
>> स्वरा सावंत
कोकणला जसा निसर्ग, इतिहास, सांस्कृतिक वारसा आहे तसाच कलाक्षेत्रातही एक मोठे योगदान कोकणाने कायम दिलेले आहे. अभिनयाचे हेच संस्कार कोकणच्या लाल मातीतून घेऊन ती आली. नाटक नाटक आणि नाटक… कॉलेजमध्ये आल्यावर जगण्याचं हे एकच इक्वेशन तिला कळलं. या नवख्या क्षेत्रात येताना टॅलेंटला शिक्षणाची जोड हवीच म्हणून इथे यायचंय तर तंत्र शुद्ध शिक्षण घेऊनच असं तिने ठरवलं… आणि या क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. हे गावातलं टॅलेंट सिनेसृष्टीत कसं बहरलं सांगतेय ही कोकणची चेडू अभिनेत्री तन्वी मुंडले.
नंतर पुरुषोत्तम करंडक, कुडाळच्या बाबा वर्दम थिएटरकडून ऍक्ट, ती खिडकी, नागमंडल अशा एकांकिका केल्या. एमए थिएटरचे शिक्षण घेताना शेवटच्या वर्षातच एक मालिका ऑफर झाली, पण शिक्षणाला प्राधान्य देत मी तो मोह टाळला.
सीरिअलच्या आधी मी एक सिनेमा केला. नाटकामध्ये काम पाहिल्यानंतर मला हे काम मिळालं, यामुळे सुदैवाने स्ट्रगल माझ्या वाटय़ाला नाही आला, पण पहिला टेक घेताना धाकधूक, दिग्गज कलाकारांचे दडपण, भरपूर कॅमेरे यामुळे माझी कशी भंबेरी उडालेली ती कधीच विसरू नाही शकणार. सीरिअल करताना काही ऑडिशन असल्याच्या मेसेजवरून मी तिथे पोहचले. खूप गर्दी पाहून भीती वाटली, पण अनेक ऑडिशन दिल्या होत्या यामुळे कसं ऑडिशन लूक टेस्ट द्यायची माहीत होते. त्यामुळे कॉन्फिडेंट होते… प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात हा दिवस येतो त्या पोटातल्या गोळय़ावर एकदा मात केली की मग करीअरची गाडी सुसाट सुटते.
माझं बालपण कुडाळ शहरात गेलं. शाळेत असताना कधी स्नेहसंमेलनातही सहभाग न घेतलेल्या मला कॉलेजमध्ये गेल्यावर कल्चरल ऍक्टिव्हिटीबद्दल कळलं. बारावीपर्यंत संत राऊळ महाराज आणि नंतर पंचम खेमराज. बीएस्सीची विद्यार्थिनी असल्याने या सगळय़ांशी काही संबंधच येत नव्हता. एकदा मैत्रिणीच्या आग्रहामुळे एका ऍक्टिव्हिटीला गेले. एक लहान स्किट होतं, पण नंतर ते युनिव्हर्सिटीसाठी निवडलं गेलं. इथून खरं तर मी अभिनय करू शकते याची जाणीव झाली.
रंगभूमीचे संस्कार महत्त्वाचे
अभिनय मग तो कोणत्याही जॉनरचा का नाही असेना, त्याला पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. यासाठी रंगभूमीचे संस्कार हवेच. शिक्षणातले थिएटरची तीन वर्षे खूप महत्त्वाची होती. इथे मी अभिनय जगले. चोवीस तास आपण त्याच विचारात असतो तेव्हा अनेक पैलू उलगडतात आणि यामुळेच आपण प्रगल्भ होतो असं मला वाटतं.
घरच्यांचा पाठिंबा लाखमोलाचा
हा प्रवास सुरू करताना, ‘तू कर आम्ही सगळे तुझासोबत आहोत’, हा विश्वास मला माझा बाबांनी दिला. कुटुंबातील कोणी या क्षेत्रात नाही. यामुळे आपली मुलगी कुठे भरकटू नये यासाठी शिक्षण पूर्ण घेऊनच करीअरची वाट धरायचा आग्रह त्यांचा होता. अर्थात गावात वाढलेली मुलगी कसा तग धरेल याची धाकधूक होतीच, पण काही चुकीचे वागणार नाही हा विश्वास होता. यामुळे या वाटेवर चालताना डगमगण्याची भीती वाटली नाही.
पेशन्स ठेवा, मार्ग सापडतोच
या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पेशन्स ठेवायला हवा. झगमगाट दुनियेचे आकर्षण असते. रिजेक्शन येतात, पण काम मिळतेच. स्पर्धा खूप आहे. एखादा स्वतःला सिद्ध केलं की, कामं मिळतच जातात. यासाठी चुकीच्या मार्गाने न जाता थोडे पेशन्स ठेवायला हवे.



























































