ठसा – प्रभाकर दातार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक जोशी

चाळीस वर्षांपूर्वी प्रभाकर दातार यांची मुलाखत घेतली होती. सुमारे आठ हजार जुन्या, दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा (रेकॉर्डस्) संग्रह दातारांकडे होता. मुंबईत कुर्ला येथील त्यांच्या घरी पाच-सहा तास त्यापैकी निवडक ध्वनिमुद्रिका आणि त्यावरचं दातारांचं भाष्य ऐकलं. मग ‘श्री’ साप्ताहिकात ‘रेकॉर्ड जमवण्याचा रेकॉर्ड ब्रेक करणारे दातार’ असा लेख छापून आला. ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करणाऱयांना हे ठाऊकच होते, पण आता हजारो लोकांना त्यांच्या या छंदाविषयी समजलं. दातारांचे वडील नाटय़क्षेत्राशी निगडित होते. त्यामुळे बालपणी प्रभाकर दातार यांनी त्यांच्या बरोबर बालगंधर्व, मास्टर दीनानाथ अशा दिग्गजांची संगीत नाटकं पाहिली होती. त्यामुळे गीत-संगीताची आवड मनात रुजली. पुढच्या काळात मुंबईत रिझर्व्ह बँकेत काम करताना त्यांची फोर्ट भागात फेरी व्हायची. त्यावेळी एकदा बच्चूभाई यांच्या दुकानात त्यांना जुन्या ध्वनिमुद्रिकांचा गठ्ठा दिसला. दातारांनी कुतूहलाने पाहिलं. त्यांना माहीत असलेल्या अनेक नामवंतांचे आवाज त्या ध्वनिमुद्रिकांवर कोरलेले होते. एक रुपयाला एक या दराने या जुन्या, परंतु अमर आवाजाच्या काही ध्वनिमुद्रिका त्यांनी विकत घेतल्या. हा छंद वाढतच गेला. बच्चूभाईसुद्धा अशा ध्वनिमुद्रिका खास त्यांच्यासाठी ठेवू लागले आणि इतरत्रही कुठे रेकॉर्डस् मिळतात का याचा शोध दातार घेऊ लागले. या पाव शतकाच्या छंदातूनच आठ हजार ध्वनिमुद्रिका जमल्या.

त्या ऐकायला दातारांच्या घरी फार मोठी माणसं यायची. साक्षात बालगंधर्व यायचे. दातार सांगतात, एकदा बालगंधर्व घरी आले आणि जेवण सुरू असताना त्यांना एकदम गाण्याची स्फूर्ती आली! ‘प्रभू तेरा महिमा’ हे गाणं ते तन्मयतेने गाऊ लागले! सगळंच विलक्षण. गंधर्वांचं असं गाणं कुणी ऐकलं असेल? छोटा गंधर्व तर अनेकदा गायचे. अनेक गायकांकडे त्यांच्या स्वतःच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका नसायच्या. त्या दातारांकडे त्यांना ऐकायला मिळायच्या. एवढंच काय, एचएमव्हीमधूनही त्यांच्याकडे दुर्मिळ ध्वनिमुद्रिकेसंबंधी विचारणा व्हायची. संगीतकार श्रीनिवास खळे, यशवंत देव अशी अनेक मंडळी त्यांच्या घरी यायची आणि तासन्तास जुन्या जाणत्या स्वरांचा आस्वाद घ्यायची. एकदा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दातार मास्टर दीनानाथांच्या एका गाण्याची तारीफ करत होते. त्यावेळी तिथे असलेल्या एकाने त्यांना म्हटलं, ‘‘कशावरून म्हणता असं?’’ तेव्हा दातारांनी आपल्याकडे त्यांची ती ध्वनिमुद्रिका असल्याचं सांगितलं. विचारणारे गृहस्थ पंडित हृदयनाथ मंगेशकर होते! ते म्हणाले, ‘‘घरी या, माईला बाबांचं हे गाणं ऐकवू या’’ आणि त्यांचा मंगेशकर कुटुंबाशी स्नेह जुळला.

दुर्मिळ गाण्यांप्रमाणेच लोकमान्य टिळकांच्या आवाजाची भोंडे यांनी केलेल्या नकलेची ध्वनिमुद्रिका, न.चिं.केळकर, कवी माधव ज्युलियन, नाटककार मामा वरेरकर, क्रिकेटचे बादशहा सी.के.नायडू, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू अशा अनेक नामांकितांचे ध्वनिमुद्रित आवाज दातारांच्या संग्रही होते. त्यातलेच काही त्यांनी मला दिले.

त्या मुलाखतीनंतर त्यांच्या बँकेतला सहकारी आणि माझा शेजारी अजित सुभेदार यांच्यामार्फत दातारांच्या नव्या उपक्रमाविषयी समजायचं. त्यांनी रेकॉर्ड संग्राहक सुरेश चांदवणकरांसह काही कार्यक्रमही केले. चांदवणकरांचा यासंबंधीचा लेख वाचून दातार थेट त्यांच्या घरी गेल्याची आठवण चांदवणकरांनी सांगितली.

निवृत्तीनंतर दातारांनी पिंपरीला राहायचं ठरवलं. आमची भेट क्वचितच होऊ लागली. 2003 नंतर गेल्या मार्चमध्ये (2022) भेट झाली तेव्हाही चौऱयाण्णव वर्षांच्या दातारांनी ध्वनिमुद्रिकांच्या साऱया आठवणी जागवल्या. यावेळी माझा मित्र महेश नाईक याने त्याचं व्हिडीओ चित्रण केलं. अवघ्या दीड-दोन महिन्यांपूर्वीची ही गोष्ट. दातारांची स्मरणशक्ती उत्तम होती. आम्ही निघताना ‘‘पुन्हा गप्पागोष्टी करायला या’’ असं ते वारंवार सांगत होते, पण आता दातारच गेले. दुर्मिळ स्वर आणि सूर जमवणाऱया दातारांचं, त्यांच्या छंदाविषयीचं कथन आता आमच्या संग्रही आहे हा मात्र योगायोग! इतरांना भरभरून काही देणाऱयाला संस्कृतमध्ये ‘दातार’ म्हणतात. प्रभाकर दातारांचे ‘ध्वनिमुद्रिकांचे देणे’ आता दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करणाऱया संस्थेकडे आहे.