खाऊच्या गोष्टी – श्रीमंत श्रीखंड

>> रश्मी वारंग

दूधदुभत्याचा देश ही आपल्या देशाची ओळख आजची नाही, ती हजारो वर्षे जुनी आहे. शिवलिंगावर होणारा दुग्धाभिषेक असो किंवा नटखट कान्हाचे दही, दूध, लोण्यावरील प्रेम असोआपल्या धार्मिक, सांस्कृतिक जीवनाशी हे पदार्थ जोडलेले आहेत. आता येणारा गणेशोत्सव म्हणजे घरोघरी गोडाधोडाची रेलचेलचअशा या गोड पदार्थांमधला अतिप्राचीन पदार्थ म्हणजे श्रीखंड. या श्रीखंडाची ही कहाणी.

श्रीखंडाचा शोध महाभारत काळाआधीचा असावा असे काही दाखले सांगतात. विराटाघरी बल्लवाचार्य म्हणून काम करणाऱ्या भीमाने शिखरणी नामक पदार्थ बनवल्याचे दाखले मिळतात. दुग्धजन्य पदार्थांत वेगवेगळी फळे वापरून त्याने हा पदार्थ बनवला होता. आजच्या फळांच्या स्वादातील श्रीखंडाचे, आम्रखंडाचे मूळ तिथे आहे. श्रीकृष्णाच्या नावावरून या पदार्थाला श्रीखरणी नाव दिले गेले असे म्हटले जाते.

अर्थात, हा काही भीमाने नव्याने शोधलेला पदार्थ नाही. आणखी एक कथा यासंदर्भात सांगितली जाते. दूधदुभत्याने संपन्न असण्याच्या काळात दही, लोणी हा नित्य आहाराचा भाग असणे स्वाभाविक होते. काही वाटसरू सोबत दही घेऊन प्रवास करत असताना त्यांनी ते जमिनीवर ओघळू नये म्हणून तलम सुती कपडय़ात वर टांगले. सकाळी त्यातील पाणी गळून जाऊन चक्का तयार झाला. तो थोडा आंबट झाल्याने त्यात गोड मध मिसळून त्यांनी खाल्ला आणि तिथून श्रीखंडाचा उगम झाला. ही कथा ऐकायला कितीही छान वाटली तरी ती दंतकथाच असावी. दही मडक्यातून न्यावे हे समजत असताना फडक्यात गुंडाळण्याचा वेडेपणा कोण करेल? दूधदुभत्याच्या या देशात अगणित प्रयोग पदार्थांवर होत होते. त्यातील एखाद्या प्रयोगात माणसाला दुधापासून चक्का बनवण्याची प्रक्रिया उमगली हेच सत्य. दुधाला संस्कृतमध्ये क्षीर म्हटले जाते. या क्षीराला खंड करून जे तयार ते श्रीखंड.

उगम कसाही असला तरी श्रीखंड नित्य आहाराचा भाग होते हे नक्की. कन्नड कवी चावुंडराय दुसरा अकराव्या शतकातील त्याच्या ग्रंथात म्हणतो की, घराघरांतून तलम सुती कपडय़ांतून खुंटय़ाला टांगलेले दही हे नित्याचे दृश्य होय. 1508 मध्ये लिहिलेल्या ‘सूपशास्त्र’ नामक पुस्तकात शिखरणीचा उल्लेख होतो.

अशा या लोकप्रिय व्यंजनावर दावा सांगणे कुणासाङ्गीही प्रतिष्ठsचे ङ्खरणारे. गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये श्रीखंडावर आपला हक्क असल्याचे सांगतात. दोन्ही राज्यांतील महत्त्वाच्या सणसमारंभात श्रीखंडपुरीचा बेत असतोच. महाराष्ट्रातील लग्न समारंभात जिलेबी नाही, तर श्रीखंड असा एकेकाळी दबदबा होता, पण महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले तर पेशवेकालीन पंगतीच्या वर्णनात श्रीखंडाला विशेष स्थान दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मिळालेले दिसते. त्याआधीच्या लढवय्याचा विचार करता एवढी सुस्ती आणणारा पदार्थ नियमित आहारात न घेण्याचा समंजसपणा त्यांनी दाखवला असावा.

 भीमाशी, श्रीकृष्णाशी, प्राचीन ‘दुधो नहाओ’ संस्कृतीशी नाते सांगणारे श्रीखंड म्हणजे एक श्रीमंत अनुभव आहे.

कालानुरूप बदल

काही असो, पण हजारो वर्षांपासून आपली सोबत करणारा हा पदार्थ काळानुसार बदलत राहिला आहे. अनेक स्वादांत हा पदार्थ उपलब्ध होतो. अगदी नव्या जलाटो स्वादातही श्रीखंड मिळते. श्रीखंडाची खासीयत म्हणजे ते झटपट तयार होते आणि घरच्या घरी बनवता येते. सगळय़ाच गोष्टींचे बाजारीकरण होण्याआधीच्या काळात श्रीखंड घरोघरी तयार होई हे आज सांगून खरे वाटणार नाही. केशर, काजू, पिस्ते या श्रीखंडाला श्रीमंती थाट देतात.