चैतन्यसूर्य श्रीदिगंबरदास

523

>> विवेक दिगंबर वैद्य

समाजकारण हेच अध्यात्म मानणाऱया श्रीदिगंबरदास महाराज या कर्ममार्गी सत्पुरुषाच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख.

दिगंबरदासांना पूर्वापार आजोळच्या घराचा लळा होता तसेच पोमेंडीच्या राममंदिरातील श्रीरामोपासनाही प्रिय होती. त्यांच्या वृत्तीमध्ये जन्मजात वैराग्य होते. त्यातच मातृवियोगाचे दुःख पदरी पडल्याने ते खेळण्याबागडण्याऐवजी ईश्वरचिंतन, मनन यातच रममाण होत असत. पहिलीपर्यंतचे शिक्षण पोमेंडी येथे झाल्यानंतर दुसऱया इयत्तेपासून दिगंबरदास रत्नागिरीच्या सरकारी हायस्कूलात दाखल झाले. मात्र पुढे इंग्रजी सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे मन शिक्षणात रमेनासे झाले. ग्रंथवाचन, देवपूजा, चिंतन व मनन यात रुची वाढत असताना एके दिवशी त्यांची चुलतआत्या अनुसया (रानडे) हिच्याकडे त्यांना पुणेस्थित सत्पुरुष श्रीरामानंद बीडकर महाराज यांचे चरित्र मिळाले. ते चरित्र वाचनात आल्यावर त्यांना श्री बीडकर महाराजांविषयी अपार स्नेह व औत्सुक्य वाटून आले आणि त्यांच्या दर्शनाची ओढ लागली.

अशातच, एके दिवशी दिगंबरदासांना केडगावच्या श्रीनारायण महाराजांची दर्शनभेट आणि सहवास प्राप्त झाला. तसेच थोर कर्ममार्गी सत्पुरुष श्रीगाडगेबाबा यांचा सहवासदेखील लाभला. पहिल्या भेटीपासूनच श्रीगाडगेबाबांनी दिगंबरदासांवर अपार माया केली. पुढे अनेकदा त्यांना श्रीगाडगेबाबांचा सहवासही घडला. एकदा मुंबई येथील मुक्कामात गाडगेबाबांनी दिगंबरदासांना महाकाय मारुतीरायाचे विराट दर्शन घडवले आणि पुढे एका अवचितक्षणी, ‘तुझा दाता मोठा आहे, योग्य वेळी तुला त्याचे दर्शन घडेल’ असा आशीर्वादही दिला.

सद्गुरूभेटीची तळमळ अन् तगमग दिगंबरदासांना शांत बसू देईना. अखेर एके दिवशी, अवघ्या बारा वर्षांचे दिगंबरदास घर सोडते झाले आणि नाशिक येथील श्री बीडकर महाराजांचे वास्तव्य असलेल्या पंचवटीजवळील श्रीदत्तमंदिरात आले. तेथून पुढे ते मुंबईला आले व आपल्या मामांकडे मुक्काम करते झाले. हे वृत्त समजल्यानंतर गणेशपंत लगेच आले आणि दिगंबरदासांना पुन्हा रत्नागिरीस घेऊन गेले. मात्र तिथेही मन न रमल्याने दिगंबरदासांनी पुन्हा एकदा गृहत्याग केला आणि ते पुण्याला श्री बीडकर महाराजांच्या मठात दाखल झाले.

श्री बीडकर महाराज समाधीमठाचे व्यवस्थापक वासुअण्णा भागवत यांनी आपुलकीने चौकशी करून दिगंबरदासांना मठात राहू दिले. दुसऱयाच दिवशी समाधीमठात श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष आणि श्री बीडकर महाराजांचे शिष्य श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे यांचे आगमन झाले. मठात ‘रामहृदय’ वाचत बसलेल्या दिगंबरदासांकडे पाहात त्यांनी विचारले, ‘काय विठोबा, वडिलांना न सांगता रत्नागिरीहून पळून आलास होय?’ त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालेले दिगंबरदास श्रीरावसाहेबांकडे पाहातच राहिले तोच श्रीरावसाहेब हसले आणि वासुअण्णांकडे पाहात म्हणाले, ‘हे मला नेहमी अक्कलकोटस्वामींच्या स्वरूपात पाहतात’ आणि त्यांचे हे वाक्य संपते न संपते तोच दिगंबरदासांना श्रीरावसाहेबांच्या जागी श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थांचे दिव्य तेजस्वी महाकाय रूप दिसू लागले. दिगंबरदासांचे डोळे विस्फारले. श्रीस्वामी समर्थांचे सगुणातले तेज श्रीरावसाहेबांच्या जागी साक्षात एकवटले होते. दिगंबरदासांची सद्गुरूंची शोधयात्रा संपली. श्रीगाडगेबाबांच्या सांगण्यानुसार दिगंबरदासांना त्यांचा दाता भेटला होता. अशातच एकदा श्रीरावसाहेब स्वतः दिगंबरदासांना म्हणाले, ‘तू काही मला परका नाहीस. मी दोन वर्षे तुमच्या कुटुंबात वास्तव्याला होतो.’ (हा संदर्भ श्री बीडकर महाराजांच्या सूचनेनुसार हरिपंत जोशी यांनी श्रीरावसाहेबांना आपल्या घरी राहू दिले त्या विषयीचा होता.) पुढे काही काळानंतर, श्रीरावसाहेबांनी दिगंबरदासांना अनुग्रह दिला.

अनुग्रह प्राप्त झाल्यावर पुढे येणारा काळ दिगंबरदासांसाठी अक्षरशः स्वप्नवत होता. हजरत बाबाजान, फकीरबाबा यासमान अवलिया आध्यात्मिक सत्पुरुष यांची भेट होणे, तसेच काही कालावधीनंतर रत्नागिरीस परतल्यावर स्वा. सावरकरांसारख्या क्रांतिकारक सत्पुरुषाचा सहवास घडणे या व अशा अनेक घटनांमुळे दिगंबरदासांच्या विचारांना दिशा लाभली. एकीकडे लौकिकातील जगणे आणि दुसरीकडे त्या निमित्ताने केलेले मुंबई, गगनगड, सोमेश्वर, कल्याण येथील वास्तव्य हे सर्व सन 1956 मध्ये पूर्णत्वाला गेले आणि दिगंबरदासांनी पुढे श्रीरावसाहेबांच्या समाधीमंदिराच्या सेवाकार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वतःच्या कार्याची दिशादेखील निश्चित केली.

दरम्यान सन 1942 च्या सुमारास दिगंबरदासांची भेट श्रीसद्गुरू दिगंबरबाबा वहाळकर यांच्याशी झाली. त्यानंतर सन 1949 मध्ये पावसच्या श्रीस्वरूपानंद स्वामींची भेट झाली. यातूनच दिगंबरदासांचा आध्यात्मिक अधिकार दिसामासाने वाढता झाला अन् याचा प्रत्यय त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला जाणवू लागला. दिगंबरदासांनी आध्यात्मिक धारणा उंचावून त्याद्वारे समाज आणि राष्ट्र बलशाली व समृद्ध करण्याकडे लक्ष देण्याचे निश्चित केले. राष्ट्रउत्थानाचा भव्यदिव्य संकल्प केला आणि यातूनच सन 1951 मध्ये चिपळूण जवळच्या ‘डेरवण’ गावामध्ये महान लोकोपयोगी कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील सत्पुरुष श्रीगोपाळबुवा केळकर उर्फ प्रीतीनंद स्वामीकुमार यांचे अनुग्रहीत दिगंबरबाबा वहाळकर यांचा दिगंबरदास महाराजांशी दृढ परिचय व स्नेह होता. एकदा हे दोघे सावर्डे मुक्कामी असताना त्यांना श्रीस्वामीसमर्थांचे साक्षात दर्शन घडले. कालांतराने 1951 साली दिगंबरबुवांनी समाधी घेतली.

दिगंबरबुवा देहात असताना त्यांची सेवा सीतारामबुवा वालावलकर या अनुग्रहीत सत्शिष्याने उत्तम प्रकारे केली. त्यांच्याविषयी दिगंबरदासांना आदर होता. पुढे या दोन्ही श्रेष्ठ भक्तांनी दिगंबरबुवा वहाळकर यांची समाधी उभारली. या दोघांचेही आपआपसातील नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. काही वर्षे दिगंबरबुवा वहाळकरांच्या समाधीस्थानाची सेवा केल्यावर 1969 साली सीतारामबुवांनीही देह ठेवला, तेव्हा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिगंबरदासांनी ‘सीतारामबुवा वालावलकर चॅरीटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली.

पुढे श्रीरावसाहेबांनी देहत्याग केल्यानंतर दिगंबरदासांनी त्यांचे समाधीस्थळ विकसित केले. त्यासोबतच डेरवण येथील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या रोजगाराचा प्रश्न ‘मागेल त्याला काम’ या योजनेअंतर्गत निकालात काढला. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये विहिरी, कुपनलिका खोदणे, शैक्षणिक साहित्य देणे, पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार करणे आदी समाजोपयोगी कार्य केले. दिगंबरदासांचे राष्ट्रहिताचे आणि धर्माधिष्ठत अलौकिक कार्य म्हणजे सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी त्या सोबतच श्रीशिवाजी महाराजांच्या स्वराष्ट्र-स्वधर्म प्रेम, चारित्र्य, राजकीय कर्तृत्व आणि रणकौशल्य दाखविणारी शिवसृष्टी तसेच शिव-समर्थ गड आणि श्रीशिवरायांच्या मंदिराची उभारणी.

21 मे 1989 रोजी समाधिस्थ झालेल्या दिगंबरदास महाराजांचे ‘चैतन्यसूर्य’ हे चरित्र प्रत्येकाने आवर्जून वाचले पाहिजे.

 (उत्तरार्ध)

 [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या