निसर्ग आणि दलालांच्या कोंडीत आंबा उत्पादक

568

>> चंद्रकांत मोकल

मागील वर्षी आंब्याला एकदा, दोनदा नव्हे, तीनदा मोहर आला. परिणामी आंब्यावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन अवघे 32 ते 34 टक्क्यांवर आले. या वर्षी तर मोहोर प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वारंवार उद्भवणारे आभ्राच्छादित वातावरण फळांचा राजा हापूसला मारक ठरत आहे. एकीकडे निर्सगाची लहर, त्यामुळे उत्पादन कमी व दुसरीकडे एपीएमसीमधील व्यापारी व दलाल वर्गाकडून होणारे शोषण अशा कोंडीत आंबा उत्पादक सापडला आहे. तशातच सक्षम विक्री व्यवस्था उपलब्ध नाही. परिणाम शेतकरी वर्गाला एपीएमसीमधील व्यापारी व दलाल वर्गापुढे सपशेल शरणागती पत्करावी लागते.

हवामानात सतत होणारे बदल आणि नोव्हेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी याचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन ती जाड होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र नोव्हेंबरच्या पावसाने ही प्रक्रियाच थांबली. महत्त्वाचे म्हणजे नव्याने आलेली पालवी कुजण्याबरोबरच भुरी आणि तुडतुडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आंब्याच्या अनेक बागा काळ्या पडल्याचे चित्र कोकणात पाहावयास मिळत आहे.

मागील हंगामात एकदा, दोनदा नव्हे, तीनदा मोहर आला. परिणामी आंब्यावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन अवघे 32 ते 34 टक्क्यांवर आले. या वर्षी तर मोहोर प्रक्रियाच थांबली आहे. सध्याचे चित्र पाहता बऱयाच ठिकाणी महागडय़ा रासायनिक औषधांच्या मात्रादेखील लागू पडत नाहीत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सध्या वारंवार उद्भवणारे आभ्राच्छादित वातावरण फळांचा राजा असलेल्या हापूसला मारक ठरत आहे. हवामानातील बदल आणि नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आंबा पिकासाठी धोकादायक ठरला आहे.

कृषी फलोत्पादनात नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत शेतकऱयांना अनुदान देण्यात येते. मात्र मागील हंगामात (मार्च ते मे) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे शासनाच्या कृषी, फलोत्पादन विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील कोकणातील आंबा उत्पादकांना अनुदान मिळाले नाही.

आजची परिस्थिती मागच्या वर्षापेक्षा खराब आहे. कारण आंबा हंगाम दीड ते दोन महिने पुढे जाणार आहे. नेहमीच्या सहा फवारण्यांऐवजी तीन-चार फवारण्या जास्त कराव्या लागणार आहेत व यासाठी शेतकऱयांना फार मोठा खर्च येणार आहे. तशातच मागील तीन-चार वर्षे सतत कमी होत असलेले उत्पादन आणि त्यामुळे आर्थिक उत्पन्नात मोठी घट येत आहे त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे या शेतकऱयाला आधार देण्यासाठी शासनाने पूर्वीचे निकष बदलून पुढील औषधांच्या सहा फवारणीसाठीचा खर्च अनुदान म्हणून द्यावे अशी आंबा उत्पादकांची सरकारकडे आग्रही मागणी आहे.

एकीकडे उत्पादन कमी व दुसरीकडे एपीएमसीमधील व्यापारी व दलाल वर्गाकडून शेतकऱयांचे होणारे शोषण, तशातच तीन वर्षांपूर्वी शासनाने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे एपीएमसीव्यतिरिक्त शेतकऱयांचा माल विक्री करण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधांची अपेक्षा होती. मात्र शासनाच्या कृषी पणन मंडळामार्फत संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजारव्यतिरिक्त सक्षम विक्री व्यवस्था शेतकऱयांसाठी उपलब्ध नाही. परिणाम शेतकरी वर्गाला एपीएमसीमधील व्यापारी व दलाल वर्गापुढे सपशेल शरणागती पत्करावी लागते. त्यामुळे उत्पादन कमी असूनदेखील शेतकरी वर्गाला मिळेल त्या भावात समाधान मानावे लागत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे.

वर्षातून एकदाच येणाऱया कोकण हापूसची अवीट गोडी चाखण्यासाठी देशातील व देशाबाहेरील ग्राहकांची मोठी पसंती असते. दुर्दैवाने कर्नाटक, आंध्रचा आंबा फेब्रुवारीतच एपीएमसीमध्ये दाखल होतो. दिसण्यातील साधर्म्य, मात्र चवीला निकृष्ट. त्यामुळे कोकण हापूस पेटीने जातो तर कर्नाटक आंध्रचा आंबा किलोने स्वस्त जातो. कोकण हापूस 3 ते 4 पट महाग असतो. दलाल वर्गाला जादा नफा मिळावा म्हणून ते कर्नाटक आंध्र, चेन्नई येथील आंबा विक्रीस प्राधान्य देतात. त्यामुळे आज हा आंबा मोठय़ा प्रमाणात विकला जात आहे. त्यामुळे या आंब्याचे आक्रमण थोपविण्यासाठी कोकणातील शेतकऱयांना आंबा विक्रीसाठी आम्ही राज्य शासनाकडे कोकणातील प्रत्येक जिल्हय़ात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्याची मागणी केली आहे. उदा. एप्रिल ते जून महिन्यात रायगड जिह्यातील पेण येथे अलिबाग, मुरुड, रोहा येथील महिला, पुरुष विक्रेते आपला आंबा विक्रीसाठी आणतात. या ठिकाणी सकाळी 6 ते 8 या वेळात राज्यातील निरनिराळ्य़ा ठिकाणाहून आलेल्या ग्राहकांची गर्दी होते. त्यामुळे विक्रेत्यांना चांगले पैसे मिळतात व हा व्यवहार रोखीने होतो. म्हणूनच आम्ही पेण अथवा वडखळ या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारावे यासाठी पाठपुरावा करीत आहोत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगल्या प्रतीचा आंबा, भाजीपाला व फलोत्पादन घेण्यासाठी संघाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी कोकणात, मुंबई व राज्यातील अन्य शहरात मेळावे, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कृषी, फलोत्पादन प्रक्रिया फूड सिंचन हवामान बदल परिषदा आयोजित करण्यात येतात. यात शेतकऱयांचा मोठा सहभाग असतो. मोहर प्रक्रिया सुरू होणे, मोहोर संवर्धन, कीड रोगांचा प्रादुर्भाव थांबविणे. ग्रेडिंग पॅकेजिंग, रायपनिंग चेंबर, वाहतूक व्यवस्था, देशांतर्गत व देशाबाहेर बाजारपेठ यावर उपाययोजना करण्यावर आम्ही भर दिला आहे. हवामान बदलाचा फटका सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर होत आहे. यासाठी यूबीएम या यूएसएमधील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रीय स्तरावर परिषद आयोजित करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत हे सांगण्यास आनंद होत आहे.

मागील वर्षी उत्पादक ते ग्राहक या माध्यमाने आंब्याची विक्री व्हावी या अनुषंगाने मुंबईत बोरिवली येथे मुंबईबाहेर नाशिक व राज्याबाहेर इंदूर मध्य प्रदेशमध्ये कोकणातील आंबा विकण्यासाठी पुढाकार घेतला व त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षी देशातील रिटेल सेक्टरमधील नामवंत कंपन्या, मॉल, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानक या ठिकाणी आंब्याची विक्री वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला वगळून आपल्या शेतकऱयांनी स्वतंत्र विक्री व्यवस्थेत उतरल्यासच शेतकऱयांची एपीएमसीमधील दलाल, व्यापारी वर्गाच्या जोखडातून सुटका होईल व त्यांच्या आर्थिक उत्पनात निश्चित वाढ होईल. आंबा निर्यातीत वाढ होण्यासाठी अपेडा, कृषी पणन मंडळ आदी यंत्रणांकडे आमचा सात्यत्याने पाठपुरावा सुरू आहे. हंगामाचा शेवटचा व छोटा आंबा प्रक्रिया उद्योगासाठी खास करून कॅनिंगसाठी या उद्योगातील जैनसारख्या प्रथित यश कंपन्या आमच्या संपर्कात आहेत. आपल्या देशात आंब्याच्या 100 हून जास्त जाती आहेत. यातील हापूस, केशर, राजापुरी, बाटली, नीलम, रत्ना याच जाती प्रक्रिया उद्योगासाठी उपयोगात येतात. प्रक्रिया उद्योगासाठी विशेषतः कॅनिंगचा दर कमी असतो. त्यामुळे हापूसबरोबरच वरील जातींच्या उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करावयास हवे. हे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढले तरच शेतकऱ्याला हंगामाच्या शेवटच्या आंब्याला येणारा दर परवडेल. सरकारने आणि कृषी विद्यापीठांनी वरील जातीच्या आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या