
>> नीलेश कुलकर्णी
गुजरातमध्ये भाजप मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी उतावीळ असल्याची टीका ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. गुजरातमधल्या भाजपच्या हालचाली पाहिल्या तर लगीनघाईमागे काहीतरी गडबड नक्कीच दिसते. गुजरातच्या तमाम भाजप कार्यकर्त्यांना त्या पक्षाने 2 ते 5 मे अशी अधिकृत सुट्टीच जाहीर केल्याने संशयाला बळकटी मिळत आहे. मात्र सामान्यपणे गुजरातमध्ये मान्सून 15 जूनला येतो. त्यानंतर पावसाळा असल्याने लगेचच निवडणुका होतील असे वाटत नाही खरे. मात्र ‘मोदी है तो मुमकीन है,’ हा ‘राष्ट्रीय नारा’ असल्याने काहीही होऊ शकते.
गुजरात विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश असला तरी सध्या तिथे घडत असलेल्या वेगवान घडामोडींमुळे गुजरातमध्ये कसली ‘लगीनघाई’ सुरूय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना बुलडोझरवर चढवून भाजपने गुजरातच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवला. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक असली की कोणीतरी विदेशी पाहुणा तिकडे टपकतो. त्यानंतर तथाकथित ‘गुजरात मॉडेलची चालिसा’ म्हटल्यानंतर निवडणुकीचा माहौल तयार होतो. गेल्या वेळी जपानचे शिंजो आबे होते. यंदा जॉन्सन यांनी गुजरातमध्ये माहोल तयार केला आहे. 27 वर्षांच्या सत्तेच्या विरोधात तयार झालेल्या ‘ऍण्टी इन्कमबन्सी’ला मोडीत काढून गुजरात पुन्हा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
गुजरात विधानसभा हे भाजपपुढचे यावेळचे मोठे आव्हान असेल. राज्यातील 27 वर्षांची सत्ता आणि केंद्रातील आठ वर्षांची सत्ता यांच्याविरोधातील ऍण्टी इन्कमबन्सी आणि विजय रूपानी यांच्या कार्यकाळात कोरोनामध्ये जनतेची झालेली ससेहोलपट या प्रमुख कारणांमुळे भाजपने ही निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेतली आहे. उत्तर प्रदेशचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये रोड शो करताना दिसले यावरूनच हे गांभीर्य लक्षात यावे. अर्थात जे गांभीर्य सर्वसत्ताधीश असूनही मोदी दाखवतात त्याबाबतीत काँग्रेसमध्ये आनंदीआनंद आहे. काँग्रेस सोडण्याच्या धमक्या देऊन हार्दिक पटेल थकले तरी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला कोणाला वेळ नाही. काँग्रेस सुस्तावलेली पाहून केजरीवालांनी गुजरातमध्येही हातपाय मारायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये मुक्कामासाठी एका घराच्या शोधात केजरीवाल आहेत. निवडणूक कशी नेटाने लढावी हे काँग्रेसच्या गुजरातच्या पुढाऱ्यांनी केजरीवालांकडून शिकले तरी ते पुरेसे ठरेल. रूपानी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवताना भाजप नेतृत्वाने संपूर्ण मंत्रिमंडळच बदलून टाकण्याचे धाडसी पाऊल टाकले होते. गेल्या 27 वर्षांत अनेक आमदार व मंत्र्यांविरोधात तयार झालेल्या जनमताचा फटका पक्षाला बसू नये हा त्यामागचा धोरणी हेतू होता. आताही जवळपास 60 टक्के भाजप आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याची चर्चा आहे. रूपाणींच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार विशेषतः कोरोना काळात गैरव्यवस्थापनामुळे भाजप सरकारविरोधात गुजरातमध्ये निश्चितच एक वातावरण आहे, मात्र त्या वातावरणाचा फायदा घेण्याइतपतही बळ विरोधकांकडे नाही. काँग्रेसला गुजरातमध्ये निवडणुका आहेत हे सांगून ‘जागे’ करण्याइतपत परिस्थिती आहे. ‘आप’ची ताकद मर्यादित आहे. काँग्रेसने ताकद पणाला लावली तर यावेळी गुजरातमध्ये चमत्कार होऊ शकतो.
‘कमल’ विमानतळ आणि येडियुरप्पा…
कर्नाटकमध्ये भाजपने नेतृत्व परिवर्तन करून येडियुरप्पांच्या जागी बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली असली तरी तिथली भाजप अजूनही ‘येडियुरप्पा फोबिया’तून बाहेर पडलेली नाही. येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरून काढल्याने मोठय़ा प्रमाणावर असलेला लिंगायत समाज नाराज आहे. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची धास्ती भाजपला आहे. त्यामुळेच लिंगायत मतपेढीला चुचकारण्यासाठी बोम्मई सरकारने शिमोगाच्या विमानतळाला येडियुरप्पांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे कर्नाटकचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. वास्तविक, इहलोकास गेलेल्या नेत्याचे किंवा महनीय व्यक्तीचे नाव विमानतळास देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. येडियुरप्पांना भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्रीपदावरून काढले, मग अशा माणसाचे नाव विमानतळाला द्यावे का, असा सवाल विचारत विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे बोम्मई यांची चांगलीच फसगत झाली आहे. येडियुरप्पांच्या नावाची घोषणा झालेले हे प्रस्तावित विमानतळ कमळाच्या आकारचे आहे हे विशेष. सार्वजनिक व सरकारी आस्थापनांच्या कार्यालयाला पक्षीय चिन्हांत साकारणाऱ्या सरकारच्या ‘कल्पकते’चे कौतुक करावे तितके थोडे!! याविरोधातही विरोधकांनी रान उठवल्याने आता विमानतळावर खुलू पाहणारे कमळ कोमेजले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती आहे.
असेही ‘वास्तव’
राज्यसभेची खासदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये ‘एक अनार सौ बीमार’ अशी परिस्थिती आहे. काँग्रेस एकामागून एक राज्ये गमावत असल्याने राज्यसभेतील खासदारांची संख्या रोडावलेली आहेच. शिवाय खूपच कमी संधी निर्माण झाली आहे. आता ही संधी साधण्यासाठी काँग्रेसमधील धुरीण डोकेबाज मंडळींनी आपली शक्कल लावली आहे. राज्यसभेत परतण्यासाठी जी 23 चे गुलामनबी आझाद, आनंद शर्मा ही मंडळी तगमगत असताना बिहारमधून तारीक अन्वर यांनीही राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने कामाला लागलेला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याबाबतीत एक अफलातून किस्सा घडला. वासनिक हे त्यांच्या पत्नी रवीना खुराणा यांच्यासह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटायला गेले. ख्यालीखुशाली विचारून झाल्यानंतर रवीना यांनी लगेचच सोनियाजींना, ‘हमारी दिल्ली में रहनी की व्यवस्था नही है. मुकुलजी को राज्यसभा भेज दिजीए,’ अशी विनंती केल्यानंतर सोनियांसह मुकुल वासनिकांच्या चेहऱ्यावरचेही रंग उडाले. सपत्नीक हायकमांडच्या भेटीला जाणे हे वासनिकांच्या पथ्यावर पडते की महागात पडते हे यथावकाश कळेलच, मात्र दिल्लीत राहण्याची व्यवस्था नाही, त्यासाठी खासदार करा हीदेखील राज्यसभेवर वर्णी लागण्यासाठी एक मागणी असू शकते, हेही मनोरंजक वास्तव यानिमित्ताने पुढे आले.

























































