भटकंती – कोलाचेल  आणि तामीळनाडूचा उदागिरी किल्ला

>> प्रा. वर्षा चोपडे

कन्याकुमारी जिह्याची राजधानी नागरकोईलपासून 19 कि.मी. अंतरावर कोलाचेल हे बंदर आहे. कोलाचेल आंतरराष्ट्रीय बंदराला एनायम पोर्ट म्हणूनही ओळखले जाते. युरोपियन शक्तींनी सुमारे 300 वर्षे या व्यापारी शहराची वसाहत करण्याचा प्रयत्न केला आणि गोवा वगळता सर्वत्र अपयशी ठरले. चेन्नई आणि तिरुनेलवेलीदरम्यान 16 पेक्षा अधिक बंदरे होती, ज्यामुळे चीन आणि आग्नेय आशियाई देशांशी थेट सागरी संबंध राखण्यात मदत झाली. डच ईस्ट इंडिया कंपनीला मिरपूड आणि इतर मसाल्यांचा व्यापार मिळवायचा होता आणि मत्तेदारी करायची होती, जी कायमकुलमच्या राज्यातून आणली गेली आणि युरोपियन बाजारपेठेत जादा किमतीत विकली गेली. त्रावणकोरचा राजा महाराजा मार्तंडा वर्मा यांच्याशी झालेली वाटाघाटी निरर्थक ठरली आणि त्यांच्याविरुद्ध लष्करी दबावाचा वापर करण्याचे ठरले.

राजा शूर होता. 1741 मध्ये राजा अनिझम थिरुनल मार्तंड वर्मा याने डचांचा पराभव केल्यानंतर विजयाच्या स्मरणार्थ समुद्रकिनाऱयाजवळ एक विजयस्तंभ उभारण्यात आला होता. हा भाग अरबी समुद्राने वेढलेला आहे. कोलाचेलच्या लढाईत त्रावणकोरच्या मार्तंड वर्माने डचांना पराभूत केले होते. हा युरोपियन सत्तेविरुद्धचा पहिला आशियाई विजय ठरला. हिंदुस्थानातील इतिहासात एका छोटय़ाशा राज्याने युरोपियन नौदलाचा पराभव केला ही बाब अभिमानाची आहे. डच मरिन तोफखान्यासह कोलाचेल येथे उतरले होते आणि त्रावणकोरची तत्कालीन राजधानी पद्मनाभपुरमपर्यंतची जमीन ताब्यात घेतली. उत्तरेकडून त्यांचे जनरल आनंदा पद्मनाबा नाडर यांच्या नेतृत्वाखाली मार्तंड वर्माच्या सैन्याच्या आगमनाने डचांना कोलाचेलमध्ये बचावात्मक पोझिशन घेण्यास भाग पाडले. या ठिकाणी त्रावणकोरच्या सैन्याने अधिक सैन्य संख्या असलेल्या डच सैन्यावर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. ऑडमिरल युस्टाचियस डी’लेनॉयसह अठ्ठावीस उच्चस्तरीय डच अधिकारी पकडले गेले. कोलाशेलमधील डचांचा पराभव हा त्रावणकोर-डच युद्धाचा टर्निंग पॉइंट होता. याच डच वंशी युस्टाचियस डी’लेनॉय यांनी पुढील दोन दशके मार्तंडा वर्माची सेवा केली असे इतिहासात लिहिले आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीचे फ्लेमिश नौदल कमांडर युस्टाचियस डी’लेनॉय यांनीच त्रावणकोर सैन्याचे आधुनिकीकरण केले. कमांडर युस्टाचियस डी’लेनॉय यांच्या देखरेखीखाली 1741 – 44 दरम्यान मार्तंडा वर्माच्या कारकीर्दीत किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली होती, परंतु त्रावणकोरवरील दुर्दैवी आाढमणादरम्यान 1791 मध्ये टिपू सुलतानच्या सैन्याचा ताबा घेणाऱया राज्याच्या उत्तरेकडील तटबंदी असलेल्या नेदुमकोट्टईची बांधणी केली. कमांडर डी’लेनॉय यांना उदयगिरी किल्ल्यामध्ये दफन करण्यात आले आहे, ज्याला डिल्लानई कोट्टई डी’लेनॉयचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते, जो पद्मनाभपुरमच्या उत्तरेस 7 किलोमीटर आणि कन्याकुमारी जिह्यातील थुक्कले टाऊन, नागरकोईलपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

उदयागिरी किल्ल्याचा (डिल्लानई कोट्टईचा) इतिहास असे म्हणतात, सुमारे 1434 ते 1512 दरम्यान ओडिशातील गजपतींचा सरदार लंगुला गजपती याने हा किल्ला बांधला होता. सूर्यवंशी शासकांची ‘गजपती’ म्हणजे ‘हत्तींचा स्वामी’ ही उपाधी होती. पद्मनाभपुरम ही राजधानी असताना हा किल्ला महत्त्वाचे लष्करी स्थान होते. खरे तर हा किल्ला सतराव्या शतकापर्यंत व्यवस्थित बांधलेला होता, पण अठराव्या शतकात त्रावणकोरचे महाराजा मार्तंडा वर्मा यांनी तो पुन्हा बांधला. सुमारे 90 एकरांत हा किल्ला असून किल्ल्यावर एक जुनी फाऊंड्री आहे, जी तोफा टाकण्यासाठी वापरली जात होती. टिपू सुलतानविरुद्धच्या मोहिमेत पकडलेल्या कैद्यांना काही काळ या किल्ल्यात बंदिस्त करण्यात आले. नंतरच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत किल्ल्यावर तैनात होते. महाराजा मार्तंडा वर्मा 1758 मध्ये मरण पावले आणि डी’ लेनॉय यांनी त्यांच्या उत्तराधिकारी धर्मराजाचे लष्करी प्रमुख म्हणून शेवटपर्यंत काम केले. डी’लॅनॉय 1777 मध्ये मरण पावले. डी’लेनॉय या अॅडमिरल अधिकाऱयाला मृत्यूनंतर उदयागिरी किल्ल्यामध्ये दफन करण्यात आले आहे. उद्ध्वस्त झालेल्या चॅपलच्या भिंतीमध्ये डी’लेनॉयचा थडग्याचा दगड आहे. त्याच्या दगडावरील शिलालेख तामीळ आणि लॅटिन भाषेत आहेत. त्याची पत्नी आणि मुलाच्या कबरी किल्ल्याच्या अर्धवट उद्ध्वस्त झालेल्या चॅपलमध्ये आढळतात. मार्तंडा वर्मा यांनी डच वंशी युस्टाचियस डी’लेनॉय यांना आदर दिला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तामीळनाडू वन विभागाने किल्ल्याला जैवविविधता उद्यानात रूपांतरित केले आहे. आता या किल्ल्याची अवस्था फार चांगली नाही. मात्र येथे विविध झाडे, पक्षी, मोर, हरीण आणि विविध रंगी फुलपाखरे पाहायला मिळतात. निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. अलीकडे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱयांना किल्ल्यात एक बोगदा सापडला. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित पुरातत्त्व स्थळ म्हणून या किल्ल्याला संरक्षण दिले आहे. कोलाचेल या पोर्टला फार महत्त्व आहे. कारण राजा मार्तंडा वर्मा यांच्या नेतृत्वाखालील त्रावणकोर सैन्य आणि अॅडमिरल युस्टाचियस डी’लेनॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रथमच डच ईस्ट इंडिया कंपनी सैन्य यांच्यातील लढाईचे ठिकाण कोलाचेल हे होते आणि महत्त्वाचे म्हणजे अॅडमिरल युस्टाचियस डी’लेनॉय याने इमानदारीने आपले कार्य केले. डी’लेनॉय हे अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे पूर्वज होते. परदेशी लोकांनी आपल्यावर राज्य केले, पण एक असाही परदेशी होता, ज्याने हिंदुस्थानात आयुष्यभर काम केले आणि आपल्या कुटुंबासहित इथेच कायमचा विसावला. कन्याकुमारीला गेलात तर या दोन्ही स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.
[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)