
>> महेंद्र पाटील
पावसाला चांगलीच सुरुवात झाली होती. जुन्या नव्या आठवणींना प्रत्येक सरी उजाळा देऊन जात होत्या. साऱया रानात हिरवळ पसरली होती. जणु वसुंधरेवर हिरवा गालिचा अंथरलाय असं नयनरम्य दृश्य दिसत होतं. अधून मधून काळे ढग यायचे आणि सारं रानोमाळ ओलं करून जायचे.
परवा संध्याकाळी ढग पुन्हा असेच दाटून आले आणि पुन्हा एकदा आकाश काळंभोर झालं. माझ्या मनाच्या अंतरी पुन्हा हुरहूर वाढू लागली. हळूहळू ढगांच्या सावली अंधार पसरू लागल्या. बरसलेला आजचा पाऊस हा जरी सृष्टीला भिजवणारा असला तरी त्या पावसात माझं मन मात्र भिजलं नाही. एक एक सरींने मनातल्या आठवणी फक्त जाग्या केल्या होत्या. ढगांची गर्दी वाढून सगळे ढग एकाच वेळी बरसतात की काय, असं चित्र निर्माण झालं. तोवर पाऊस सुरू झाला आणि पानं, फुलं, झाडं, वेली, भिजायला लागल्या. मनही भिजू लागलं. जणु काही सगळ्या आठवणी एकत्र होऊन आपल्या व्याकूळ मनाची व्यथा सांगत आहेत असा तो वेडय़ासारखा बरसत होता. त्याला आवर घालणं कठीण होतं, तो बरसत गेला आणि एक एक अश्रू त्याच्या ओसंडून वाहणाऱया धारांसोबत विरून गेले. मनात कोंडलेले सारे व्याकुळ क्षण मोकळे झाले, सारंकाही शांत, निरामय झालं…
हा आषाढ म्हणजे फक्त धो धो कोसळणारा पाऊस नसतो, तर तो आपल्या मनातल्या सगळ्या आठवणींना दूर घेऊन जाणारा एक रस्ता असता. तो येईपर्यंत आपलं मन असंच कोंडलेलं, व्याकुळ असतं. कुणाच्या तरी वेडय़ा आठवणी काढत जगत असतं. एकामागोमाग एक ऋतू येऊन जातात. नव्या आठवणी देऊन जातात आणि आपलं मन त्या आठवणी गोळा करून ठेवतं. पाऊस सुरू झाल्यावर मग मनाला चाहूल लागते आषाढाची. हाच वेडा पाऊस त्या मनाला सुखावणारा असतो, मनातून दाटून आलेल्या ढगांची व्याकुळता आकाशात जमा झालेल्या ढगांना ठाऊक असते की काय असं वाटू लागतं, आपल्या मनातलं वादळ कुणाला न समजणारं असलं तरी त्या ढगांना मात्र ते समजतं.
परवाचा पाऊस असाच बरसून गेला. तो आला आणि सगळे व्याकुळ क्षण सोबत घेऊन गेला. कुणाची तरी सोबत असावी म्हणून नवे क्षण देऊन गेला. आता या नव्या क्षणांना घेऊन जगायला सुरुवात करायची, हे नवे क्षण मनात रुजतील तोवर श्रावण सरी येतीलच त्यांना भेटायला. मीसुद्धा आकाशाकडे तोपर्यंत बघत राहीन. आषाढातले सुंदर घन कसे जमा होतात आणि मनातले ढग कसे कमी होतात हे पाहीन…
हा आषाढ, मनाच्या डोहातून आभाळापर्यंत कसा प्रवास करतो हे एक न उलगडणारं कोडं आहे. ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन… श्रावण सरी यायच्या आधी.
z [email protected]




























































