निमित्त – भारतीय संरक्षण सिद्धतेचे उद्गाते

>>विनायक अभ्यंकर

सर्वस्वाचा त्याग करीत ‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ या समर्पित भावनेने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 26 फेब्रुवारी रोजीच्या पुण्यतिथीनिमित्त हा लेख.

लहानपणी संस्कारक्षम कथा आपले पालक सांगत. त्यात एक आवडती, एक नावडती राणी किंवा उ:शाप मिळावा म्हणून वाट पाहणारा गंधर्व ही पात्रे नेहमी आपल्याला भेटत. गोष्टीतल्या त्या गंधर्वाला शेवटी न्याय मिळत असे, परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन तेज:पुंज नरवीरांना उचित सन्मान लाभलाच नाही. एकाला तर हत्येच्या आरोपात आरोपी संबोधण्यात आले, तर दुसऱया सेनापतीला अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले. तरीही या दोन स्वातंत्र्यवीरांनी त्याचा ना खेद मानला, ना खंत केली. सर्वस्वाचा त्याग करीत ‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ या समर्पित भावनेने दधिची मुनींच्या असीम व्रताचे तंतोतंत पालन केले.

दुसऱया महायुद्धात हिटलरच्या झंझावातामुळे हतबल झालेल्या ब्रिटिशांनी भारतात सैन्यभरतीचे आवाहन केले. याचा दूरगामी विचार करता वीर सावरकरांनी तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. तेव्हा तत्कालीन नेतृत्वाने संभावितपणे ‘रंगरूटवीर’ म्हणून हेटाळणी केली. यामागचा नेताजी, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांचा रास्त मनसुबा होता की, स्वातंत्र्य मिळाल्यावर शिस्तबद्ध व प्रशिक्षित सैन्य राष्ट्राला प्राप्त व्हावे. बाबासाहेबांनी ’महार’ रेजिमेंटची पुनर्स्थापना करून घेतली. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱया ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना नेताजींनी मूर्त स्वरूपात आणली. स्वातंत्र्योत्तर काळातील संरक्षणाचा विचार या तीन देशभक्तांनीच केला होता, असे म्हणावेसे वाटते.

या विचाराला आधार होता तो 1942 साली झालेल्या नौसेना बंडाचा. सैन्य साथ देणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात येताच दोन महायुद्धांमुळे गलितगात्र झालेल्या इंग्रजी सरकारला स्वातंत्र्य बहाल करावे लागणार हे लक्षात आले. तेव्हा ब्रिटिश सेनेमध्ये दाखल होणाऱया तरुणांची स्थिती अस्पृश्यच होती. स्थानिक एतद्देशीय सैनिकाला देशद्रोही संबोधत होते, तर ब्रिटिश ‘काला आदमी’ म्हणून हिणवून दुय्यम वागणूक देत होते. याच कठीण परिस्थितीत नेताजी, सावरकर व बाबासाहेबांनी सैन्याला भावनिक, नैतिक आधार देत. ब्रिटिशांचे सैनिकी प्रशिक्षण आत्मसात करण्याचा उपदेश करीत प्रोत्साहन दिले. स्वतंत्र भूमातेच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम, सुशिक्षित सैन्याची राष्ट्राला अग्रामाने गरज भासेल हे लक्षात घेऊन सावरकरांनी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे असा प्रचार व प्रसार सुरू करताच विरोधकांनी त्यांना ‘रंगरूटवीर देशद्रोही’ म्हणून हिणवले. अहिंसा, शांती, बंधुभाव या अव्यवहार्य कल्पनांमध्ये गुंतलेल्या सरकारला सावरकरांनी पाक व चीनच्या विश्वासघातकी साम्राज्यशाही, राक्षसी आकांक्षांची जाणीव करून दिली होती.

‘डोंगराळी पलटन’ भारतीय सैन्य हिमालयीन रांगांचा विचार करता आवश्यक आहे हे नेताजी व सावरकरांनी ओळखून तसा इशारा सरकारला दिला होता. 1962 साली चीनने जो दणका दिला त्यानंतर जनरल थिमय्या, थोरात, मोहिते यांना विश्वासात घेऊन यशवंतरावांनी पाच डोंगराळी पलटनी (Mountainering Brigades) उभ्या केल्या. हेच तत्कालीन सरकारने समजून घेतले असते तर ‘डॅगन’ हजारो चौरस मैल भारतीय भूमी गिळंकृत करू शकला नसता.

रत्नागिरी मुक्कामी नजरकैदेत असताना वीर सावरकरांना भेटायला, जाणून घ्यायला अनेक प्रतित आले होते. महात्माजी, डॉ. आंबेडकर, डॉ. हेडगेवार, नेताजी सुभाष हे थोर नेते व त्यांची भेट तेव्हा फार गाजली. या भेटीत महात्माजींनी कबूल केले की, त्यांचा व सावरकरांचा मार्ग परस्परविरोधी म्हणून भिन्न आहे. बाबासाहेबांची व सावरकरांची भेट महात्माजींच्या निधनाच्या अफवेमुळे झाली नाही. कारण ती भेट स्थगित करून बाबासाहेबांना पुण्याकडे धाव घेऊन ’पुणे (काळा) करार’ मान्य करावा लागला. डॉ. हेडगेवार व वीर सावरकर यांच्यात ’हिंदू संघटन’ यावर विचारविमर्श होऊन एकवाक्यता झाली. नेताजींची व सावरकरांची ऐतिहासिक भेट झाली आणि दोन लढवय्या नरपुंगवांच्या भेटीतूनच पुढे आझाद हिंद सेनेला आकार आला. पुण्यात 1952 च्या मे महिन्यात ’अभिनव भारत’च्या सांगता सोहळ्यात या भेटीचा तपशील जाहीर केला. भारतीय ाढांतिकारी सैनिक व जर्मन सेनानी यांच्यात झालेल्या गुप्त कराराबाबत सावरकरांनी नेताजींना इत्यंभूत माहिती पुरवून जपानी व जर्मनांच्या ताब्यात असलेली भारतीय युद्धबंदी फौजेची बांधणी करण्यात गुंतले असून रासबिहारी बोस यांनी यात पुढाकार घेतला आहे. तेव्हा नेताजींनी आझाद हिंद सेनेची धुरा सांभाळावी, अशी नेताजींना विनंती केली. जपान लवकरच महायुद्धात उडी घेणार आहे. ब्रह्मदेश (म्यानमार) व बंगालच्या उपसागरातून ’ब्रिटिश इंडिया’वर हल्ला करण्याचे मनसुबे रचत आहे. तेव्हा नेताजींसारख्या तरुण लढवय्याने या सैनिकांचे सेनापतीपद (Chief of Staff) स्वीकारून भारताबाहेर जाऊन ब्रिटिशांना जर्जर करावे हा सल्ला सावरकरांनी नेताजींना दिला. पुढे काबूलमार्गे नेताजी जपान-जर्मनीला पोहोचले. रासबिहारी बोस यांच्याकडून नेताजींनी सेनापतीपदाची धुरा स्वीकारली. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेचे प्रेरणास्थान वीर सावरकर आहेत हे नरशार्दुल सुभाषबाबूंनी 25 जून 1944 रोजी सिंगापूर येथील आकाशवाणीवरून साऱया राष्ट्राला सांगितले. वीर सावरकरांच्या प्रचार, प्रसार व प्रयासामुळे आझाद हिंद सेनेला 50 हजार इतकी फौज उभी करता आली. इतकेच नव्हे तर सुभाषबाबूंनी वीर सावरकरांच्या ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकाचे विविध भाषांत भाषांतर करून सैनिकांत वाटले. आझाद हिंद सेना इंफाळला पोहोचताच वीर सावरकरांनी हिंदू महासभेच्या बंगाल, आसाम व तामीळनाडू या प्रांतांतील नेत्यांना आदेश दिला, या सैन्याला सर्वतोपरी सहकार्य करा.

दुसऱ्या महायुद्धाच्या दणक्याने ‘ब्रिटिश राज’ खिळखिळे होत असताना सैनिकीकरणाची ब्रिटिशांची विनंती वीर सावरकरांनी उचलून धरली. आधुनिक सैनिकी प्रशिक्षण आत्मसात करावे म्हणून डॉ. धर्मवीर मुंजे, मामाराव दाते, सेनापती बापट, भालाकार भोपटकर, शांताबाई गोखले इत्यादींनी भारतभर भ्रमण करून सैनिकीकरणाचा प्रचार केला. यामागील हेतू इतकाच, स्वतंत्र भारताला एक शिस्तबद्ध प्रशिक्षित सैन्य प्राप्त व्हावे. याचाच अर्थ संरक्षण सिद्धतेकरिता तरुणांना प्रेरित करणारे वीर सावरकर हे भारतीय संरक्षण सिद्धतेचे उद्गाते होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 1965 च्या युद्धात भारतीय सैन्याने बर्की या लाहोरपासून फक्त तीन मैल दूर असलेल्या शहरावर तिरंगा फडकावला ही बातमी ऐकून वीर सावरकर हर्षोल्हासित झो. सैन्याच्या तिन्ही दलांतील अधिकाऱयांत सहकार्य, सौहा र्द, समविचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून एक सैनिकी प्रबोधिनी असावी हा यथायोग्य सामरिक विचार प्रथम वीर सावरकरांनी मांडला. त्यांचा आराखडा (Project Plan) मांडला. त्याचेच मूर्तस्वरूप म्हणजे खडकवासला येथे उभी असलेली ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (NDA) नाशिक येथील भोसा मिािटरी स्का ही डॉ. धर्मवीर मुंजा यांनी स्थापन केली.संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, परराष्ट्र नीती, विज्ञान विस्तार, शैक्षणिक धोरण, सामाजिक अभिसरण, समरसता, सांस्कृतिक महत्त्व व क्षात्रतेजाची पुनर्स्थापना या राष्ट्रीय जीवनातील बाबींचा विचार करून वीर सावरकरांनी आपले अक्षर वाङ्मय सजवले. वीर सावरकर नेहमी म्हणत, जगात सबलांच्या अहिंसेचा मान राखला जातो. दुर्बलांच्या हिंसेला कुणी पुसत नाही. म्हणूनच अहिंसेचा पुरस्कार करीत असतानाच शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध, शस्त्रसज्ज क्षात्रतेजाचे प्रदर्शन करणारे सैन्य सीमावर्ती भागात उभे करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)