सिनेविश्व – रणवीर सिंगची भिन्न रूपे

>> दिलीप ठाकूर

विजय पाटकर असो वा सिद्धार्थ जाधव, त्यांना रणवीर सिंगसोबत काम केलेल्या अनुभवाबद्दल  विचारताच ते पटकन विलक्षण चार्ज होतात आणि शूटिंगच्या वेळेस सेटवरचं वातावरण अतिशय हसतं खेळतं, प्रफुल्लित ठेवणारा कलाकार म्हणून रणवीर सिंगचा पटकन उल्लेख करतात. तो नवीन होता तेव्हा आणि स्टार झाल्यावरही तो तसाच उत्स्फूर्त, दिलखुलासच वागतो.  दीपिका पदुकोणला त्याचा हाच गुण आवडला असावा.

आपल्या मेहनतीने रणवीर सिंगने चित्रपटसृष्टीत छान नि भक्कम स्थान निर्माण केलं आहे, पण म्हणून काही तो भारंभार चित्रपट स्वीकारत नाही. एकेक चित्रपट भारी असावा यावर त्याचा ‘फोकस’ दिसतोय. एकाच वेळेस अनेक चित्रपट स्वीकारायचे तर बराचसा वेळ स्टोरी सीटिंग, नृत्याची रिहर्सल, स्टुडिओतील सेट, देशविदेशातील आऊटडोअर्स, त्याचं प्रमोशन, प्रीमियर, रेड कार्पेट, पार्टीज यात जाणार. आपला फिटनेस, विदेशातून शूटिंग करून आल्यावर स्वतसाठी वेळ देणं, ओटीटीवर जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट पाहणं, घरात राहण्याचा आनंद घेणं, सोशल मीडियात डोकावणं, बायकोला वेळ देणं (हे मध्यमवर्गीयांप्रमाणेच सेलिब्रिटीजमध्येही असते हो!) काही पथ्ये सगळीकडे सारखीच.

रणवीर सिंग सध्या कोणत्या चित्रपटात बिझी आहे? तर तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’,  फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3- द चेस एन्ड’ आणि प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘राक्षस’ असे तीन प्रकारचे तीन चित्रपट तो करत आहे. ‘सिंघम’ आता ब्रॅण्डनेम झालंय. मूळ चंद्रा बारोट दिग्दर्शित ‘डॉन’चा (1978) फरहान अख्तरने रिमेक करताना शाहरुख खानला ‘डॉन’ ( 2006)  केले. मग त्याचाच सिक्वेल

‘डॉन 2’ (2011) मध्ये पुन्हा शाहरुखच होता. पण आता ‘डॉन 3’ मध्ये शाहरुख नसला तरी सुजोय घोष दिग्दर्शित ‘किंग’मध्ये तो ‘डॉन’ साकारतोय. त्यात त्याची मुलगी सुहाना आहे आणि नायिका कियारा अडवाणी आहे. शाहरुखचा ‘किंग’मधला डॉन आणि रणवीर सिंगचा ‘डॉन’ यांची तुलना होणारच. शाहरुख सहजासहजी हरणारा नाही, पण रणवीरला हरवणंही सोपं काम नाही. ही स्पर्धा फार रंजक बनेल.

‘राक्षस’ हा नायक नाही, खलनायक असून हा पीरियड  सिनेमा आहे. रणवीरने संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावत’मध्ये अल्लादिन खिलजी ही अतिशय क्रूरकर्मा व्यक्तिरेखा साकारली. तर असे अंतर राखून रणवीरचे तीन चित्रपट दणक्यात 2025 मध्य येणारे आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेच्या जरा जास्तच खोलात जात असलेल्या रणवीर सिंगने आपलं खणखणीत नाणं नेमक्याच चित्रपटात खर्च केलं तर ते जास्त चालणारं आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘83’ हा शून्यावर बाद झाला असला तरी कपिल देव साकारताना त्याने घेतलेल्या जीवतोड कामाची आजही तारीफ होतेय. हिंदुस्थानी क्रिकेट संघाने 1983 साली इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकला यावर याची कथा बेतलेली होती. त्यात त्याने बरीच मेहनत घेतली होती.

रणवीर सिंग एकाच वेळेस वैविध्य असलेल्या तीन प्रकारच्या भूमिका साकारतोय. त्यासाठी तो बक्कळ मेहनत घेणारच आणि तेही मनसोक्त मनमुराद आनंदाने घेणार…आणि पडद्यावर ते तसंच रंगतदार होऊन येणार.

 (लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)

[email protected]