेवर इशारा देत आले आहे. त्याकडे आपण गांभीर्याने पाहणार कधी? प्रामुख्याने पोषण आहार, अन्न सुरक्षा आणि हवामान बदल यावरून धोरणात्मक बदल करायला हवेत. आपल्याला अन्नधान्योत्पादन वाढविण्यावर भर देण्याऐवजी जेवढे उत्पादन घेत आहोत, त्याचा योग्य वापर केला आणि अन्न नासाडी टाळले तरी दुसऱया हरित क्रांतीची गरज भासणार नाही.

(लेखक राष्ट्रीय ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष आहेत)