जागर – वाघांचे वैविध्य संपण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे-पाटील

वाघांच्या स्थलांतरण मार्गाकडे होणारे दुर्लक्ष, मानवी हस्तक्षेप तसेच अधिवास खंडित होण्यामुळे वाघांचे समूहातच प्रजनन होण्याची शक्यता बळावली असल्याचे एका निष्कर्षातून पुढे आलंय. हिंदुस्थानातील वाघांचे अनुवंशिक वैविध्य संपण्याची भीती या क्षेत्रातील संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

व्याघ्र अधिवासात मानवाचा वाढता हस्तक्षेप व व्याघ्र संचार मार्गाची झालेली अवनती हा चिंतेचा विषय आहे. वाघ असलेल्या प्रदेशात वेगाने होणारा बदल हा प्रतिकूलतेकडे जाणारा प्रवास आहे. वन जमिनीवरील वाढते अतिक्रमण, धोक्यात आलेले व्याघ्र संचार मार्ग, शिकार, अवैध व्यापार, निर्वनीकरण, रस्ते आणि विकास प्रकल्प यातून व्याघ्र अधिवास धोक्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत कमी झालेली वाघांची संख्या एकीकडे वाढली तर दुसरीकडे लोकसंख्येतदेखील मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या शतकात वाघांच्या अधिवासात एकूण 57 टक्के लोकसंख्या वाढ झाली आहे. म्हणजेच माणूस जंगलाकडे व पर्यायाने वाघ गावांकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मानव व वन्यजीव संघर्ष रुद्र रूप धारण करतोय. जंगलात गेलेले लोक वाघांचा बळी ठरत आहेत तर दुसरीकडे वाघांना आपला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. शिकार रोखण्यात व काही प्रमाणात निर्बंध बसविण्यात यश जरी आलं असलं तरी व्याघ्र भूमी असलेल्या देशाला लागलेली ही एक मोठी कीडच म्हणावी लागेल. नुकतीच यवतमाळ जिह्यातील गर्भवती वाघिणीला गुहेत जाळून ठार केल्याची घटना अत्यंत भयंकर आहे. या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. महाराष्ट्रातील एकूण वीज उत्पादनापैकी 70 टक्के वीज कोळशापासून तयार होते. कोळसा महाराष्ट्राच्या विदर्भातील जंगल भागात अधिक आहे. जोपर्यंत जंगलांमध्ये कोळशांच्या खाणी खोदल्या जाणार नाहीत आणि कोळसा वीज कारखान्यापर्यंत नेला जाणार नाही तोपर्यंत मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भागांत प्रकाश पडणार नाही. हे वास्तव नाकारून चालणार नाही. हे वाघांच्या अधिवासावर व वाघांच्या संचार मार्गांवर प्रतिकूल परिणाम करणारे आहे.

व्याघ्र प्रकल्पामुळे जरी वाघांना व तेथील अधिवासाला सुरक्षा प्रदान झाली असली तरी संचार मार्गांची मात्र आज प्रचंड दुरावस्था होताना दिसते आहे. वाघांच्या स्थलांतरण मार्गाकडे होणारे दुर्लक्ष, मानवी हस्तक्षेप तसेच अधिवास खंडित होण्यामुळे समूहातच प्रजनन होण्याची शक्यता बळावली असल्याचे एका निष्कर्षातून पुढे आलंय. हिंदुस्थानातील वाघांचे अनुवंशिक वैविध्य संपण्याची भीती या क्षेत्रातील संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इवॉल्युशन’ या शोधपत्रिकेत यावर एक शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे.

एकीकडे हिंदुस्थानातील वाघांची संख्या गेल्या बारा वर्षांत दुप्पट झाली आहे. सन 2006मध्ये 1411 तर सन 2018मध्ये 2967 वाघांची संख्या व्याघ्रगणनेतून समोर आली आहे. तर मानवी हस्तक्षेप आणि प्रकल्पांमुळे वाघांच्या अधिवास क्षेत्रात घट होत आहे. जंगलातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या त्यांच्या स्थलांतरण मार्गातदेखील अडथळे आहेत. महाराष्ट्रातील वाघांना हा धोका सर्वाधिक आहे. कारण दोन जंगलांतील संचारमार्गाच्या व्यवस्थापनात आपण कमी पडलो आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. संचारमार्गाच्या संवर्धनाच्या बाबतीत अधिक गांभीर्य नसल्याने समूहातच प्रजनन होण्याचा सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे. अधिवासाच्या आणि जोडीदाराच्या शोधात वाघाचे स्थलांतरण होते हे सर्वश्रुतच आहे. लांब पल्ल्याच्या वाघाच्या स्थलांतरणाची नोंदही हिंदुस्थानात महाराष्ट्रातच आहे. सन 2014 साली वर्धा जिल्हय़ातील बोर व्याघ्र प्रकल्पातून एका वाघाचे अमरावती जिल्हय़ातील पोहरा-मालखेडच्या जंगलात तर सन 2016 साली नागपूर जिल्हय़ातील कळमेश्वर-कोंढाळी येथून एका वाघाने याच जंगलात स्थलांतर केले होते. बोरमधील टी-27 वाघीण स्थलांतरणाच्या प्रयत्नात वीज प्रवाहाचा शिकार ठरली. टिपेश्वर अभयारण्यातून सी-1 वाघ चक्क तीन हजार कि.मी.चे अंतर कापून ज्ञानगंगा अभयारण्यात आल्याची घटनाही ताजीच आहे. यातून संचार मार्गांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात वाघ सुरक्षित आहेत, पण त्यांच्या संचारमार्गात आपले वाघ किती सुरक्षित हे मोठे आवाहन आहे. तसेच संचार मार्गात येणारे विविध अडथळेदेखील आहेतच. जोडीदाराच्या शोधमार्गातील या अडथळय़ांमुळे आपल्याच समूहातील वाघांसोबत मीलन होऊन प्रजनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव नागझिरा व मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व देशातील इतर वाघांना स्थलांतर करावायचे असल्यास दोन व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा संचार मार्ग अशा वेळी संजीवनी ठरते. नुकतेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 16व्या बैठकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका वेळी दहा वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्र व कान्हारगाव हे राज्यातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले. राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. शाश्वत विकासाच्या केवळ गप्पा न करता वने व वन्यजीव संवर्धनासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एक नवा पायंडा पाडलाय.

संचारमार्गाच्या संवर्धनासाठी हे अतिशय महत्त्वाचे व धाडशी पाऊल असले तरीही व्यवस्थापनाचे गांभीर्य असेल तरच भविष्यातील ही भीती टाळता येणे शक्य आहे. वाघांसाठी संरक्षित असलेल्या क्षेत्रात वाघ सुरक्षित असले तरीही संचारमार्ग खंडित असल्याने एकाच कुळातील वाघांबरोबर त्यांचे मीलन होण्याची शक्यता अधिक आहे. भविष्यात ही भीती खरी ठरल्यास वाघांची पिढी दिव्यांग ठरण्याचा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर इतर क्षेत्रातील जोडीदाराच्या शोधासाठी वाघांचे संचारमार्ग आधी सुरक्षित करावे लागतील. दोन वाघांच्या जेनेटिकल ट्रान्सफोर्मेशनसाठी दुवा ठरणारे संचार मार्ग केवळ वाघांसाठीच महत्त्वाचे नसून रानकुत्रा, रानगवा इत्यादी प्राण्यांसाठीसुद्धा ते तितकेच महत्त्वाचे आहेत. संचार मार्ग जपले तरच वन्यजीव संवर्धनाच्या यशाला महत्त्व राहील.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आहेत)

– www.yadavtartepatil.com