
>> विलास पंढरी
गुरू हे देवासमान आहेत. जर गुरू आणि देव भेटायला आले तर देवाला ताटकळत ठेवा आणि गुरूला भेटा, असे संत कबीर सांगतात. पौराणिक काळात गुरुगृही राहून शिष्य ब्रह्मचर्य सांभाळून विद्या शिकत असत. राम आणि वशिष्ठ, श्रीकृष्ण आणि सांदिपनी, पांडव-कौरव आणि द्रोणाचार्य अशा गुरू व शिष्यांच्या जोडय़ा प्रसिद्ध आहेत.
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।
याचा अर्थ पूर्ण ब्रह्मांडात चराचरांत व्याप्त असलेल्या आणि अशा अवस्थेचा साक्षात्कार घडवून आणला अशा महान गुरूला माझा नमस्कार असो. अशी प्रचंड व्याप्ती असलेल्या गुरूची पूजा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरुविण कोण दाखवील वाट।
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट।।
आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठय़ा असणाऱया प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढे जात मोठय़ा झाल्या. अगदी एकलव्याचेच उदाहरण घ्या. गुरूने त्याला नाकारले तरी त्याने सरावाच्या वेळी आपल्या गुरूचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला व मोठा धनुर्धर बनला.
गुरू शिष्याची ऊर्जा ओळखतो आणि त्याची पूर्ण क्षमता विकसित करण्यास मदत करतो. गुरुपौर्णिमेला जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जात असले तरी हा एक बौद्ध सणही आहे. बौद्ध ग्रंथांनुसार भगवान बुद्धांनी सारनाथमधील आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश केला. म्हणूनच बौद्ध धर्माचे अनुयायीदेखील गुरुपौर्णिमा उत्सव पूर्ण निष्ठsने साजरे करतात. गुरुपौर्णिमा हिंदुस्थानसह पंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळय़ा बौद्ध देशांमध्ये साजरी केली जाते. शीख इतिहासामध्ये गुरूंना विशेष स्थान आहे. केवळ शारीरिक अस्तित्वातीलच गुरू मानले जाण्याची गरज नाही. मनामध्ये खरी उत्कटता आणि श्रद्धा असेल तर गुरू कोणत्याही रूपात सापडतो. ‘गुरू’ शब्दाचे महत्त्व त्याच्या अक्षरांमध्ये आहे. संस्कृतमधील ‘गु’ म्हणजे अंधकार (अज्ञान) आणि ‘रू’ म्हणजे तो दूर करणारा. म्हणजेच जो अज्ञानाच्या अंधारापासून मुक्त झाला तो गुरू आहे. पालक हे आपल्या जीवनाचे पहिले गुरू आहेत. पुरातन काळात शिक्षणासाठी गुरुकुलाची एक प्रणाली होती. आज त्याची जागा शाळा-महाविद्यालयांनी घेतली आहे. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षी व्यास हे हिंदुस्थानी संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. हिंदुस्थानी संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. त्यामुळेच ‘व्यासोत्छीष्टम् जगत्सर्वम्’ असे म्हटले जाते.





























































