कलंदर – किशा

 >> अरविंद जगताप

   किशा. किशा म्हणजे किशोर लुकडे. सकाळी सकाळी त्याचा फोन वाजायला लागला. खरे तर गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की, किशा दुपारी बाराच्या आत शुद्धीवर येत नाही. कारण पहाटे पहाटे देशीच्या दुकानात जाणारा पहिला माणूस तोच असतो. तरी आज आठ वाजताच त्याचा फोन वाजू लागला. किशाला नेहमीप्रमाणे शुद्ध नव्हती. फोन वाजत राहिला. किशाचा फोन फक्त त्याच्यासोबत होता. बायको, पोरं आणि नोकरी कधीच सोडून गेले होते. फोन सोडला तर किशासोबत कुणी राहूच शकत नाही.

साडेनऊ वाजता किशाच्या दारात एक कार येऊन उभी राहिली. दोन लोक उतरले. त्यांनी किशाच्या तोंडावर दोन-चार बादल्या पाणी ओतून त्याला थोडा भानावर आणला. मग त्यांनीच त्याचे कपडे बदलले. त्याला घेऊन निघाले. किशाने कसेबसे मला घेऊन कुठे निघाले? एवढेच विचारले. त्या लोकांनी सांगितले, आमदार साहेबांनी बोलावलेय. एरवी दुसरा कुणी असता तर ताडकन जागा झाला असता, पण किशा फक्त एवढेच म्हणाला, हा काय टाईमय का? किशा तालुक्याला जाईपर्यंत भानावर आला. आमदार साहेबांच्या घरी जाईपर्यंत जरा डोळे उघडे ठेऊन बोलू लागला. आमदार साहेब त्याला म्हणाले, तुला निवडणुकीत उभे रहायचेय. किशाची उरली-सुरली नशा उतरली. उतरणार नाहीतर काय?

किशाला उभा राहिलेला गावातसुद्धा फार कमी लोकांनी बघितलाय. तो कायम पडलेला असतो. बस थांब्यामागे, देशीच्या दुकानासमोर किंवा त्याच्या घरासमोर. किशा असाच कधी उभा राहत नाही आणि आमदार साहेब त्याला थेट निवडणुकीत उभे राहायला सांगत होते. किशाने हैराण होऊन आमदाराकडे बघितले. आमदार जरा रागीटच. किशा फार वेळ त्यांच्याकडे बघू शकला नाही. पण त्याने आजूबाजूला असलेल्या लोकांकडे बघितले. आमदारांचा पीए त्याच्या बाजूलाच बसला होता. किशाने हळूच त्याला विचारायचे ठरवले, साहेब सकाळीच बसले का काय? पण त्याला धीर झाला नाही. किशा डोळे मोठे करून सगळय़ांकडे बघत राहिला. आमदारांनी पुन्हा सांगितले की, तुझे नाव फायनल केलेय. किशाला कळतच नव्हते की हे काय चालू आहे? गावात नाही अख्ख्या तालुक्यात किशाचे नाव बदनाम होते दारूमुळे. किशाचे नाव किशोर असे कुणी घेतलेच नाही आणि किशा असेही त्याला कुणी म्हणत नाही. कायम लोक त्याला बेवडा किशाच म्हणतात.

गेल्या दहा वर्षांत आसपासच्या गावातसुद्धा किशामुळे कुणी आपल्या मुलाचे नाव किशोर ठेवले नाही. किशाला प्रश्न पडला होता की, एवढे नाव बदनाम असताना आमदारांनी आपले नाव का फायनल केले असेल? समोर चहा आला होता, पण किशाने सोबत आलेले दोन बिस्कीट उचलले फक्त. विचार करत राहिला. बिस्किटाचे दोन घास पोटात पडल्यावर त्याला जरा तरतरी आली. डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला. आमदार साहेब स्वत उभे राहायचे सोडून आपल्याला का उभे करताहेत? त्याने तसे विचारून दाखवले, तर सगळे जोरात हसले. हसू आवरत आमदार म्हणाले की, मी पण उभा राहणारय. किशा आता शक्य तेवढे डोळे मोठे करून बघू लागला. आमदार म्हणाले की, तू माझ्याविरुद्ध उभे राहायचे. आता मात्र किशा हसू लागला. आमदार अर्ज भरायची तयारी करायला सांगत होते. अनामत रक्कम कार्यकर्त्याकडे आधीच दिली होती. ती किशाकडे देऊन चालणार नव्हते. शेवटी आमदार म्हणाले, उभे राहण्यासाठी तुला एक लाख रुपये देतो. किशाला आता राहवले नाही. तो एकदम उठून आमदारांजवळ गेला. तिथे बसलेल्या लोकांना वाटले की, किशा आता भावनेच्या भरात आमदारांचा मुकाच घेतो का काय? पण किशा जवळ जाऊन फक्त काही क्षण थांबला. त्याला खरोखर आमदारांच्या तोंडाचा वास घ्यायचा होता. पण चुकून श्वास आत घायच्या ऐवजी श्वास बाहेर पडला. आमदारांनी नाकावर रुमाल ठेवला. आमदार गंभीर होते. असणारच कारण विरोधी गटाने त्यांच्याविरोधात एक गडगंज संपत्ती असलेला उमेदवार द्यायची तयारी केली होती. त्याची आमदारांना धास्ती होती. म्हणून ते किशाला उभे करणार होते. हे तर किशाच्या डोक्यावरून गेले? असा कोण माणूसय ज्याला आमदार हरवू शकत नाहीत आणि आपण हरवू शकतो.

आमदारांनी नाव सांगितले. हायवेच्या कामांचा गबर कंत्राटदार आहे किशोर लुकडे. तो यंदा उभा राहणार आहे आमदारांच्या विरोधात. त्याची मते किशा खाऊ शकतो. कारण नाव सारखे आहे. किशोर लुकडे. किशाला हे ऐकून पहिल्यांदा आपल्या नावाचा अभिमान वाटला. खरे तर बेवडा किशा म्हणून कुणी तालुक्यात एक रुपया उधार देत नाही, नाव ऐकून तोंड फिरवतात, पण आज त्याच नावामुळे त्याला एक लाख रुपये मिळणार होते. जे नाव तालुक्यात कुठेही पिऊन पडण्यासाठी प्रसिद्ध होते त्या नावाला निवडणुकीत उभे राहायला एक लाख रुपये मिळणार होते. राजकारणात काहीही होऊ शकते. दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या माणसाना मात्र सहसा अशी लॉटरी लागत नाही.

[email protected]