सिनेविश्व – वेगळा आणि परिपक्व अजय देवगनचा ‘मैदान’

>> दिलीप ठाकूर

काही योग अचानक घडून येतात आणि सुखद धक्का बसतो… चित्रपटांच्या जगात हे अनेकदा घडते. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटाचा जुहूच्या एका मल्टिप्लेक्समधील विशेष खेळ संपला आणि आम्हा काही समीक्षक व विश्लेषकांची अजय देवगनशी औपचारिक भेट घडवून आणली गेली.

‘मैदान’ हा अजय देवगनचा मनोरंजनाची चौकट सांभाळून एका विशिष्ट कालखंडावर, वास्तव घटनांवर आधारित क्रीडापट आहे. हा चित्रपट 1952 ते 1962 या कालखंडातील फूटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम (अजय देवगन) हिंदुस्थानी फूटबॉल संघाची अथक परिश्रमाने कशा पद्धतीने रचना करतो आणि निवड समितीतील त्याच्या विरोधातील राजकारण, त्याचे अचानक उद्भवलेले कर्करोगाचे आजारपण या सगळ्यातून जात जगभरातील फूटबॉल स्पर्धेत आपला हिंदुस्थानी संघ विजयी ठरतो याभोवती हा 181 मिनिटांचा चित्रपट आहे. (दुर्दैवाने 1962 नंतर भारतीय फूटबॉल संघाने एशियन स्पर्धेत यश प्राप्त केलेले नाही). याची कथा कोलकात्यात घडते. त्यामुळे बंगाली वातावरण, बंगाली वळणाचे हिंदी, इतकेच नव्हे तर अनेक बंगाली कलाकार यात आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध सत्तर मिनिटांचा आहे. उत्तरार्धात चित्रपट विलक्षण वेग घेतो. छायाचित्रकार तुषार कांती आपल्या कौशल्य, कसब, करामत यातून आपण जणू जगभरातील विविध स्टेडियमवर बसून फूटबॉल सामन्याचा थरार अनुभवतोय असा फील देण्यात यशस्वी ठरलाय. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर व झी स्टुडिओ यांची आहे. लेखन सायविन क्वाड्रस, आकाश चावला, अरुणव रॉय सेनगुप्ता व अतुल शाही यांचे आहे. संवाद रितेश शहा यांचे आहेत. चित्रपटाचा विषय, त्याचा कालखंड, अनेक घटना यांची व्याप्ती पाहता त्याच्या पटकथा लेखनासाठी असा मोठा संच हवाच होता. जो प्रभावी ठरला आहे. प्रियामणी, गजराव राव, रुद्रनील घोष इत्यादी अपरिचित चेहरे असणे या चित्रपटाच्या पथ्यावर पडले आहे. चित्रपटाला मनोज मुंतशीर यांची गीते व ए. आर. रेहमान यांचे संगीत असून त्याला फारसा वाव नाही. देवराव जाधव यांच्या संकलनाचा खास उल्लेख हवाच. कारण या चित्रपटात मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्स आहेत. अशा वेळी काम्प्युटरवरील करामतीत पटकथेचा तोल सांभाळणे कठीण होते. त्यात संकलनाने बाजी मारलीय. विविध खेळांवरील हिंदी चित्रपटांच्या परंपरेतील हा वेगळा चित्रपट.

या सगळ्यात अजय देवगन खूपच महत्त्वाचा. कुकू कोहली दिग्दर्शित ‘फूल और कांटे’ (1991) या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाने त्याला ‘गुंडा हीरो’ अशी प्रतिमा मिळाली तरी समीक्षकांची दाद व अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवण्यास संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’, राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘लीजंडस् ऑफ भगतसिंग’ या चित्रपटांतील अभिनय उपयुक्त ठरला. ‘भगतसिंग’साठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कंपनी’, मीलन लुथरिया दिग्दर्शित ‘कच्चे धागे’  एकीकडे, तर दुसरीकडे ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी’ अशा विविधता सारख्याच प्रमाणात प्रभावीपणे त्याने साकारल्या. ‘मैदान’मधील सय्यद अब्दुल रहीम ही फूटबॉल प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा अजय देवगनच्या रुपेरी वाटचालीत आणखी एक सर्वोत्तम भूमिका आहे. एक वेगळा आणि परिपक्व अजय देवगन पाहायला मिळाला हेच ‘मैदान’चे विशेष. अजय देवगनच्या हसून व्यक्त होण्यात त्याची परिपक्वता दिसली आणि बोलण्यापेक्षा आपले कामच बोलत आहे हा विश्वासही त्यात दिसला.

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार समीक्षक आहेत)