श्रीस्वामीसमर्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

सद्गुरूंचे ‘सद्गुरू’ म्हणून ज्यांना सर्वत्र ओळखले जाते त्या श्रीअक्कलकोटस्थ स्वामीसमर्थ महाराजांविषयीचा हा लेख.

महाराष्ट्रात विविध पंथ आणि संप्रदाय आहेत. त्यामध्ये स्वतःचे ठळक अस्तित्व दर्शविणाऱया ‘श्रीदत्त संप्रदाया’चे जनक म्हणून श्रीदत्तात्रेयांचा उल्लेख करण्यात येतो. श्रीदत्तात्रेयांची परंपरा श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीमाणिकप्रभू आणि श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) यांच्या रूपाने रुढ झाली. श्रीदत्तावतार म्हणून सर्वत्र सर्वदूर सुपरिचित असलेले श्रीस्वामी समर्थ महाराज सन 1857 मध्ये सोलापूर जवळच्याच अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि तेथेच सन 1878 मध्ये समाधिस्थदेखील झाले.

श्रीस्वामी समर्थांचा निश्चित कार्यकाल कुणासही ठामपणे ज्ञात नाही. ते जुनाट पुरुष (पुराणपुरुष) होते असे त्यांचे चरित्रकार सांगतात मात्र, एका प्रसंगामध्ये त्यांची दर्शनभेट घेण्याकरिता कलकत्त्याहून आलेल्या इंग्लिश बॅरिस्टरास ‘आपण प्रथम कर्दली वनातून निघालो’ असे सांगून पुढे, ‘कलकत्ता, बंगालदेश, तेथून गंगाकाठाने फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गोदातटावरून दक्षिण हैद्राबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर असे सर्वत्र वास्तव्य करून अक्कलकोटास आलो’ असे श्रीस्वामी समर्थांनी सांगितले.

श्रीस्वामी समर्थ मूळचे कोण, कुठले आणि अक्कलकोटास येण्यापूर्वी ते कोठे वास्तव्यास होते, याचा त्यांनी कुणास थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र, त्यांच्या स्वैर बोलण्यावरून अंदाज घेत अनेकांनी अनेक कयास बांधले. काहींच्या मते श्रीनृसिंह सरस्वती अवतारसमाप्तीची सूचना देत श्रीशैल पर्वताजवळील कर्दळीबनात गुप्त झाले आणि काही काळानंतर तेच श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने अवतरले असे सांगण्यात येते. काहींच्या मते उत्तरेतील घनदाट अरण्यात स्वामी समाधी लावून बसले होते. त्यांची ही समाधीवस्था अनेक वर्षे चालल्याने त्यांच्या देहाभोवती वारूळ तयार झाले. हेच वारूळ तेथे लाकडे तोडण्यास आलेल्या एका लाकूडतोडय़ाच्या हातातील कुऱहाड पडल्याने फुटले आणि त्या वारुळातूनच श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले असे मानण्यात येते. आणि या प्रसंगाची सत्यासत्यता पटवून देण्यासाठी श्रीस्वामींच्या मांडीवर जेथे कुऱहाडीचा आघात झाला त्याचा व्रण शेवटपर्यंत त्यांच्या मांडीवर दिसून येत असल्याचा पुरावा पुढे करण्यात येतो.

श्रीस्वामी समर्थांचे प्रिय ‘सुत’ अर्थात ‘पुत्र’ हे संबोधन ज्यांना प्रत्यक्ष श्रीस्वामा rसमर्थांनी बहाल केले, ते हरिभाऊ तावडे नावाचे सद्गृहस्थ (अर्थात ‘श्रीस्वामीसुत’) यांनी श्रीस्वामी समर्थांच्या अवताररहस्याचे गूढ त्यांच्या परीने उकलले आहे. हस्तिनापूरजवळ छेलिखेडा गावामध्ये श्रीस्वामी समर्थ (शके 1071 अर्थात सन 1149) सर्वप्रथम आठ वर्षांच्या बालकाच्या रूपाने प्रकट झाले असे श्रीस्वामीसुतांचे सांगणे आहे. त्यांच्या या मताला पुष्टी देण्यासाठी त्यांनी चैत्र शुद्ध द्वितीया, सन 1870 मध्ये श्रीस्वामी समर्थांचा जयंती उत्सव सुरू केला आणि हाच उत्सव त्यांनी पुढील वर्षी अर्थात सन 1871मध्ये अक्कलकोट येथे श्रीस्वामी समर्थांच्या उपस्थितीत साजरा केला. श्रीस्वामीसुतांच्या या मताला श्रीस्वामी समर्थांनी विरोध केला नाही उलट त्यास दुजोरा दिल्याचे काही प्रसंग घडले यावरून श्रीस्वामी समर्थांच्या जन्मसंबंधाने केलेले श्रीस्वामीसुतांचे अनुमान व भाष्य खुद्द श्रीस्वामी समर्थांनाच मान्य असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात तसेच अन्य प्रांतासही अनेक दिग्गज सत्पुरुषांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे, मात्र तरीही श्रीस्वामीसमर्थ महाराज सर्वांपेक्षा वेगळे आहेत हे त्यांचे अवतारकार्य पाहता लक्षात येते. श्रीस्वामीसमर्थांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी संप्रदाय निर्माण केला नाही, त्यांनी शिष्य निर्माण केले नाही तर त्यांनी थेट ‘सद्गुरू’ निर्माण केले. महाराष्ट्रभूमीत सर्वत्र पसरलेले अनेक तात्कालिक सिद्ध सत्पुरुष कधी ना काळी श्रीस्वामी समर्थांच्या सहवासात होते किंवा त्यांचे थेट अनुग्रहीत होते असे दिसून येते.

श्रीमाणिकप्रभू, श्रीचिदंबर दीक्षित, श्रीसिद्धारुढस्वामी, श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर आदी समकालीन सत्पुरुष, श्रीसाईबाबा (शिर्डी), श्रीदेवमामलेदार (सटाणा), श्रीकृष्णसरस्वती, श्रीरांगोळी महाराज (कोल्हापूर), श्रीधोंडीबुवा (पलूस), श्रीगजानन महाराज (शेगाव), श्रीबिडकर महाराज, श्रीकाळबुवा, श्रीसयाजीनाथ माळी, श्रीशंकर महाराज आणि श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे (पुणे), श्रीजंगली महाराज (भांबुर्डे), श्रीकाकामहाराज पुराणिक (राजापूर) यांसारखे पुढे नावलौकिकास आलेले सत्पुरुष पूर्वापार श्रीस्वामी समर्थांच्या सहवासात होते. श्रीवासुदेवानंद सरस्वती (माणगाव), श्रीब्रह्मचैतन्य (गोंदवले), श्रीसाटम महाराज (दाणोली), श्रीगुलाबराव महाराज (माधान) यांना देखील कारणपरत्वे श्रीस्वामी समर्थांचा सहवास घडला होता. श्रीस्वामींच्या अवतारसमाप्तीनंतरदेखील श्रीस्वरूपानंदस्वामी (पावस) श्रीचिले महाराज (पैजारवाडी) यांच्या माध्यमातून श्रीस्वामीकार्य पुढे चालतच राहिले.

श्रीस्वामी समर्थांच्या सगुण देहाचे वर्णन करताना चरित्रकारांच्या सांगण्यानुसार, श्रीस्वामी समर्थांच्या शरीराचा वर्ण तांबूस-गोरा असून कांती तेजःपुंज व दिव्य होती. त्यांच्या देहाचे तेज इतके प्रखर असे की, त्यांच्याकडे एकटक पाहण्याची कुणास हिंमत नसे. ते आजानुबाहू होते. सर्वसामान्यांपेक्षा जास्त उंची लाभलेला त्यांचा देह स्थूल होता मात्र, त्या मानाने त्यांचे चरण, विशेषतः पावले अतिशय मऊ होती. जणू काही त्यात हाडेच नसावीत. विलक्षण विरोधाभास दर्शविणाऱया राहणीमानामुळे श्रीस्वामी कोणत्या वेळेस काय करतील याचा नेम नसे. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे अतर्क्य, बऱयाचदा गूढ व सूक्ष्म असे, मात्र त्यांच्या बोलण्याचे प्रत्यंतर काही काळानंतर येत असे.

मेलेल्यास जिवंत करणे, निपुत्रिकास पुत्रप्राप्ती, दरिद्री माणसास धनलाभ करून देणे, आजारापासून मुक्तता करणे, इष्ट देव-देवतांच्या स्वरूपांमध्ये भक्तांना दर्शन देणे या सर्व संतश्रेष्ठांनी केलेल्या लीला व चमत्कार श्रीस्वामी समर्थांच्याही नावे जमा आहेत. मात्र आपण त्यांच्या कडे केवळ ‘चमत्कार’ म्हणून न पाहता त्याद्वारे श्रीस्वामींना काय सांगावयाचे आहे हे जाणून घ्यावे. श्रीस्वामींनी अनेक देवदेवतांचा पुरस्कार केला. जाती-धर्माविषयी आदर बाळगला, खोटेपणा, विकृती या समाजविघातक गोष्टींविरुद्ध कायम ‘तोंड’सुख घेतले. मात्र त्यामागे असलेले त्यांचे विचार, प्रामाणिक भावना आणि मथितार्थ यांचा खोल अभ्यास केल्यास श्रीस्वामीसमर्थांचे अवतारकार्य खऱया अर्थाने उमगू शकेल.

‘मी तुम्हा सर्वांचा योगक्षेम वाहीन’ अशी हमी देऊन श्रीस्वामी समर्थांनी सन 1878 मध्ये समाधी घेतली. अक्कलकोट येथील त्यांची समाधी, श्रीवटवृक्ष मठ (येथे श्रीस्वामी नित्य बसत असत) श्रीगुरूमंदिर (बाळाप्पांचा मठ) यांसोबतच श्रीस्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली अक्कलकोट येथील अनेक पुण्यपावन स्थळे श्रीस्वामीकृपेची महती गात श्रीस्वामीभक्तांचे स्वागतासाठी उत्सुक आहेत.

– [email protected]