प्रेरणा – कोरोनाच्या अंधारातील पणती

>> प्रल्हाद जाधव

महाराष्ट्रात 23 मार्चपासून ‘लॉक डाऊन’ सुरू झाले. 19 तारखेला नीलमला दुबई फ्लाईट घेऊन जाण्याचे आदेश प्राप्त झाले. मुंबई ते दुबई प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करायची होती. नीलम या मराठमोळ्या मुलीने क्षणाचाही विलंब न लावता कॅप्टनचा गणवेश अंगावर चढवला. नवरा, दोन लहान मुले आणि वृद्ध सासूचा निरोप घेऊन ती कर्तव्यभावनेने लगेच घराबाहेर पडली. अशा वेळी सर्वसामान्य माणसाच्या मनात दोन प्रश्न येतात, एक म्हणजे बाहेर कोरोनाने थैमान घातलेले असताना भीती वाटत नाही का आणि दुसरा घरचे लोक नात्याच्या बंधनात अडकवत नाहीत का? नीलम म्हणते की, गणवेश – मग तो कोणताही असो, त्याची जादू काही औरच असते, त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी लोक प्राणांची बाजी लावायला तयार असतात. किती खरे आहे तिचे म्हणणे! आणि तिच्या घरच्यांचे म्हणाल तर, कोणत्याही क्षणी या दोघांना कामावर जावे लागणार आहे, या कायम मानसिक तयारीत असलेले ते आगळे कुटुंब! रॉबिन सॅनफ्रान्सिस्कोला निघताना त्यांची आई म्हणाली, मी आजारी असताना तू जवळ असावेस असे वाटते, त्यावर 7 वर्षांची त्यांची नात शनेल पुढे होऊन म्हणाली, ‘आजी, बाबांना जाऊदे. आमच्यासारखी कितीतरी मुलं अमेरिकेत त्यांच्याही आई-वडिलांची वाट बघत असतील…’

नीलम 19 मार्चला संध्याकाळी मुंबईहून दुबईला जाण्यासाठी निघाली आणि पहाटे चार वाजता घरी परतली. तिच्या तोंडाला लावलेला मास्क पाहून तिच्या 3 वर्षाच्या मुलाने, लिंकनने तिला विचारले, आई तुला कोरोना झाला का? आणि त्यावर सारे घर निःशब्द झाले. किमान दहा दिवस तरी मुलांना जवळ घ्यायचे नाही असा निर्णय याही परिस्थितीत नीलमने घेतला होता आणि त्याचे पालनही तिने पुढील दहा दिवस काटेकोरपणे केले. या घटनेचा कळसाध्याय पुढेच होता. काही दिवसांनी तिच्या सासूबाईंना ब्रेन स्ट्रोकचा ऍटॅक आला. मुलाने म्हणजे कॅप्टन रॉबिन यांनी आजूबाजूच्या तीन चार रुग्णालयात फिरून सर्वांची मनधरणी केली, पण प्रत्येक ठिकाणी नीलमच्या परदेश प्रवासाची ‘हिस्ट्री’ आड आली. सासूबाईच्या आजाराचा कोरोनाशी काही संबंध नव्हता. त्यांचा आजार मेंदूशी संबंधित होता, पण ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. अखेर त्यांना अंधेरीच्या कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करून घेतले गेले. (आणि नंतर त्या बऱयाही झाल्या.)

हिंदुस्थानात कोरोनाचे आगमन दुबईमार्गे झालेले. त्यात एक महिला विमान चालवणार. अशा साऱया भयगंडात्मक परिस्थितीत नीलमचा मुंबई – दुबई – मुंबई हा प्रवास ज्या संवेदनशीलपणे आणि धीरोदात्तपणे कसा झाला ते तिच्याच तोंडून ऐकण्यासारखे आहे. ‘एकवेळ वाळवंटात बर्फ पडला आहे यावर आपण विश्वास ठेवू, पण दुबईच्या विमानतळावर असंख्य विमाने निपचित पडून आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे,’ असे तिने म्हटले. ‘जगातील सर्व एअरलाईन्सचा व्यवसाय कोलमडून पडला आहे, शेकडो पायलटना घरी बसवण्यात आले आहे,’ हे आवर्जून सांगणारी नीलम हवाई सेवेच्या भविष्याविषयी मात्र आशावादी आहे. ‘दळणवळणासाठी तंत्रज्ञानाचा कितीही वापर झाला तरी जगभरातील माणूस एकमेकांना समक्ष भेटण्यामागील आनंद कधीही गमावून बसणार नाही. त्यासाठी तो आपल्या सर्वात गतिमान आणि सर्वात सुरक्षित सेवेकडे पुन्हा वळेल,’ अशी नीलमला खात्री आहे. दुबईच्या विमानतळावर पेट्रोल स्वस्त मिळते म्हणून तिथला संबंधित अधिकारी नीलम मुंबईला परतताना तिच्या विमानात अधिकाधिक पेट्रोल भरून घेण्यासाठी कशी गयावया करीत होता हे ऐकून त्याच्या व्यापारी वृत्तीला दाद द्यावी की त्याच्या राष्ट्रभक्तीला सलाम करावा हे मला कळेना झाले!

नीलमची आणि रॉबिनची भेट रायबरेलीच्या ‘इंदिरा गांधी उडान अकादमी’मध्ये झाली. तेथील प्रशिक्षणाच्या काळात दोघांचेही सूर असे काही जुळले की आयुष्याचे विमान जोडीनेच उडवायचे असे त्यांनी ठरवले आणि गेली पंधरा वर्षे ते तसेच उडत आहे. दोघांचेही सुमारे आठ हजार तासांचे फ्लाईंग झाले असून साठ ते पासष्ट देशांना भेटी देऊन झाल्या आहेत. एअर फोर्सच्या तज्ञ विमानचालकांनी दिलेल्या खडतर प्रशिक्षणातून हे दाम्पत्य तावून सुलाखून निघाले आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले किंवा आव्हान समोर उभे ठाकले तरी ते डगमगून जात नाहीत. ‘डय़ूटी फर्स्ट, इट्स टाईम टू लीव्ह होम’ हे जणू त्यांच्या आयुष्याचे बोधवाक्य ठरले आहे.

नीलम ही भगवान इंगळे आणि आशा इंगळे या प्राध्यापक दाम्पत्याची मुलगी. हे दोघेही मुंबईच्या सुप्रतिष्ठत महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. भगवान इंगळे हे एक संवेदनशील लेखकही असून त्यांचे ‘ढोर’ हे आत्मचरित्र ग्रंथालीने प्रसिद्ध केले आहे. भगवान स्वतः सायकलही चालवू शकत नाहीत, पण मुलीला (आणि मुलालाही) त्यांनी पायलट केले आहे. त्यांचा मुलगा म्हणजे नीलमचा लहान भाऊ निखिलेश ‘इंडिगो’मध्ये कमांडर असून सध्या बंगळुरू येथे कार्यरत आहे. या अनोख्या कुटुंबाच्या तसेच आपल्या गगनभ्रमंतीच्या अनेक आठवणी नीलमने लिहून काढल्या आहेत. हवाई सेवेच्या क्षेत्रात मराठी मुलींनी मोठय़ा प्रमाणात नाव काढावे असे तिला वाटते, पण यादृष्टीने मुलींसाठी काम करणारी एकही संस्था महाराष्ट्रात कार्यरत नसावी याची खंतही ती व्यक्त करते. तिच्या आठवणींच्या पुस्तकात हे सारे आपल्याला वाचायला मिळेलच, पण कोरोनाच्या अंधारात आपल्या जागी ठाम उभे राहून आपली पणती तेवत ठेवण्याची या दाम्पत्याची जिद्द साऱयांसाठी प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही.

कॅप्टन रॉबिन लोबो आणि कॅप्टन नीलम इंगळे – लोबो हे मुंबईत माहीमला वास्तव्य करून असणारे तरुण दाम्पत्य. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करून दाखवण्याची उमेद असणारे आणि आपले घरदार सांभाळून रोज नवनव्या मार्गाने आकाशाला गवसणी घालायला निघणारे कर्तृत्ववान पती-पत्नी! रॉबिन एअर इंडियात बोईंग तर नीलम एअरबसची कॅप्टन म्हणून काम करते. कोरोनाची साथ सुरू असताना हे दोघेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाणे करून प्रवाशांना सेवा देण्याचे कर्तव्य निरलसपणे बजावत आहेत. कॅप्टन रॉबिन यांनी हिंदुस्थानात अडकलेल्या शेकडो परकीय नागरिकांना त्यांच्या देशात पोचविण्याची मोलाची कामगिरी ‘वंदे भारत मिशन’ या योजनेअंतर्गत बजावली आहे. नीलमही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या