सुंदर हस्ताक्षर, ही एक श्रीमंतीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विश्वनाथ पंडित

सुंदर, वळणदार हस्ताक्षर ही विद्यार्थीदशेतील महत्त्वपूर्ण संकल्पनाच मागे पडलीय नव्हे मोडीत निघालीय, दुर्लक्षित झाली आहे असे म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही. 

संगणकाच्या आगमनानंतर जवळजवळ स्वहस्तलेखन बंद झालेले आहे तर ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लेखन सराव राहिलेला नाही. परिणाम बहुसंख्य मुलांची मराठी अक्षर खुरटी, न समजणारी, वळणदार असण्याऐवजी वळणावळणाचीच जास्त असतात. पूर्वी घरचा अभ्यास (होमवर्क) देत असताना शिक्षक विद्यार्थ्यांना रोज पानभर स्वहस्ते लेखन करावयास भाग पाडत, करून घेत, पण आज ते कुठेच दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुलांमध्ये हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी, स्वच्छ, सुवाच्च, वळणदार अक्षरांचे उद्दिष्ट ठेवून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करून स्तुत्य, गरजवंत असा दुर्लक्षित होत असलेला उपक्रम आयोजित करून एका लक्षणीय बाबींकडे लक्ष वेधलंय याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे.

सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे यासारखे दुसरे अक्षर सुख नाही, परंतु तेच मागे पडतेय, त्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसावा. असो. मराठी असोत वा इंग्रजी, प्रत्येक शाळांनी चौथी, पाचवीपासूनच विद्यार्थ्यांकडून वळणदार अक्षरांचा सराव करून घ्यायला हवा. यासाठी वाटल्यास विशेष वर्ग सुरू करावेत. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच सुंदर अक्षराची, लेखन सरावाची गोडी लागेल असे उपक्रम राबवले जावेत जेणेकरून पुढील आयुष्यभर सुंदर अक्षराची श्रीमंती त्यांच्याजवळ कायम राहील. शिवाय आजीवन त्यांना स्वलेखन करण्यात आनंद मिळेल, त्यांची लेखन क्षमता वाढेल, मात्र शाळा, खासगी शिकवण्या वर्ग, शासन यांनी विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणापासूनच अक्षर सुधारणा या संकल्पनेकडेही लक्ष केंद्रित करून यासाठी विविध उपक्रम राबवावेत असे मनापासून वाटते.