
विनायक श्री. अभ्यंकर
हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्रामात अनेक वादळे उठली, भडकली व शमूनही गेली. या वादळात अनेक योद्ध्यांच्या नेतृत्वाचा कस लागला. काही ठिकाणी हे नेतृत्व थिटे पडले, असहाय्य झाले, तर प्रसंगी ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तावून सुलाखून निघाले. एकांडा शिलेदार म्हणून एका तेजःपुंज नरशार्दुलाला स्मृतीच्या पडद्याआड जावे लागले, पण त्या आक्रमक सरसेनापतीने परदेशात जाऊन मातृभूमीच्या मुक्ततेसाठी देह झिजवला, मृत्यूला कवटाळले.
किशोरवयात कै. ना. सी. फडके यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या वाचत असतानाच त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या तीन कादंबऱ्या वाचनात आल्या आणि स्वातंत्र्य संग्रामातील एका रुबाबदार लष्करी नेतृत्वाचे व आमचे अतूट नाते जडले ते कायमचे. ते वादळी व पराक्रमी बाबू मोशाय ‘रंगाबाबू काका’ म्हणजेच असा हा रणशीलतेचा मानदंड म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय. 1940-41 या सालापासून छत्रपतींच्या बरोबरीने आपल्या देवघरात प्रत्येक मराठी कुटुंबात लटकणारी ती देखणी औरस चौरस तसबीर आजही माझ्या आदराचा विषय आहे.
‘लाल, बाल आणि पाल’ या कसदार नेतृत्वाच्या राजकीय अस्तानंतर अहिंसा व बंधुत्व या धोरणाला चालना मिळून पद्धतशीरपणे ब्रिटिशांनी क्षात्रतेजाला मूठमाती दिली, परंतु पराक्रमी सळसळणाऱ्या रुधिराला हे सामोपचाराचे व बेगडी समन्वयाचे राजकारण सहन होत नव्हते. पृथ्वीराज चौहानने केलेली ऐतिहासिक चूक म्हणजे उदारमतवादाचे विडंबन ही भावना तरुणांच्या ठायी बसल्याने पराभवाच्या निराशेतून जन्माला आलेला हा नवा तुष्टीकरणवाद छात्रतेजाची अवहेलना करून ब्रिटिशांची भलामण करत आहे ही धारणा पसरत होती. शत्रू तो शत्रू, त्याच्याशी नमते धोरण घेऊन आमच्या अस्मितेचा गळा घोटण्याचा जीवघेणा खेळ खुदिरामच्या मातीचा वास असलेल्या सुभाषरूपी सूर्यफुलास रुचला नाही. याच सुमारास या नरशार्दुलाची मुंबई मुक्कामी क्रांतिकारकांचे मुकुटमणी वीर सावरकरांशी भेट नियतीने घडवून आणली. या भेटीत सावरकरांनी नेताजींना ‘‘या कचखाऊ वातावरणातून बाहेर पडा, परदेशातील इंडियन रिपब्लिकन आर्मी ‘आझाद हिंद सेना’ तुमच्या नेतृत्वाची वाट पाहते आहे’’ असा सल्ला देऊन ‘‘तुम्ही रासबिहारी बोस यांच्या जागी सैन्याचे नेतृत्व करावे’’ असे विनवले. यापासून स्फूर्ती घेत नेताजींनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेत सरळ थेट जपान गाठले व वयोवृद्ध रासबिहारी बोस यांच्याकडून आझाद हिंद फौजेची धुरा सांभाळली. दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे गूढ अद्याप कायम आहे.
परदेशात असणाऱया हिंदुस्थानी क्रांतिकारकांचा व समविचारी ब्रिटिशविरोधी प्रभृतींचा आधार घेऊन नेताजींना आपला लढा लढवावा लागला. दुसऱया महायुद्धानंतर फ्रान्सची अस्मिता जागृत करण्यासाठी फ्रेंच अध्यक्ष जनरल द गॉल यांनी वेळप्रसंगी अपमान सहन करून आपल्या जिवाचे रान केले व फ्रान्सची मान उंचावली. असाच प्रयत्न नेताजींनी करताना जो जो आपल्या कार्यात मदत करू इच्छितो त्याला त्याला भेटून मदतीचा हात मागितला. मग तो अफगाण नेता असो, जपानी राज्यकर्ता असो की हिटलर असो. जनरल द गॉल युद्धोत्तर काळात फ्रान्सचे सर्वेसर्वा झाले, पण घातपाताचा संशय अद्याप असलेल्या अपघाती निधनात देशगौरव सुभाषबाबू यांचा जपानच्या तैपेई शहरात विमान कोसळून मृत्यू झाला आणि महात्मा गांधींना सर्वप्रथम ‘राष्ट्रपिता’ संबोधणारा हा संन्यस्त योद्धा अनंतात विलीन झाला. हे एक तत्कालीन ‘दोस्त राष्ट्राचे’ षड्यंत्र वाटते. हिटलरसारख्या हुकूमशहाशी युद्ध मदतीबद्दल वाटाघाटी करताना या देशभर योद्धय़ाने स्पष्ट केले होते की, हिंदुस्थानी मातीवर केवळ आमचाच म्हणजे आझाद हिंद सेनेचाच अधिकार राहील. आमचे राज्य सार्वभौम असेल आणि आमच्या राजकारणात कुणाचीही ढवळाढवळ आम्ही सहन करणार नाही हे आपण लक्षात घ्यावे. कारण रशियावर स्वारी करीत हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचे आडाखे हिटलर बांधत आहे हे नेताजींनी तो युद्धभूमीचा नकाशा दाखवत पुढील मोहिमा स्पष्ट करताना स्पष्ट झाले होते, हेरले होते. त्यानंतर देशगौरव सुभाषबाबू पाणबुडीमधून त्या दुसऱया महायुद्धाच्या काळात जिवावर उदार होऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रवास करीत होते. म्हणूनच आजही ‘देशगौरव नेताजी’ हे नाव घेताच मान आपोआप मुजरा करण्यासाठी झुकते. नेताजींची हिटलरबरोबरची ही भेट 28 मे 1942 या दिवशी झाली होती.
सुभाषबाबू प्रथम राष्ट्रीय सभेचे म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेही 95 जास्त मतांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पट्टाभिसीतारामय्याविरुद्ध. महात्मा गांधी व सुभाषबाबू यांची पहिली भेट दिनांक 16 जुलै 1921 या दिवशी, परंतु नेताजींचा आक्रमक स्वभाव व राष्ट्रीय सभेच्या पुढाऱयांचा नेमस्त आस्ते कदम स्वभाव हे सूत्र जमू न शकल्याने देशगौरव सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला आणि आपली वेगळी वाट पकडली. खरे पाहता काँग्रेस व नेताजी यांचे अंतिम उद्दिष्ट स्वराज्य हेच होते, परंतु कार्यप्रणालीत व तत्त्वात महदांतर पडल्याने सुभाषबाबूंना देशबाहेर जाऊन लढा द्यावा लागला, पण ब्रिटिशांना यातून योग्य तो बोध घ्यावा लागला. त्यात भर पडली ती नौसेनेच्या बंडाची. मग मात्र चेंबरलेन यांना हाऊस ऑफ कॉमनमध्ये 1945 साली हिंदुस्थानी स्वातंत्र्याची उद्घोषणा करावी लागली. अशा तऱ्हेने ‘कधीही राणीच्या राज्यावर सूर्य मावळत नाही’ असे मानणाऱ्यांना धडा मिळाला.
जपान, इटली यांनी जेरबंद केलेल्या हिंदुस्थानी सैन्याला एकत्र करून नेताजींनी हिंदुस्थानच्या सीमेवर कोहिमा, इंफाळपर्यंत धडक मारली व त्यांनी मोईराँग या इंफाळमधील शिखराचा ताबा घेतला, हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला व भाषण केले. तत्पूर्वी त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट देऊन त्या बेटाला ‘शहीद’ हे नाव दिले. आपल्या भाषणात नेताजी म्हणाले, ‘‘स्वतंत्र हिंदुस्थानच्या इंफाळमधून मी सरसेनापती सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानी जनतेला सांगू इच्छितो, आपला देश स्वतंत्र होण्यास आता थोडाच अवधी आहे. रंगून, इंफाळ ही चढाई पुरी झाली की, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला हिंदुस्थानात सुरुवात होऊन आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू. जयहिंद!
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)




























































