संतकवी श्रीदासगणू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘श्रीगजानन विजय’ ग्रंथाला येत्या ऋषिपंचमीस 80 वर्षे पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने या ग्रंथाच्या लेखकाचे हे भावूपर्ण स्मरण.

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कोतवडे’ हे संतकवी दासगणू महाराजांचे मूळ गाव. शांडिल्य गोत्री चित्तपावन ब्राह्मण घराण्यातील ‘सहस्रबुद्धे’ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावचे ‘खोत’ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले ‘सहस्रबुद्धे’ नंतर ‘करकंब’ येथे आणि ब्रिटिशांच्या काळात नगर येथे स्थलांतरित झाले. या घराण्यातील ‘आप्पाजी नारायण सहस्रबुद्धे’ यांनी कर्तृत्वाच्या जोरावर मामलेदारी मिळवली आणि पुढे त्यांचे वंशज एकनाथ आप्पाजी आणि दत्तात्रय एकनाथ यांनी ती सांभाळली. दत्तात्रय एकनाथ यांचा विवाह ‘अकोळनेर’चे जहागीरदार आप्पाजी दाभोळकर यांची कन्या सावित्री हिच्यासोबत झाला. सरळमार्गी, उदार व भजन कीर्तनात दंग राहणारे दत्तात्रेय आणि बुद्धिमान, मानी व तापट स्वभावाच्या सावित्रीबाई या उभयतांच्या पोटी दिनांक 6 जानेवारी 1868 या दिवशी दासगणू जन्म घेते झाले.

दासगणूंनी जन्मतः मातेचे स्तनपान न करता, रडारड करण्याचा दिनक्रम राबविला. सर्व इलाज झाले तरीही बाळ रडायचे थांबेना. अखेरीस आजीने ग्रामदेवतेस नवस केला तेव्हा कुठे दासगणूंनी रडणे थांबवले आणि ते स्तनपान करते झाले. दासगणूंचे पाळण्यातील नाव नारायण होते. आजोळी नामकरण विधी संपन्न झाल्यावर मंडळी घरी परतली तेव्हा आजोबा एकनाथपंतांनी बाळाकडे पाहिले. बाळाचे कान व पोट मोठे असल्याचे पाहून पंतानी ‘याचे नाव गणेश ठेवा’ असे सुचविले, म्हणून दासगणूंचे नाव कागदोपत्री ‘गणेश’ असे रूढ झाले.

लहानग्या गणेशाचे वास्तव्य बरेचदा आजोळी असे. आजोबा आप्पाजी दाभोळकर साधुवृत्तीचे व मामा काशीनाथपंतही धार्मिक वृत्तीचेच होते. दासगणूंच्या बालमनात ‘हरिभक्ती’ रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य काशीनाथपंतांनी केले, याच कारणामुळे दासगणूंनी ‘संतकथामृत’ या ग्रंथ रचनेमध्ये आपल्या मामांविषयी आदर व्यक्त केला आहे. सातव्या वर्षापर्यंत आजोळी राहून दासगणूंनी बालपण मनसोक्त उपभोगले. खेळ, दंगामस्ती, व्रात्यपणा यात रमलेले दासगणू शाळेत सातव्या वर्षी दाखल झाले, परंतु हूड स्वभावामुळे त्यांना शाळेत बराच मार खावा लागला. परिणामी शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांच्या मनात अढी निर्माण झाली. इंग्रजी चौथीचे शालेय शिक्षण पूर्ण करेपर्यंत ते 21 वर्षांचे झाले. अभ्यासापेक्षा लावणी, पोवाडे, ग्रामगीते यांची ओढ त्यांना लागली.
दासगणूंच्या आयुष्याची गाडी रुळावर येण्याकरिता घरच्या मंडळींनी अनेक प्रयत्न केले. शिक्षण सुटल्यावर दासगणू मित्रांच्या संगतीत भरकटू नये म्हणून त्यांना मावशीकडे बडोद्याला धाडण्यात आले, मात्र तिथेही दासगणू रमले नाही. मावशीच्या यजमानांनी त्यांना नोकरीस लावले तेव्हा तिथे फटकळपणे वागून दासगणूंनी नोकरी व बडोदे, दोन्हीही सोडले. पुन्हा नगरला परतल्यावर घरच्यांनी दासगणूंचे लग्न जामखेड तालुक्यातील बोरले अष्टय़ाचे जहागीरदार नारायण रानडे यांच्या कन्येशी लावून दिले, तरीही दासगणूंची बेफिकिरी कमी होईना.

अशातच एके दिवशी चुलतीने अपमान केल्याचे निमित्त झाले आणि दासगणूंनी ‘यापुढे मी नावलौकिक मिळवून दाखवेन’ असे निक्षून सांगितले आणि घर सोडले. घरच्यांनी, आप्तेष्टांनी हरप्रकारे समजूत काढली मात्र दासगणू बधले नाहीत व आपल्या निर्णयावर ठाम राहिले. काही दिवसांतच त्यांना श्रीगोंदे येथे नऊ रुपये पगारावर ‘पोलीस’ खात्यात नोकरी मिळाली. नगर जिह्यात दासगणूंनी अकरा वर्षे नोकरी केली. अनेक ठिकाणी त्यांना तपासाकरिता फिरावे लागत असे. यातूनच त्यांची अनेक सिद्धसत्पुरुषांशी भेट घडली. ‘पोलीस’ खात्यात काम करीत असताना एकीकडे दासगणूंमधील काव्यप्रतिभेलाही बहर येत होता. पुढे योगायोगानेच श्रीगोंदे येथे असताना दासगणूंची भेट श्रीवामनशास्त्राr इस्लामपूरकर यांच्याशी झाली.

श्रीवामनशास्त्राr यांच्याकडून दासगणूंनी गुरुउपदेश घेतला आणि त्यांच्यामुळे दासगणूंच्या हातून पहिली पंढरपूरची वारी घडली. इथून पुढे दासगणूंची वृत्ती सातत्याने पालटत गेली आणि एका निर्णायक क्षणी श्रीवामनशास्त्राRनी अवतारकार्याची समाप्ती करताना दासगणूंना या पुढे शिर्डीच्या साईबाबांकडे जावे असे सांगितले. गुरुआदेशानुसार, दासगणू शिर्डी येथे गेले आणि साईंच्या सहवासात आमूलाग्र बदलले. बाबांनी त्यांना संतचरित्रकार महिपतींच्या धर्तीवर तत्कालीन सत्पुरुषांची पद्यमय चरित्रे लिहिण्याची सूचना केली. दासगणूंच्या अंतःकरणात हरिभक्तीचे बीज रुजून त्याचा डेरेदार वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली याचे कारण त्यावर भक्तीभावाचे शिंपण घालण्याचे काम साक्षात साईबाबाच करीत होते. एकीकडे ‘पोलीस’ खात्याची नोकरी, काह्या भिल्लास जेरबंद करण्याचे धाडस, गुह्याच्या तपासापोटी करावयास लागणारा अथक प्रवास आणि दुसरीकडे नोकरीवर पाणी सोडून पूर्णवेळ संतचरित्र लेखन करण्यासाठीचा साईबाबांचा आग्रह यात सरशी अर्थातच बाबांच्या इच्छेची झाली आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत दासगणू पूर्णवेळ संतचरित्रलेखन व कीर्तन यामध्येच रममाण झाले.

या कालावधीमध्ये दासगणूंना तत्कालीन सिद्धसत्पुरुषांची प्रत्यक्ष दर्शने व मार्गदर्शन घडले. यातूनच पुढे भक्तीलीलामृत, संतकथामृत, भक्तीसारामृत, मध्वविजय, श्रीशंकराचार्य चरित्र असे पाच महाग्रंथ, त्याशिवाय गुरुचरित्र सारामृत, श्रीकेशवराव चरित्र, श्रीज्ञानेश्वर चरित्र, श्रीमांगिरीश माहात्म्य, गोदा माहात्म्य, शनिप्रताप हे ग्रंथ, शेकडो संतचरित्रविषयक कीर्तनोपयोगी आख्याने, पोवाडे, अष्टके, स्फुटपदे, स्तोत्रे, तसेच भावार्थमंजिरी, भावार्थदीपिका, भक्तीरसायन, भावप्रकाशिका, भावदीपिका, भावार्थबोधिनी, विचार सागर प्रदीप, विष्णुसहस्त्रनाम बोधिनी असे आठ टीकाग्रंथ, उद्धवागमन हे खंडकाव्य अशा साहित्याद्वारे सुमारे पावणे दोन लक्ष ओव्या लिहिणारे संतकवी श्रीदासगणू महाराज आज सर्वत्र परिचित आहेत ते श्रीगजानन विजय ग्रंथामुळे. शेगांवच्या श्रीगजानन महाराजांचे चरित्र वर्णन करणारा हा 21 अध्यायी ग्रंथ दासगणूंनी अवघ्या 21 दिवसांत लिहिला हे विशेष. केवळ संतचरित्रे लिहून संतपदापर्यंत पोहोचलेले श्रीदासगणू हे एकमेव संतकवी.

परमार्थ हाच संसार’ मानणाऱया दासगणूंनी त्यांच्या भावभक्तीची धुरा दामोदर आठवले यांच्या खांद्यावर सोपवली आणि श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे 26 नोव्हेंबर 1962 या दिवशी वयाच्या 95 व्या वर्षी देह विसर्जित केला. ‘आधुनिक महिपती’ म्हणून नावलौकिक मिळवणारा ह. भ. प. ‘संतकवी दासगणू’ नावाचा हा ज्ञानसूर्य पंचतत्त्वात विलीन झाला.

– [email protected]