
>> यादव तरटे पाटील
पाऊस येण्याच्या अनेक सूचना निसर्ग देत असतो. तसेच पाऊस आल्यानंतर जैवविविधतेतील सजीवसुद्धा पाऊस आल्याची वर्दी देत असतात. एकंदरीतच मान्सूनबाबत सूचना देणाऱया सजीवांना आपण मान्सूनसूचक म्हणतो. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या सर्व सजीवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कीटक, पक्षी, प्राणी व वनस्पती यांच्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या सहजीवनाचं नातं मान्सून घट्ट करत असतो. मात्र, याच मान्सूनसूचकांना आता आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव!
मानव, प्राणी, पक्षी, फुलपाखरे यासह प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वासाठी पाणी महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर पाऊसस्वरूपात पर्जन्य येण्याची प्रक्रिया ही नवसंजीवन देणारी ठरते. एकूणच काय, तर पाऊस नसेल तर संपूर्ण पृथ्वीवरील संतुलन बिघडायला लागते. प्रत्येक सजीवाच्या दृष्टीने पर्यावरण संतुलन व जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने पर्जन्य अतिशय महत्त्वाचे आहे. एकीकडे बळीराजाही आकाशाकडे डोळे लावून बघत होता. कधी वरुणराजा बरसेल व बळीराजाच्या काळजाला गारवा पोहोचेल. अर्धाअधिक जून महिना संपत आल्यानंतर वरुणराजाची कृपा झाली, तर दुसरीकडे अनेक प्राणी, पक्षी, फुलपाखरेसुद्धा पावसाच्या प्रतीक्षेने व्याकूळ झाले होते. अनेक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम म्हणजे पावसाळा होय. पाऊस उशिरा आल्याने अनेक पक्ष्यांचा पाळणादेखील लांबला. कीटकांची दुनियासुद्धा याच मोसमात अधिक सक्रिय होते. तिलाही पाऊस येईपर्यंत ताटकळत बसावं लागलं. एकूणच ही संपूर्ण अन्न साखळी व पर्जन्य यांचं सहजीवन अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. निसर्गातील उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक व तृतीयक भक्षक यांच्यासह संपूर्ण अन्नजाळ्याचे अस्तित्व केवळ आणि केवळ पावसावर अवलंबून आहे.
पाऊस येण्याच्या अनेक सूचना निसर्ग देत असतो. तसेच पाऊस आल्यानंतर जैवविविधतेतील सजीवसुद्धा पाऊस आल्याची वर्दी देत असतात. एकंदरीतच मान्सूनबाबत सूचना देणाऱया सजीवांना आपण मान्सून सूचक म्हणतो. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या सर्व सजीवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कीटक, पक्षी, प्राणी व वनस्पती यांच्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या सहजीवनाचं नातं मान्सून घट्ट करत असतो. मात्र, याच मान्सून सूचकांना आता आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव! मात्र, केवळ मानवाच्या अस्तित्वामुळे या सूचकांच्या वाटय़ाला आल्याचं चित्र अगदी स्पष्ट आहे. इतकं असूनही आपण आपलं जीवन जगण्यात रममाण आहोत. कुणालाच कसलीही चिंता नाही. विकासाची एकचाकी गाडी सुसाट वेगाने धावत सुटली आहे. मान्सून सूचकांची पर्यायाने निसर्गाची हानी करून साधलेला विकास आम्हाला निश्चितच विनाशाकडे नेणारा आहे. जागतिक पातळीवर शाश्वत विकास व ध्येयाबाबतची उद्दिष्टे व त्यांची पूर्तता यांचा विचार केल्यास आम्ही यात किती मागे आहोत यासाठी हे उदाहरण वास्तव असल्याचे यातून स्पष्ट होते. पर्यावरण संतुलन आम्हाला राखायचं असेल तर मान्सून सूचकांना आम्ही जपलं पाहिजे. तरच शेतकरी व कृषी व्यवस्था मोडकळीस येणार नाही. अन्यथा लवकरच आमच्यावर उपासमारीची वेळ येईल हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.
मृग नक्षत्राची चाहूल लागली रे लागली की, जंगलात मोरांचा ‘केकारव’ सुरू होतो. मोर अगदी ‘थुयथुय’ नाचायला लागतात. जणू वर्षा ऋतूचे ते स्वागतच करतात की काय असे वाटते. मात्र, वरुणराजा रुसून बसण्याची चिन्हे दिसू लागले की, पक्ष्यांचे आयुष्य प्रभावित होते. मागील वर्षीसुद्धा पाऊस उशीरच आला होता. मोरांच्या नाचण्याला तसेच केकारवाला कोणताही प्रतिसाद वरुणराजा देत नसल्याचे चित्र होते. मोर, तितरसारखे जमिनीवर घरटे करणारे पक्षी, तर चातक, नवरंगसारखे आपल्या भागात स्थलांतर करून येणारे पक्षी आणि स्वर्गीय नर्तक, महाभृंगराज, मोठा बगळा, छोटा बगळा, पाणबगळा व ढोकरीसारखे स्थानिक पक्षी व समूहाने घरटी करणाऱया अनेक पक्ष्यांची वीण प्रभावित झाली होती. मोर, तितरसारखे पक्षी जमिनीवर घरटी करतात. त्यांच्या घरटय़ांना आवश्यक आडोसा व आवश्यक तापमान हे पावसाळ्यातच मिळते. चातक, नवरंग व निळ्या शेपटीचा वेडा राघू हे पक्षी केवळ विणीकरिताच आपल्या भागात उत्तरेकडून स्थलांतर करून येतात, तर मोठा बगळा, छोटा बगळा, पाणबगळा व ढोकरीसारखे स्थानिक पक्षी समूहाने मोठय़ा झाडावर घरटी करतात. त्यांना मोठे हिरवे झाड हवे असते. जिथे ते घरटी करतात ते झाड मोठय़ा पाणथळ ठिकाणी असते. कारण विणीच्या हंगामात त्यांना भरपूर खाद्याची गरज असते. मोठय़ा पाणथळ ठिकाणी भरपूर प्रमाणात मासे असल्याकारणाने त्यांची ही गरज सहज पूर्ण होते. मात्र, आज नद्या, तलाव कोरडे होत आहेत. आहे त्या पाण्यातसुद्धा मासे कमी आहेत आणि दुसरीकडे पावसाळा ऋतू खऱया अर्थाने सुरू न झाल्याने त्यांच्या विणीवर परिणाम होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नवरंग, निळ्या शेपटीचा वेडा राघू यांचाही विणीचा हंगाम हाच आहे. त्यांनासुद्धा मोठय़ा प्रमाणात फुलपाखरे, पतंग, चतुर व इतर कीटक खायला लागतात. पाऊस उशिरा आल्याने किंवा न आल्यामुळे संपूर्ण कीटकांच्या संख्येवर प्रभाव होतो. मुख्यतः पावसाळ्यातच फुलपाखरे, चतुर व पतंग यांची घनता खूप असते. पाऊस लांबल्याने अंडी उबविण्यास आवश्यक वातावरण न मिळणे, तर दुसरीकडे खाद्याची कमतरता अशी दोन्ही बाजूने पक्ष्यांची गोची होण्याची शक्यता असते.
सगळीकडे मृग नक्षत्राचा संकेत देणारा म्हणजेच मान्सूनची नांदी देणारा गोसावी व इतर कीटक धोक्यात असून त्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. पर्यावरणात व शेतीशिवारात त्यांचे अस्तित्व शेतकऱयांच्या फायद्याचे आहे. फुलपाखरे, मधमाश्या, भुंगे, मुंग्या, नाकतोडे, वाळवी हेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. यातील सर्वात आकर्षक म्हणजे ‘मृगाचा काळा किडा’ व ‘गोसावी’ होय. मृगाची सुरुवात होताच शेतीशिवार व इतर भागात ‘काळा किडा’ दिसतो. त्यावरून मृगाचा पाऊस आहे असा शेतकऱयांना नैसर्गिक संकेत मिळतो. अवकाळी पाऊस व मृगाचा पाऊस यातील फरक या कीटक सृष्टीच्या अस्तित्वातून सहज लक्षात येतो. मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा, भगव्या रंगाचा अन् धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल करून बसणारा मखमली कीटक आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ‘रेड वेल्वेट माईट’ असे त्याचे नाव असून ग्रामीण भागात त्याला ‘गोसावी’ किंवा ‘साधू’ नावानेही ओळखले जाते.
कृषी परिस्थितिकीमध्ये वाढते रसायन व औषधामुळे अनेक सूक्ष्म जीव व कीटकांचे जीवन धोक्यात सापडले आहे. गेल्या काही वर्षांत शेतीत रासायनिक खाते व कीटकनाशके यांचा वाढता वापर त्यांच्या जीवावर बेतत आहे. पहिल्या पावसानंतर शेती व जंगल परिसरात हा आढळून येतो. हा कीटक अतिशय संवेदनशील असून धोक्याचा स्पर्श होताच एकदम निर्जीव होऊन शांत बसतो. जणू मरण पावलाच की काय असे भासवतो. कुजलेल्या पानाचे बारीक कण व लहान सूक्ष्म जीव याचे मुख्य खाद्य आहे. याचे आयुष्य अवघे चार महिन्यांचे असते. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्व असणारे हे कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतीसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी हा धोकादायक नसून हा पूर्णतः निरुपद्रवी आहे. गेल्या काही वर्षांत त्याची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. परिसंस्थेतील अन्नजाळ्यात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कीटक हे पक्षी, साप, सरडे यांचे मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला आहे. म्हणूनच शाश्वत शेती व शाश्वत विकासाची जीवनशैली आपण आत्मसात करणे हीच खरी काळाची गरज आहे. तरच आपले अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहील.
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य आहेत)





























































