विज्ञान-रंजन – सर्वात लांब रस्ता…

>> विनायक

मार्ग ही संकल्पना हजारो वर्षांपासून आहे. सर्वात पहिले मार्ग अर्थातच भूपृष्ठावरचे, मग जलमार्ग, हवाई मार्ग आणि आता तर अंतराळमार्गापर्यंत आपण पोचलो आहोत. आपल्या देशातही असे ऐतिहासिक महामार्ग म्हणजे त्या काळातले एक्प्रेस-वे, फ्री-वे वगैरे होते. सम्राट अशोकाच्या काळात थेट पाटलीपुत्र (पाटणा) ते आपल्या महाराष्ट्रातलं पश्चिम किनारी असलेलं शूर्पारक म्हणजे आजचं सोपारा एका रुंद महामार्गाने जोडलेलं होतं. पश्चिम राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी ही मार्ग योजना होती. इंग्रजांच्या काळात त्यांनी ग्रॅण्ट ट्रंकसारखे कोलकाता ते पेशावर असे मार्ग बांधले. एकेकाळी दिल्ली-कोलकाता ते लंडन अशी बस सेवासुद्धा होती.

असे दूरस्थ महामार्ग बांधताना विज्ञानाचा आधार घ्यावाच लागतो. कारण विविध प्रदेशांतली बदलती जमीन, वाटेत येणारी अरण्यं, नद्या वगैरे ओलांडत कमीत कमी वेळेत इच्छित स्थळी पोचवणारा मार्ग बांधणं आणि तो वर्षानुवर्षांसाठी टिकाऊ असणं हे स्थापत्यविशारदांचं कौशल्य असतं. प्राचीन काळापासूनच बांधकामाच्या तंत्रज्ञानाचा विकास होत गेल्याने शेकडो वर्षे टिकलेल्या इमारती आज दिसतात तसेच मार्गही दिसायला हवे होते, पण जे मार्ग नेहमीच्या वापरातून बाद होतात, त्यांची डागडुजी होत नाही आणि विराट निसर्ग पुन्हा ती जागा गिळंकृत करतो. पडक्या हवेल्यांमध्येही रान माजतं तसंच हे घडतं.

आजचा विषय आहे ‘पॅन अमेरिक’ मार्गाचा. पॅनडाजवळ असलेल्या अलास्कापासून सुरू होणारा हा रस्ता उत्तर अमेरिका खंडातून अनेक देश पार करत दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेण्टिना येथे पोचेपर्यंत 30 हजार किलोमीटरचा टप्पा गाठतो. त्याचे काही उपमार्ग धरून हे अंतर 48 हजार किलोमीटरपर्यंत जातं असं म्हणतात. त्यामुळे हा पृथ्वीवरचा सर्वात लांब रस्ता ठरतो.

या पॅन अमेरिकन हायवेची लांबी फक्त एकाच ठिकाणी विलग होते. कोलंबिया आणि पनामा यांच्या सीमेवरचा 106 किलोमीटरचा ‘डेरियन गॅप’ हा 106 किलोमीटरचा दलदलीचा भाग तेवढा अपवाद आहे. या मार्गाच्या काही भागांमध्ये पावसाळय़ात जाता येत नाही. एरवी कारने अलास्का ते अर्जेण्टिना असा प्रवास करणारे हौशी आणि साहसी असतातच.

संपूर्ण अमेरिका खंड (उत्तर-दक्षिण) एकाच मार्गाने जोडलेले असावे ही या हायवे निर्मितीमागची मूळ कल्पना. युनायटेड स्टेट्स किंवा यूएसमध्ये काही जणांनी ही संकल्पना मांडली तो काळ एकोणीसाव्या शतकाचा होता. सुरुवातही धीम्या गतीने झाली. पहिलं पाऊल म्हणून अमेरिकेतले (यूएस) चे रस्ते पक्के आणि प्रशस्त करण्यात आले. मग पनामा शहरातले रस्ते बांधले. कोस्टा रिका ते पनामा मार्ग 1941 मध्ये बांधला गेला. तिसऱया टप्प्यात मात्र अनेक देश पार करत रस्ता अर्जेण्टिनापर्यंत पोचला.

1884 मध्ये असा दक्षिणोत्तर अमेरिका जोडणारा रेल्वे मार्ग असावा अशी मूळ संकल्पना होती. त्यासाठी 1889 मध्ये पहिली ‘पॅन अमेरिकन’ परिषद भरली. ‘पॅन’ म्हणजे समग्र अमेरिका खंड. 1903 मध्ये प्रसिद्ध पनामा कालव्याचं बांधकाम सुरू झाल्यावर व्यापक रेल्वेची कल्पना रद्दबातल ठरली. मग 1923 मध्ये पुन्हा सर्व अमेरिकन देशांची दुसरी आणि 1925 मध्ये तिसरी बैठक झाल्यावर एकदाचं ‘पॅन-अमेरिका मार्गा’चं काम मार्गी लागलं. ते 1950 पर्यंत चाललं आणि कॅनडा, यूएस, मेक्सिको, ग्वाटेमाला, एल सॅल्व्हॅदोर, निकारागुआ, कोस्टारिका, पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू (उच्चार परू), चिली, अर्जेण्टिना, बोल्विया, ब्राझील, पॅरॅग्वे आणि उरुग्वे असे सर्व देश एकाच मार्गावर आले.

यासाठी ‘पनॅमॅनियन लेबर’ कं पनीला ‘यूएस’ने 5 तर पनामा सरकारने 15 कोटी डॉलर्स दिले. अमेरिकन अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांनी अशा महामार्गांचं महत्त्व अर्थकारणाला पोषक ठरणारं असतं हे जाणलं होतं. हजारो कामगारांच्या श्रमात देशोदेशींचे कष्टकरी सहभागी होते. 1923 मध्ये हा मार्ग तयार झाल्यावर त्यावर चालून जागतिक विक्रम करण्याचा यशस्वी प्रयत्न दोघांनी केला. 107 किलोमीटरच्या डेरियन गॅप या दलदलीच्या भागासह अर्जेण्टिना ते अलास्का हे 30 हजार 608 किलोमीटर अंतर चालण्याचा विक्रम ज्यांनी केला त्यातील पहिला होता ब्रिटिश नौदलातला जॉर्ज मिगन.

1977 मध्ये मिगन यांनी अर्जेण्टिनापासून चालायला सुरुवात केली आणि 2425 दिवसांची पदयात्रा संपवून ते अलास्काला पोचले तेव्हा साऱया जगाने त्यांचं कौतुक केलं. हा प्रवास पूर्ण होईपर्यंत 26 जानेवारी 1977 ते 18 सप्टेंबर 1983 एवढा काळ लोटला होता. सतत सहा वर्षांचं हे चालण्याचं साहस जॉर्ज मिगन यांनी पूर्ण करून जागतिक विक्रम नोंदवला. यावरून सुचलं ते असं की, एखादा माणूस सातत्याने किती चालू शकतो आणि जगात असे विक्रम कुठे कुठे झालेत त्याविषयीसुद्धा केव्हा तरी लिहायला हवं.