‘स्थान’ माहात्म्य – चित्रकथीची ‘पंढरी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘चित्रकथी’ परंपरेला पैठण आणि पिंगुळी या दोन गावांची पार्श्वभूमी आहे. संभाजीनगर जिह्यातील पैठण येथील चित्रपरंपरेला ‘पैठण चित्रकथी’ तर सिंधुदुर्ग जिह्यातील पिंगुळी (ता. कुडाळ) येथील चित्रपरंपरेला ‘पिंगुळी चित्रकथी’ म्हणून ओळखले जाते. पैठण व पिंगुळी येथील चित्रशैली भिन्न स्वरूपाच्या आहेत. पूर्वी ‘चित्रकथी’ सादर करणारे कलाकार सचित्र पोथ्या घेऊन गावोगाव हिंडत आणि रात्रीच्या वेळी देवळाच्या आवारात चित्रकथीचे कार्यक्रम सादर करीत. नवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या तिथींना सादर होणाऱया या कार्यक्रमांना जागर म्हणून ओळखले जात असे.

कोकणच्या देवभूमीत, सिंधुदुर्ग जिह्याचे वैभव म्हणून परिचित असलेला ‘कुडाळ’ तालुका केवळ निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध नाही तर धार्मिक-आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि लोकसंस्कृतीतून निर्माण झालेल्या प्रथा-परंपरा यांचे सम्यक दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. येथे देव-देवतांचे संदर्भ जसे पुराणकाळाशी निगडित आहेत तसेच ते प्राचीन-अर्वाचीन संस्कृतीचे अविभाज्य घटकही आहेत. धर्म-अध्यात्म, संस्कृती आणि लोकजीवन येथे पूर्वापार गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे पाहावयास मिळते.

श्री कुडाळेश्वर, श्री कलेश्वर, श्री लक्ष्मीनारायण, श्री लिंगेश्वर, श्री रामेश्वर, श्री माऊली, श्री चामुंडेश्वरी, श्री योगिनी, श्री आर्यादुर्गा, श्री महालक्ष्मी अशी अनेक जागृत देवस्थाने कुडाळ तालुक्याच्या विविध गावांमध्ये वसलेली असून तेथील स्थानमाहात्म्याचे प्रत्यंतर व प्रचीती राखून आहेत. त्यासोबतच ‘कुडाळ’च्या पंचक्रोशीतील ‘पिंगुळी’ या गावी जन्मलेले, राहिलेले आणि तिथेच देह विसर्जित करून अवतारकार्याद्वारे जगभरात प्रसिद्धी पावलेले सत्पुरुष श्री राऊळ महाराज यांनी ‘पिंगुळी’चे स्थानमाहात्म्य वृद्धिंगत केलेले आहे. मुंबई-गोवा तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेला तीन कि.मी. अंतरावरील ‘पिंगुळी’ हे गाव ‘चित्रकथी’ या पारंपरिक लोककलेसाठी जगभरात सुपरिचित आहे.

मराठी विश्वकोशाच्या संदर्भ-माहितीनुसार सांगायचे झाले तर ‘चित्रकथी’ ही कथन व चित्रण (दृक-श्राव्य) अशा दुहेरी आविष्कारातून सादर होणारी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण लोककला अथवा ‘चित्र’परंपरा आहे. ‘चित्रकथी’मधील उपलब्ध चित्रे, कागदाचा आकार आणि त्यावर उमटवलेले छापाचे ठसे यावरून ती 18व्या शतकाचा उत्तरार्ध ते 19वे शतक या काळातील असावी असे अनुमान काढले जाते. चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात असत. पोथीचा काळ, रंगसंगती, चित्रकार व त्याची शैली यांमध्ये व्यक्तिसापेक्ष फरक पडलेला दिसतो. रामायण-महाभारत या आर्ष महाकाव्यातील कथाविषय या ‘चित्रकथी’चे मुख्य विषय असून त्यांत लोककथांचे चित्रणही आढळते.

‘चित्रकथी’ परंपरेला पैठण आणि पिंगुळी या दोन गावांची पार्श्वभूमी आहे. संभाजीनगर जिह्यातील पैठण येथील चित्रपरंपरेला ‘पैठण चित्रकथी’ तर सिंधुदुर्ग जिह्यातील पिंगुळी (ता. कुडाळ) येथील चित्रपरंपरेला ‘पिंगुळी चित्रकथी’ म्हणून ओळखले जाते. पैठण व पिंगुळी येथील चित्रशैली भिन्न स्वरुपाच्या आहेत. पूर्वी ‘चित्रकथी’ सादर करणारे कलाकार सचित्र पोथ्या घेऊन गावोगाव हिंडत आणि रात्रीच्या वेळी देवळाच्या आवारात चित्रकथीचे कार्यक्रम सादर करीत. नवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या तिथींना सादर होणाऱया या कार्यक्रमांना जागर म्हणून ओळखले जात असे. एक मुख्य कलाकार व दोन सहकलाकार कार्यक्रम सादर करीत असत. मुख्य कलाकार मांडी घालून बसे. त्याच्या उजवीकडे चित्रपोथी ठेवलेली असे. मांडीला टेकवून ठेवलेल्या आयताकार फळीवर मुख्य कलाकार पोथीतील एकेक चित्र ठेवून कथा (निरुपण) सांगत असे व प्रसंगानुसार गाणी म्हणत असे. अन्य साथीदार टाळ, डमरू, एकतारी ही वाद्ये वाजवून साथ देत असत. एका चित्राचे निरूपण संपले की दुसरे चित्र या पद्धतीने बोलीभाषा, प्राकृत व संस्कृतमधून उलगडल्या जाणाऱया कथांमध्ये मिथककथा असत. या विविध कथांच्या माध्यमातून समकालीन वा सामाजिक विषयांना स्पर्श करण्याचे वैशिष्टय़ही ‘चित्रकथी’मध्ये आढळत असे.

हिंदुस्थानी लघुचित्रपरंपरा, स्थानिक पद्धती आणि दक्षिण हिंदुस्थानातील चर्मपत्रावरील लोकचित्रे यांपासून ‘चित्रकथी’ ही चित्रशैली विकसित झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे. ‘चित्रकथी’मधील आकार ठसठशीत आणि लयदार रेषांनी काढलेले असून त्यांना ठळक बाह्यरेषा दिसून येत. बहुतांश चित्ररचना आडव्या आहेत. या ‘चित्रकथी’चे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे कथेशी निगडित असलेले निसर्गचित्रण चित्रांमध्ये सहसा आढळत नाहीत. कथेची घटना कोणत्या पार्श्वभूमीवर घडते हे कथेकरी स्वतःच निरुपणातून सांगत असल्यामुळे चित्रांमध्ये असे बारकावे अपवादाने दाखवले जात. त्यामुळे चित्राची पार्श्वभूमी बहुतांश सपाट असल्याचे दिसून येते. झाडे, प्राणी यांच्या आवश्यक प्रतिमा केवळ चित्रित केल्या जातात. चित्रांच्या वर अथवा खाली किंवा दोन्ही बाजूंना सरळ, वक्र रेषांचा वापर करून पट्टय़ा रंगवलेल्या दिसतात. व्यक्तिचित्रणात कपाळ रुंद, नाक टोकदार आणि कान दुहेरी वक्र रेषांनी दाखवलेले असून चेहरा व पाय बाजूने तर उर्वरित शरीर समोरून रेखाटलेले असते. या शैलीमध्ये डोळा मोठा, गोलाकार व संपूर्ण बुबूळ दिसते. चित्रांतील पुरुष बलवान, रुंद खांदे, भरदार छाती, अरुंद कंबर या शरीरसौष्ठवासह असून स्त्राrप्रतिमा विविध आभूषणांनी नटलेल्या दिसून येतात. कथानकानुसार वैचित्र्यपूर्ण प्राणी व राक्षसांच्या शरीरावर केस, त्वचा यांचे पोत दिसतात. चित्रकाराची कल्पनाशक्ती व कसब यांनुसार चित्र-प्रतिमा व रंगसंगतीमध्ये बदल दिसून येतो.

गावोगावी भटकंती करून मंदिरे, धमर्शाळांमधून चित्ररूपी ग्रंथांचे वाचन करणारी मंडळी म्हणजेच चित्रकथी समाज. पिंगुळी परिसरातील ठाकर समाज हा चित्रकथी समाज म्हणून ओळखला जातो. हुबेहूब चित्रांमधून, प्रभावी संवाद कौशल्यातून कथा जिवंत करणे हे चित्रकथी समाजाचे वैशिष्टय़पूर्ण कौशल्य आहे. चित्रकथी समाजातील कलावंतांनी हा परंपरेचा वारसा जोपासलेला आहे आणि जतन केलेला आहे.

पिंगुळी गावाचा अपवाद वगळता चित्रकथींची परंपरा संपुष्टात आली आहे म्हणून काही ठिकाणी चित्रकथी पशुपालनाचा जोडधंदा किंवा बाहुल्यांचे खेळ करतात. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, धुळे व पुणे जिह्यातील काही भागांत ‘चित्रकथी’ समाज आढळून येतो. महाराष्ट्रात ‘भटका विमुक्त समाज’ म्हणून शासनदरबारी नोंद झालेल्या या ‘चित्रकथी’ समाजाच्या परशुराम गंगावणे व गणपत मसगे यांनी पिंगुळी शैलीची मौखिक परंपरा जपलेली आहे. पिंगुळी ‘चित्रकथी’चे रिसर्च व डॉक्युमेंटेशन करताना ‘ठाकर आदिवासी कलाआंगण’ या ठाकर-कलांच्या संग्रहालयाची स्थापना करणाऱया परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.
n [email protected]