सरखेल कान्होजी आंग्रेंचे वारसदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
Service before self हे तत्त्व ज्यांनी अमलात आणले, अनेकांना शिकवले असे दर्याधुरंधर मनोहर प्रल्हाद आवटी म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेंचे खरे वारसदार होते. त्यांचे ते निधडय़ा छातीचे कमावलेले बलदंड शरीर आणि ती रुबाबदार दाढी आता दिसणे शक्य नाही.
मुंबई बंदरातील एक धुंदफुंद प्रशांत संध्याकाळ. विक्रांत युद्धनौकेच्या फ्लाय डेकवर उभारलेला रंगमंच. सर्व पश्चिम कमांडमधील नौसैनिक पडदा कधी उघडतो याची वाट पाहत होते. विंगेत दोन दिग्गजांचा संवाद.
मामा – साहेब, तुम्ही गणवेशातले खरेखुरे कान्होजी तर मी रंगपटामधला बेटावरचा सरदार आंग्रे.
साहेब – तुमचा सरदार आठवणींना उजाळा देणारा रुबाबदार सरदार इंद्रसेन आंग्रे. बढीया!
हिंदुस्थानी नौसेनेच्या इतिहासामधील मनोरंजनाच्या क्षेत्रातला हा सुवर्ण क्षण म्हणजे मधुकर तोरडमल यांचे नाटक ‘गुलमोहर.’ हा मणिकांचन योग जुळवून आणला होता. वीरचक्र आणि परम विशिष्ट सेवा मेडल विजेते व्हाईस ऍडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी यांनी. तेव्हा ते पश्चिम नौसेना कमांडचे मुख्य ध्वजाधिकारी (FOC-in-c west) होते. त्या रात्री समुद्राच्या साक्षीने रंगलेला हा प्रयोग म्हणजे आवटी यांच्या नाटय़प्रेमाचा आविष्कार होता.
एम. पी. आवटी जेव्हा मुंबईत ध्वजाधिकारी म्हणून आले तेव्हा डॉकयार्डमधील कामगारांनी लायन गेटसमोर मोठे पोस्टर लावले होते. ‘मनोहरपंत प्रल्हादपंत आवटी.’ ते आजही माझ्या डोळय़ासमोर तरळते. सामंजस्याने कुठलाही गुंता सोडवणे, ममतेने कनिष्ठांना सांभाळून घेणे यामुळे ते सर्वांच्यात प्रिय होते. हिंदुस्थानी नौसेना आपद्सदृश प्रसंगी त्यांनाच परिस्थिती काबूत आणण्यास पाठवत असे. मग तो दिल्ली जहाजावरचा गुंता असोत, लोणावळा येथील कठीण प्रसंग असो. ब्रिटिशांच्या तालमीत तयार झाल्यामुळे आणि नौसेना प्रशिक्षण ब्रिटिशांकडून घेतल्यामुळे त्यांच्यात व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य, शिस्तप्रियता, कर्तव्यकठोर करारीपणा हे एका योद्धय़ामध्ये अपेक्षित असलेले गुण सामावले होते. दळणवळण या अवघड विभागाचे उच्च शिक्षण त्यांनी घेतले होते. ज्याला नौसेनेत लाँग सी (Long c) असे संबोधतात. एम. पी. आवटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1927 रोजी सुरतमध्ये झाला. त्यांचे मूळ गाव राहुरी तालुक्यातले मळुंजे बुद्रुक. त्यांचे एक पूर्वज नारोपंत रत्नपारखी यांनी पेशवाईत पराक्रम केला. त्याबद्दल त्यांना ‘आवटकी’ हा महसूल भागातला मानमरातब मिळाला. त्याच आवटकीचे रूपांतर ‘आवटी’ असे होऊन आवटी हे त्यांचे आडनाव झाले. मनोहर आवटी यांना हिंदुस्थानी नौदलात महत्त्वाची पदे भूषविण्यास मिळाली. 1961 ते 1964 या काळात ते विजयालक्ष्मी पंडित यांचे लंडनमध्ये सल्लागार म्हणून वावरले. नौसेनेच्या आय.एन.एस. तीर या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे तसेच सिग्नल स्कूल, कोचीनचे कमांडिंग ऑफिसर या जबाबदाऱया त्यांनी सांभाळल्या. प्रशिक्षण हा त्यांचा हातखंडा भाग होता. म्हणूनच रिअर ऍडमिरल असताना त्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) 1976-77 कमांडंट नेमण्यात आले. व्हाईस ऍडमिरल होताच पश्चिम नौसेना कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून 1980 ते 1983 ते कार्यरत होते. तेथूनच 31 मार्च 1983 रोजी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते शांत बसले नाहीत. पर्यावरण हा त्यांचा जिव्हाळय़ाचा विषय, तसेच सागरी इतिहास हा प्रेमाचा, व्यासंगाचा अभ्यास होता. म्हणून 1978 मध्ये त्यांनी ‘मेरीटाइम हिस्टरी सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून अलिबाग मुक्कामी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक बांधण्यात पुढाकार घेतला. तेथेच हिंदुस्थानी नौसेनेचा इतिहास उलगडणारे संग्रहालय त्यांनी उभे केले. इकॉलॉजी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात बहुमोल कार्य केले. ‘रिलेशन ऑफ होमोसॅपीअन ऍण्ड पँथर लिओ’ व ‘द व्हॅनिशिंग इंडियन टायगर’ या दोन पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. साहसी सागरी मोहिमा आखून त्या पूर्णत्वास नेणे, तरुण युवकांना शिडाच्या बोटीतून जगप्रवासास प्रवृत्त करणे, प्रेरणा देणे हा त्यांस जणू ध्यासच होता. मध्यंतरी ते ‘मेरीटाइम हिस्टरी’तर्फे पुण्यात आले होते. एअर मार्शल भूषण गोखले यांनी तो योग जुळवून आणला तेव्हा त्यांना भेटलो. ते प्रेमाने म्हणाले, ‘हाय जोकर, कसा आहेस तू? पिटीयामध्ये होतास ना?’ हीच त्यांची शेवटची भेट. मुंबईचे ध्वजाधिकारी असताना फ्लॅग हाऊसमधून सकाळची वर्दीश (P.T.) करण्यास ते बाहेर पडत. त्यांची खासियत म्हणजे पायमोजे न घालता पी.टी. शूज घालून फिरत.ते आपल्या सर्व सफलतेचे श्रेय मॅडम आवटी यांना देत असत.
1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांनी बजावलेली कामगिरी फार महत्त्वाची ठरली. तेव्हा ते पेटिया टाईप कमोर्टा क्लास स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून ऑपरेशनल कमांड होते. ज्यांना नौसेनेत P31 म्हणून संबोधतात. त्यांच्या हाताखाली कदमत, कच्छल, किल्टान व कवरत्ती ही चार जहाजे युद्धात कामगिरी बजावत होती. ही सर्व रशियन शस्त्रास्त्राने परिपूर्ण पेट्रोलिंग व्हेसल्स आहेत. मी आयएनएस कदमातवर होतो. आम्हाला पूर्व पाकिस्तानच्या मोहिमेवर मुक्रर करण्यात आले होते. आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शत्रूच्या हद्दीत वावरत होतो. कधी काय होईल सांगता येत नव्हते. आमच्या काफिल्यावर पाकिस्तानी सबमरीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही  बाब आवटी यांनी हेरताच सर्व जहाजांनी डेप्थ चार्जेस फायर करून तिला जलसमाधी दिली. तिचे नाव होते सी.एन.एस. मँग्रो. सबमरीनशी दोन हात केल्यानंतर तीन पाकिस्तानी जहाजांशी मुकाबला करून त्यांना ताब्यात घेतले. हे सर्व तेव्हा कॅप्टन असलेल्या आवटी यांच्या धुरंधर नेतृत्वामुळे शक्य झाले.पाकिस्तानी युद्धकैद्यांना चितगाव बंदरातून कोलकाता येथे आणून सरकारच्या ताब्यात सुखरूप पोहोचवणे ही कामगिरीही आवटी यांनी कुशलतेने पार पाडली. या कामगिरीबद्दलच त्यांना वीरचक्र घोषित झाले. Service before self हे तत्त्व ज्यांनी अमलात आणले, अनेकांना शिकवले असे दर्याधुरंधर मनोहर प्रल्हाद आवटी म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेंचे खरे वारसदार होते. त्यांचे ते निधडय़ा छातीचे कमावलेले बलदंड शरीर आणि ती रुबाबदार दाढी आता दिसणे शक्य नाही.
(लेखक निवृत्त नौसेना अधिकारी आहेत.)
– [email protected]