विज्ञान-रंजन – ‘उघडणारा’ सागरी सेतू

>> विनायक

रशियातला सर्वात लांब रेल्वेमार्ग आणि अमेरिका खंडांना जोडणारा ‘पॅन अमेरिकन’ रस्ता याविषयी लिहितानाच आपल्या देशाच्या दक्षिणेला असलेल्या तामीळनाडूतील मंडपम स्थानकापासून पलीकडे पूर्व सागरात असलेल्या ‘पम्बन’ या बेटाला जोडणारा रेल्वेचा अद्वितीय पूल आठवत होता. 1980 मध्ये आम्ही दक्षिण हिंदुस्थानच्या दौऱयात तामीळनाडूमध्ये फिरत असताना रामेश्वरला जाण्याची वेळ आली. त्या वेळी देशाच्या मुख्य भागापासून पम्बन बेटावर असलेल्या या मंदिराकडे जाण्याचा एकमेव मार्ग होता. तो ट्रेनचा. त्यासाठीचा रेल्वेमार्ग वैशिष्टय़पूर्ण आहे आणि तो समुद्रात मधोमध असलेल्या दोन्ही बाजूंनी उघडणाऱया भागांचा ‘बॅस्क्युल’ पद्धतीचा आहे हे ठाऊक होतं म्हणण्यापेक्षा पुस्तकांच्या संदर्भातून ते समजलं होतं. त्या वेळी हवी ती माहिती चटकन देणारी ‘अॅप’ पिंवा इतर ‘गॅझेट’ नव्हती.

वाचनालयातून संबंधित विषयावर पुस्तपं आणून वाचणं हाच एकमेव उपाय होता. तामीळनाडूतल्या पर्यटनस्थळांविषयीच्या पुस्तकात या पुलाबद्दलची माहिती मिळाली आणि कुतूहल वाढलं. त्या दौऱयातल्या एका दुपारी आम्ही मित्रमंडळी मंडपम स्थानकात ट्रेनमध्ये बसलो. काही मिनिटातच ट्रेन समुद्रावरून जाऊ लागली. एकच ट्रक असलेल्या या ट्रेनच्या दोन्ही बाजूला निळेशार सागरजल दिसत होते.

काही वेळाने ट्रेन हळू होत थांबली आणि समजलं की आता तासाभराची निश्चिती. कारण ‘पम्बन ब्रीज’ उघडून त्या भागातून काही मोठय़ा बोटी पसार होईपर्यंत थांबणं भाग होतं. बाजूच्या चिंचोळय़ा मार्गावरून आमच्यासारखे तरुण प्रवासी दाराबाहेर डोकावले. आमचा डबा इंजिनजवळचाच असल्याने पुढचा रेल्वेमार्ग दोन्ही बाजूंनी उचलला जात असताना आणि बोटी गेल्यावर पुन्हा व्यवस्थित बंद होताना पाहायला मिळाला. मग हळूहळू ट्रेन पम्बनच्या ‘उघडझाप’ होणाऱया ‘बॅस्क्युल’ पुलावरून पसार झाली.

या ट्रेनचा हा असा प्रवास जवळपास 110 वर्षे अव्याहत सुरू आहे. 2014 या वर्षी 24 फेब्रुवारीला या पुलाची शताब्दी झाली. 2020 पासून मात्र तो दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता. या पुलाची निर्मिती आणि एकूणच पूल संरचना याविषयी फार तांत्रिक गोष्टीत न जाता माहिती घ्यायचा प्रयत्न करू या.

लाकडी साकव ते मोठे पूल, लोखंडी पूल, दगडी पूल असे पुलांचे अनेक प्रकार प्राचीन काळापासून जगात सर्वत्र आहेत. यातले काही पूल जमिनीवर, तर काही पाण्यात बांधले गेलेत. नदीवर पूल बांधण्याचं तंत्र शेकडो वर्षांपासूनच आहे. त्यातही कालपरत्वे नवं तंत्रज्ञान आलं. लोखंडाच्या वापराला सुरुवात झाल्यावर कोलकाता येथे हुगळी नदीवर असलेला ‘हावडा ब्रीज’ पिंवा रवींद्र सेतू खूप प्रसिद्ध झाला. जाड लोखंडी पट्टय़ांच्या (बीम) जुळणीतून नदीपात्रात मध्ये एकही खांब नसलेला हा पूल पॅन्टिलिव्हर आणि ट्रस पद्धतीच्या पुलांचं संमिश्र बांधकाम आहे. पॅन्टिलिव्हर पुलात मजबूत टोकांवर पुढच्या भाग तरंगता ठेवून पुढे जाता येतं, तर ट्रस पुलात त्याची लोखंडी कमानच केली जाते. या दोन्ही गोष्टी अत्यंत भक्कम असतात. शक्यतो असे पूल नदीपात्रावर बांधले जातात.

दुसरा प्रकार आपल्या मुंबईच्या समुद्रातील ‘केबल स्टेड’ पुलाचा (2010). यात लोहरज्जूंनी मधला स्पॅन तोलून धरलेला असतो. सॅन फ्रन्सिकोचा ‘गोल्डन गेट’ पूल असाच आहे. याशिवाय विविध आर्च पिंवा कमानींचे पूल बनवले जातात. या लेखात आपण ज्याचा विचार करतोय तो ‘बॅस्क्युल’ पद्धतीचा म्हणजे पाण्यातील पुलाचा मधला एक भाग उघडून पुन्हा बंद होण्याच्या पद्धतीची रचना. असाच एक पूल लंडनला थेम्स नदीवर आहे. तो 1894 मध्ये बांधला गेला आणि त्याचं अनेकदा नूतनीकरण होऊन तो पुन्हा वाहनांसाठी खुला झाला. तोसुद्धा बोटींच्या दळणवळणासाठी मधोमध उघडतो. ‘टॉवर ब्रीज’ म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि तो सागरी पूल आपल्या देशात आहे म्हणून त्याचं महत्त्व अधिक.

या पुलाचं बांधकाम 1911 मध्ये सुरू झालं. (त्याच वर्षी मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’चा शिलान्यास झाला होता.) हे काम अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झालं. म्हणजे पम्बन ब्रीज बांधून आता 110 वर्षे झाली आहेत. या पुलाने दक्षिण पूर्व सागरातील अनेक वादळवाऱयांना धैर्याने तोंड दिले आहे. 1964 मध्ये आलेल्या महावादळाने हिंदुस्थानच्या दक्षिण आणि श्रीलंकेच्या उत्तर भागात एवढा हाहाकार उडवला की, रामेश्वर बेटाच्या दक्षिणपूर्वेकडून पुढे धनुष्कोडीपर्यंत जाणारा लोहमार्ग कायमचा उद्ध्वस्त झालाच, पण एक ट्रेनही या वादळाने उलथवली आणि किमान 200 जणांचा बळी गेला. या वादळाची झळ पम्बन ब्रीजलाही बसलीच. तरी तो 1988 पर्यंत सतत दुरुस्ती होत सुरू होता. मात्र 2020 मध्ये बाजूलाच मोटारींचा रस्ता झाला. तो मात्र बराच उंच आहे. सध्या रेल्वेमार्ग स्थगित करण्यात आला असून नव्या स्वरूपात तो बॅस्क्युल न राहता ‘व्हर्टिकल लिफ्ट’ पद्धतीचा असेल.
पुढे 2016 मध्ये 25 कोटी रुपये मंजूर करून हा पूल पुन्हा पूर्ववत नव्या स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वेचे तज्ञ शिल्पकार त्यासाठी नेमले गेले. 2022 पासून तर मालवाहतूकही थांबलेला देशातला हा एकमेव (बहुधा) रेल्वे पूल पुन्हा सुरू होण्याची तारीख गेल्या फेब्रुवारीतली होती. पण आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असं दिसतंय. हा रेल्वे पूल पूर्ववत झाला की, मंडपम ते रामेश्वर या सागरी मार्गावर पूर्वीच्या ‘उघडणाऱया’ पुलाऐवजी खालीवर होणारा रेल्वेचा पूल हेसुद्धा पर्यटकांचं आकर्षण ठरेल.