
>> नीलेश कुलकर्णी
त्रिवेंद्रसिंग रावतांची उचलबांगडी करून तीरथसिंग रावतांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी नेमून तीन महिने झाले तरीही ‘देवभूमी’ उत्तराखंड भाजपमध्ये सुरू असलेले घमासान थांबलेले नाही. विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम आठ–नऊ महिने उरले असताना भाजपतील गटबाजी उफाळून आली आहे. त्यात कुंभमेळय़ातील कोरोना रिपोर्टमध्ये झालेल्या घोटाळय़ाचा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे. त्यावरूनही ‘देवभूमी’च्या आजी–माजी मुख्यमंत्र्यांमध्ये घमासान सुरू आहे.
उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री तीरथसिंग हे विधानसभेचे सदस्य नसल्याने 9 सप्टेंबरच्या आत त्यांना विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत निवडून यावेच लागेल, अन्यथा कुंभमेळय़ाच्या शुभपर्वावर मिळालेली खुर्ची गमवावी लागेल. तथापि तीरथ यांच्यासाठी विधानसभेची पोटनिवडणूक लावली तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल. सध्या ममतादीदी ही केंद्रातील सत्ताधाऱयांची मोठी डोकेदुखी असल्याने उत्तराखंड विधानसभा मुदतपूर्व बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुन्हा कुंभमेळय़ात कोरोनाचे बोगस पेशंट दाखवून त्यांचे रिपोर्ट बनविण्याचा घोटाळा पुढे आल्याने तीरथसिंग सरकारची गोची झाली आहे. हा सगळा प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाला आहे, असे सांगत विद्यमान मुख्यमंत्र्यांनी या घोटाळय़ाचे झेंगट माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग यांच्या गळय़ात मारले असले तरी त्रिवेंद्रसिंग यांनी त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. त्यामुळे आजी विरुद्ध माजी मुख्यमंत्री असा कलगीतुरा उत्तराखंडमध्ये रंगला आहे. हिंदुत्वाचा पुकारा करणाऱया भाजपच्या राज्यात कुंभमेळय़ातही घोटाळा झाला, हा विरोधकांकडे आयताच मुद्दा आला आहे. कुंभमेळय़ाचा हा मुद्दा भाजपला घेऊन डुबकी मारतो काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हरिद्वारच्या कुंभमेळय़ात न गेलेल्या व्यक्तींचेही कोरोना रिपोर्टस् आल्याने हा घोटाळा उघडकीला आला असून त्यामागे मोठे आर्थिक गणित असल्याचे बोलले जात आहे. कुंभमेळा हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असे पर्व. या पर्वकाळातच घोटाळा व्हावा, यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्याचा फटका नक्कीच भाजपला बसणार आहे. त्यामुळेच काँगेसने या मुद्दय़ावर रान पेटवायला सुरुवात केली आहे. कोरोनावरून टीका होत असतानाही नवे मुख्यमंत्री तीरथसिंग यांनी मोठय़ा हिमतीने हरिद्वारचा कुंभमेळा पार पाडला. याचदरम्यान हा घोटाळा उघडकीस आल्याने भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यांची आता केंद्रात मंत्री होण्याची इच्छा आहे. त्याचवेळी भाजपतील एका गटाला त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ द्यायचे नाही. त्यातूनच हा गोंधळ उडाला आहे. त्यातच तीरथसिंग हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे भाकीत एका काँगेस नेत्याने वर्तवल्यामुळे खळबळ उडाली आहे. तीरथसिंगांना 9 सप्टेंबरच्या आत विधानसभेवर निवडून येणे क्रमप्राप्त आहे. मात्र ममतांच्या राजकीय कोंडीसाठी दिल्लीश्वरांच्या इशाऱयाबरहुकूम निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम अजून जाहीर केलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊन ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्यात यासाठी डावपेच टाकले जात आहेत. तसे झाले तर त्याचे पहिले बळी तीरथसिंग ठरतील. उत्तराखंडमधून लोकसभेच्या पाच जागा असल्याने भाजप हा धोका पत्करू शकते. त्यात मोठा फटका बसण्याचा धोका नाही. त्यामुळे तीरथसिंग रावत केवळ कोरोनापुरते मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाची इतिहासात नोंद करतात काय हे येणारा काळच ठरवेल.
उत्तर प्रदेशातील ‘स्नेहभोजन’
उत्तर प्रदेशच्या राजकारणात ज्यांचे विळय़ाभोपळय़ाचे सख्य आहे असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. खरोखरच ही मोठी बातमी आहे. याचे कारण असे की, गेल्या साडेचार वर्षांत योगी आणि मौर्या यांच्यातून विस्तव जात नाही. प्रचंड बहुमताने हे राज्य जिंकल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असेलल्या केशवप्रसाद यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यापुढे बोलून दाखविली होती. मात्र तिथेच त्यांची मुख्यमंत्रीपदाची दावेदारी कापली गेली. ऐनवेळी चक्रे फिरली आणि योगी महाराजांच्या गळय़ात मुख्यमंत्रीपदाची माळ आयतीच पडली. त्यानंतर योगींनी एककल्ली पद्धतीने कारभार केल्याने केशवप्रसाद व दिनेश शर्मा यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ योगींच्या कार्यशैलीवर नाराज आहे. मंत्र्यांसोबत स्नेहभोजन लांब, मुख्यमंत्री साधे चहापाणी पण घेत नसल्याने त्यांच्या अहंकारी वागण्याबद्दल जोरदार टीकाही झाली. मात्र, तब्बल साडेचार वर्षांनंतर मुख्यमंत्री योगी यांचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद यांच्या घराला पाय लागले. याचे निमित्त ठरले ते केशवप्रसादांच्या चिरंजीवांचे शुभमंगल. या मंगल कार्यानिमित्त आयोजित स्नेहभोजनाला योगी आदित्यनाथ, रा.स्व. संघाचे दत्तात्रय होसबाळे अशी मंडळी हजर होती. या भोजनावेळी सगळे मतभेद गिळले गेले आणि एकमेकांची तोंडे योगी व केशवप्रसादांनी गोड केली असे म्हणतात. हा ‘गोडवा’ कितपत कायम राहतो ते दिसेलच.
वैद्यकीय दुरवस्था डोळसपणे पाहा
नितीशबाबूंचा डोळा देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर फार पूर्वीपासूनच आहे असे बोलले जाते. त्यासाठी भाजपविरोधातील राजकीय आघाडीकडेही त्यांचा डोळा असल्याचे मानले जात आहे. मात्र त्याचवेळी नितीशबाबू डोळय़ाच्या ऑपरेशनसाठी देशाच्या राजधानीत आल्याने त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळय़ाचे ऑपरेशन व्हावे इतपत सुविधाही बिहारमध्ये नाहीत काय, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. नितीशबाबूंची ‘सुशासनबाबू’ ही प्रतिमा म्हणजे नुसते रंगकाम आहे, हे एव्हाना कोरोना लाटेत सिद्ध झाले आहे. तिथल्या तत्कालीन मुख्य सचिवांना पुरेशा आरोग्य सुविधांअभावी कोरोनाकाळात मृत्यूला सामोरे जावे लागले. दुसरीकडे लालूंसारखा तगडा विरोधक तुरुंगात असणे हे नितीशबाबूंच्या कायमच पथ्यावर पडले. त्यातूनच त्यांनी काम कमी सोंगे फार, अशा पद्धतीने सुशासनबाबू अशी आपली इमेज तयार केली. नाही म्हणायला नितीशकुमारांच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिहारमध्ये सुधारली; मात्र त्याव्यतिरिक्त राज्याच्या हाती काहीही लागलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या राजकीय नेत्याने डोळय़ाचे ऑपरेशन, वैद्यकीय उपचार कुठे घ्यावेत, हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असूनही कोणी छोटय़ा उपचारासाठी बाहेर जात असेल तर त्या राज्याची वैद्यकीय दूरवस्था आपण स्वतःच चव्हाटय़ावर आणत आहोत याचे भान नितीशबाबूंना राहिलेले नाही. नितीशबाबूंचे ऑपरेशन नक्कीच यशस्वी व्हावे. मात्र त्यानंतर तरी बिहारची वैद्यकीय दुरवस्था त्यांनी ‘डोळस’पणे पाहावी, इतकीच सामान्य बिहारी जनतेची अपेक्षा आहे.





























































