दिल्ली डायरी – समाजवादी पार्टीत चाललंय तरी काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी  

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पार पडून नवे सरकार सत्तारूढ झाले असले तरी समाजवादी पार्टीच्या परिवारात अजूनही ‘पराभवाचे कवित्व’ सुरूच आहे. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात समाजवादी पार्टीच्या ‘मायी’ (मुस्लिम – यादव) समीकरणावर बुलडोझर चालविण्याचा  प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे. त्यासाठी आझम खान यांचा वापर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. आझम खान यांचे जवळचे खासदार शफी उर रहीम यांनी त्यातूनच ‘अखिलेश यांना मुस्लिमांची चिंता नाही,’ अशी आरोळी ठोकली आहे. समाजवादी पार्टीत चाललंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेशची सत्ता न मिळाल्यामुळे एकूणच समाजवादी पार्टीची अवस्था ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’ अशी झालेली आहे. अशा स्थितीत समाजवादी पार्टीविरोधात विधाने करून त्या पक्षाचे खासदार शफी उर रहीम यांनी अखिलेश यांना मुस्लिमांची काहीही चिंता नाही, अशी आरोळी निवडणुकीनंतर उघडपणे ठोकली आहे. अखिलेश यांचे ‘चाचा’ आझम खान सध्या भाजपप्रणीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या नियंत्रणाखाली आहेत. आझम खान यांना समाजवादी पार्टीपासून वेगळे काढून त्यांना मुस्लिमांचा नवा पक्ष काढण्यास बाध्य करायचे आणि त्या बदल्यात आझममियाँभोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास ढिला सोडायचा असे मेतकूट उभय पक्षात बनले आहे. ओवेसींनी गेल्या निवडणुकीत भाजपची ‘टीम बी’ म्हणून उत्तम काम केलेले असले तरी भाजपला आणखीनही सक्षम पर्याय हवा असल्याने रोहेलखंडासहित उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांमध्ये चांगला प्रभाव असलेल्या आझममियाँची निवड करण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही रणनीती ठरविण्यात आली आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि प्रचारकी भाषणे या जोरावर सध्या देशाचा कारभार सुरू आहे.

आता भाजपने समाजवादी पार्टीच्या मायी (मुस्लिम यादव) या समीकरणावरच ‘बुलडोझर’ चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद न दिल्याने अधूनमधून रुसत असणारे अखिलेश यांचे काका शिवपाल यावेळी जास्तच नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपने शिवपाल यांना एकीकडे ‘लॉलीपॉप’ दाखवलेला असताना दुसरीकडे तुरुंगात राहून जर्जर झालेल्या आझम खान यांना सुटकेसाठीचा इलाज सुचवला आहे. त्यामुळे ‘आझम कॅम्प’मधून अखिलेश यांच्याविरोधात लिहून दिलेल्या ‘क्रिप्ट’नुसार मुस्लिमविरोधाची बांग दिली जात आहे. आयुष्यभर मुलायमसिंग यादवांच्या आशीर्वादावर सत्तेत राहिलेल्या आझम खान यांना उत्तारायुष्यात अखिलेश व समाजवादी पार्टी मुस्लिमविरोधी असल्याचा जावईशोध लागावा हाच मुळात विनोद आहे. दिल्लीतून ठरवून दिलेल्या रणनीतीनुसार आझम समर्थक खासदार शफी उर आणि त्यांच्या मीडिया सल्लागाराने उघडपणे अखिलेश यांच्याविरोधात आवाज उठविल्यानंतर आझम खान यांना वेगवेगळय़ा प्रकरणांमधून दिलासा मिळत आहे. बहेनजी मायावतींना केंद्रीय यंत्रणांच्या धाकाच्या जोरावर ‘वश’ केल्यानंतर आता समाजवादी पार्टीच्या मुळावरच घाव घालून ‘मायी’ समीकरण तोडण्यासाठी भाजपश्रेष्ठी पुढे सरसावले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी मुलायमसिंग यांच्यापुढे पक्षाच्या भवितव्याबाबत मोठे आव्हान उभे आहे. अखिलेश ही परिस्थिती कशी हाताळतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. ध्रुवीकरणाचा धोका ओळखून अखिलेश यांनी ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा राग आळवला होता. परशुराम जयंतीच्या मिरवणुकीतही अखिलेश दंग झाले होते, मात्र त्यामुळे त्यांच्या राजकारणाची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. या चक्रव्यूहातून अखिलेश कसे बाहेर पडतात यावर समाजवादी पार्टी आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाचे भवितव्य अवलंबून असेल. अखिलेश दिल्लीच्या ट्रपमध्ये अडकले तर ती समाजवादी पार्टीसाठी शोकांतिका ठरेल हे नक्की!

राहुल गांधींचा ‘कडक अवतार’

राहुल गांधी तसे मृद्भाषी नेते म्हणून ओळखले जातात. ‘हायकमांड’ असले तरी शक्यतो ते कोणत्याही पक्षनेत्याला दुखावण्यासारखे वर्तन करत नाहीत. त्यांच्या शालिनतेचे विरोधकही कौतुक करत असतात. मात्र  बिहारचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा यांचा राहुल यांनी ज्या पद्धतीने राजीनामा घेतला त्यातून राहुल यांचा एक कडक अवतार समोर आला आहे. वास्तविक, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अत्यंत कठोर पावले उचलत सोनिया गांधींनी काही राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास बजावले होते. हायकमांडच्या आदेशानुसार काही जणांनी तत्काळ मेल, फॅक्स करून राजीनामे देऊनही टाकले. मात्र बिहारचे मदनमोहन झा पडले गळेपडू. सत्ता ही बाबच अशी की, ती सहजासहजी कोणालाच सोडवत नाही. पराभूत असले तरी काय झाले, एका राज्याचे प्रदेशाध्यक्षपद सहजासहजी कोण कसे सोडेल? आपल्या नावाबाबत काही फेरविचार होईल, लॉबिंग करू अशी स्वप्ने उराशी बाळगत झा महाशयांनी दिल्ली गाठली. सोनियांना भेटण्यासाठी ते अडून बसले, मात्र तिथून माधवन यांनी त्यांची बोळवण राहुल गांधींकडे केली. तिथेही राहुल यांना मला काहीही करून भेटायचेच आहे अशी अट त्यांनी ठेवली, मात्र त्यांच्या खटपटी लक्षात आल्यानंतर राहुल यांचे सचिव कौशल विद्यार्थी यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र द्या, असा त्यांना फोन आल्यावर झा यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. झा राजीनामा देत असतानाच त्या खोलीत राहुल यांचा प्रवेश झाला. झा यांनी आपण किती त्याग करत आहोत हे दाखविण्यासाठी, ‘मै इस्तिफा दे रहा हूं’, असे भावविवश होऊन सांगितले. त्यावर राहुल यांनी ‘व्हेरी गुड ओके’, अशा दोन शब्दांत झा यांना कार्यालयाबाहेरचा रस्ता दाखवला!

‘शॉटगन’ पुन्हा आलेत

कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठविणारे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा सत्ताधाऱ्यांना ‘खामोश’ करण्यासाठी पुन्हा लोकसभेत आले आहेत. पश्चिम बंगालच्या आसनसोल पोटनिवडणुकीत सिन्हा यांनी भाजपच्या अग्निमित्रा पाल यांचा तब्बल पावणेतीन लाखांच्या फरकाने सहजगत्या पराभव करत दिल्ली गाठली. अर्थात या विजयाचे श्रेय निःसंशयपणे ममता बॅनर्जींचे असले तरी सिन्हा यांचे दिल्लीत पुन्हा येणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. आसनसोल हा मतदारसंघ नजीकच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनला होता. ममतादीदींनी निवडणुकीच्या काळात कालिघाटावर जाऊन कालिमातेची पूजाअर्चा केली होती. कालिमातेने पोटनिवडणुकीत ममतादीदींना निराश होऊ दिले नाही. भाजपच्या बालेकिल्ल्याला तृणमूलने भगदाड पाडले. दुसरे देशाच्या लोकसभेत आता भाजपविरोधात शत्रुघ्न सिन्हा यांची शॉटगन धडाडेल आणि त्यांच्या आवाजाने सत्ताधारी खामोश होतील असे चित्र पाहायला मिळू शकेल. भाजपमध्ये असतानाही सिन्हा यांनी मोदी-शहा यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला होता. त्याची जबर राजकीय किंमतही त्यांना मोजावी लागली होती. शत्रुघ्न सिन्हा यांचे राजकारण संपले असे वाटत असतानाच ममतादीदींनी त्यांना ‘राजकीय जीवदान’ दिले आहे. आता या जीवदानाचे सिन्हा सोने करतील यात शंकाच नाही. त्यामुळे संसदेत आणि संसदेबाहेर शत्रुघ्न सिन्हा हे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतील हे नक्की.

[email protected]