विज्ञान-रंजन – घरोटं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

‘अरे जोडता तोडलं, त्याले नातं म्हनू नही, ज्याच्यापासून येतं पीठ त्याले जातं म्हनू नहीं’ असं मार्मिक निरीक्षण खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोलीतल्या कवितांमधून ठायी ठायी दिसतं. म्हणूनच त्यांनी ‘…कसं घर घर वाजे, त्याले म्हनावं घरोटं’ असं म्हटलं. हा घरोटं शब्द ‘जात्या’पेक्षा खरोखरच समर्पक वाटतो. मग जातं आलं कुठून? कदाचित त्याचा उगम आजही उत्तर हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱया ‘जत्री’ शब्दात असावा. आता ‘जत्री’, ‘जंत्र’ वगैरे शब्दही ‘य’चा ‘ज’ होण्याच्या प्रक्रियेतले यंत्रासाठीचेच असणार. तेव्हा धान्य दळण्याचं यंत्र ते जत्र अथवा जातं, परंतु घरोटं शब्द छान वाटतो. आपण निदान घरी वापरण्याच्या यांत्रिक चक्कीला तरी घरघंटी असा शब्द वापरण्यापेक्षा घरोटं असं का म्हणू नये! बघा विचार करून.

तर या जात्याची किंवा घरोटय़ाची कूळकथा फारच जुनी. अगदी अश्मयुगापासूनची. त्या आदिम काळात वापरल्या जाणाऱया वस्तूंपैकी. आजही ठळकपणे टिकून राहिलेल्या, रोजच्या वापरातल्या गोष्टी म्हणजे जातं. आता पाटा-वरवंटा, दगडी उखळ आणि इडलीचं वगैरे पीठ दळण्याचा रगडा. दगडी खलबत्तेसुद्धा असतात. या सर्वच गोष्टींना आता विजेची शक्ती मिळाल्यामुळे त्यांची बाह्यरूपं बदलली असली तरी त्यात दगडाचा वापर होतो ही अश्मयुगापासूनची देणगी.

आजही आपल्या देशात सुमारे तीस कोटी जाती किंवा घरोटी पहाटेच्या वेळी घराघरांत गहू, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाचं पीठ दळत असतात. या गृहिणी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिरसाने भारलेल्या ओव्या मंद सुरात गातात. त्यांना घरोटय़ाच्या घरघरीचं संगीत साथ करतं आणि तास-दोन तासांत ताजं पीठ हाती येतं.

धान्य पिकवण्याची आणि ते शिजवून खाण्याची पद्धत मानवी समाजात रूढ झाली तेव्हा तत्कालीन माणसांनी ‘गरज ही संशोधनाची जननी असते’ या उक्तीनुसार विविध प्रकारची जाती तयार केली. दोन सपाट दगडांच्या चक्राकार चकत्यांमध्ये घालून धान्य दळण्याची कला अवगत झाल्यावर ते नुसतं ठेचून किंवा कुटून बारीक करण्याच्या प्रक्रियेला अधिक चांगलं स्वरूप आलं. कालौघात बरेच बदल झाले, पण घरोटं टिकून राहिलं. आजही घरात एरव्ही कोपऱयात पडलेलं जातं, लग्नकार्य किंवा सणासुदीला स्वच्छ केलं जातं आणि थोडं तरी पीठ त्यावर दळलं जातं. ही परंपरा अनेक मोठय़ा शहरांतही आढळते. आमच्या लहानपणी म्हणजे 50-60 वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुमारे पंधरवडाभर आधी पहाटे घरोटय़ाचे सूर पहाटे कानी यायचे. आजी आणि आई विविध पदार्थांसाठी विविध प्रकारची पिठं दळायच्या. त्यातही कुणाकडे उद्या कोणतं धान्य दळणार हे शेजारीपाजारी ठाऊक असायचं. मग वेळ सांभाळून ते धान्य त्याच जात्यावर दळायला एकमेकाRकडे जाणं व्हायचं. सांसारिक सुखदुःखाच्या गोष्टी परस्परांना सांगत हे काम चालायचं. या सगळय़ा मुंबईतल्या गोष्टी. मग खेडोपाडय़ात आजही घरोटय़ाची मंगलमय घरघर कानी पडत असली तरी नवल नाही.

सॅण्डस्टोन किंवा वालुकामय दगडापासून जात्याची दोन पाळं बनवली जातात. खालचं पाळ आणि वरचं पाळ सारखेच म्हणजे सुमारे तीन इंच उंचीचं असतं. खालच्या पाळाचा आकार, दळलेलं पीठ चटकन बाहेर जाण्याच्या हेतूने किंचित बहिरवक्र पिंवा कॉनव्हेक्स असतो तर वरच्या पाळाचा भाग आतून किंचित अंतरवक्र किंवा खोलगट असतो. इसवी सन 850 मधलं फ्रान्सच्या अधिपत्याखालील ‘पॅरलिन्नियन एम्पायर’मधलं प्राचीन जात्याचं रेखाचित्र उपलब्ध असलं तरी इंग्लंड आणि युरोपमध्ये त्याचा वापर पहिल्या शतकापासूनच व्यापक प्रमाणावर होत होता. जातं बनवण्याचा दगड काहीसा मऊ असण्याचं कारण म्हणजे त्याला वारंवार करावी लागणारी टाकी. पाषाणातून शिल्प घडवताना टाकीचे म्हणजे छिन्नी-हातोडय़ाने दगडाला आकार देण्याचे घाव घालावे लागतात. तसेच ते जातं किंवा पाटा-वरवंटा अथवा दगडी उखळ बनवतानाही घालावे लागतात. हे घाव घालणं रचनात्मक कामासाठी असतं. त्यातून नित्योपयोगी वस्तू किंवा सुबक मूर्ती घडतात. हे कौशल्याचं काम करणारे कारागीर अर्धशतकापूर्वी पावसाळा संपता संपता येत असत. जवळच्या मैदानात दोन-तीन दिवस त्यांचा जात्या-पाटय़ाला टाकी लावण्याचा कार्यक्रम चालत असे. आम्ही पाथरवटांचे ते कलाकौशल्य उत्सुकतेने पाहायचो. आता काळ बदलला. घरघंटी नावाने यांत्रिक, विजेवर चालणारी चक्की बऱयाच घरांत आली. दळण-कांडण करण्याचे कष्ट कमी झाले. मात्र या यंत्रांमध्येही छोटं दगडी जातंच असतं. तेही घरोटय़ासारखंच घरघरतं, पण बाहेरून दिसत नाही. टायमर लावून वेगवेगळय़ा धान्यांची पिठं मिळविता येतात. आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध पाणचक्की सोळाव्या शतकापासून आहे. हर्सूल येथील जलाशयातून भूगर्भातल्या नळांद्वारे आणलेल्या बारमाही जलप्रवाहावर ही चक्की चालते. प्रचंड आकाराची दगडी पाळं जात्यासारखीच. मात्र खालच्या बाजूला लावलेला लोखंडी पात्यांचा पंखा जलशक्तीवर चालतो. कदाचित ती देशातली पहिली पावर ग्राइण्ड मिल असू शकेल. विशेष म्हणजे हे महाघरोटं आजही फिरताना पाहायला मिळतं.