चित्त आणि वित्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

‘तो’ आणि ‘ती’ यांच्या प्रणयकथा अनादी काळापासून जगभर घडत आहेत. निसर्गाची गरज असते तशी. रोमिओ-ज्युलिएट, हीर-रांझा, सलीम-अनारकली किंवा आपल्याकडच्या प्राचीन वाङ्मयातील नल-दमयंती, कृष्ण-रुक्मिणी. यादी खूप मोठी होईल. तशी ही तर इतिहास काळापासून प्रसिद्ध असलेली व्यक्तिमत्त्वं, परंतु ज्यांचं नाव इतिहासाच्या पानात नोंदलं जाण्याची शक्यताही नसते असे सामान्य जनही प्रेमात पडतात. प्रेमभावना जगातल्या सगळय़ा संस्कृतीत सारखीच. कवी पाडगावकर म्हणतात तसं ‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते.’ तिथे गरिबी, श्रीमंती अशी कोणतीही बंधनं येत नसतात. तरुण मनांच्या भावनांचा आविष्कार परस्परांना जवळ आणतो आणि त्यातल्या कित्येकांची नंतर संसारयात्राही सुरू होते. हे सारं ओघानेच घडतं.

… किंवा घडत होतं असं म्हणायचं का? कारण सध्या जगातले विशेषतः पाश्चात्त्य देशांतले ‘मिलेनिअल्स’ म्हणजे 2001 नंतर जन्मलेल्या पिढीतले आणि आता विशीच्या उंबरठय़ावर असलेले नवतरुण आणि तरुणी या ‘जवळकीच्या’ नात्याकडे कसं पाहतात याविषयी चर्चा होतेय. प्रेमाला विरोध आणि त्यावरचे सिनेमे आपल्याकडचं वास्तव असलं तरी तिकडे तसं नाही. ‘तू नजरेने हो म्हटले’ की, झालं. कोणाची आडकाठी बहुधा नसतेच. एकतर तिथली मुलं-मुली अठरा वर्षांनंतर स्वतंत्रपणे राहू इच्छितात. आपण आपल्या पायावर उभं राहून संसार थाटण्याच्या ऊर्मीने दोघंही मिळेल आणि रुचेल तो ‘जॉब’ घेऊन पैसा साठवतात. माझा एक मित्र इंग्लंडमध्ये केंब्रिजला शिकत होता तेव्हा तिथल्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांचा मुलगा शिक्षा घेत असताना संध्याकाळी एका ‘मॉल’मध्ये काम करायचा. ही श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबित्व तिथे रुजलं असल्याने ‘मला कोणीतरी काहीतरी देईल’ अशी भावना नसते आणि पालकही पोरांचे फालतू लाड पुरवत नाहीत.

आपल्याकडे पाश्चात्त्य संस्कृतीची भाषा, पदार्थ आणि व्यसनं आली, पण त्यांचं हे ‘वर्क कल्चर’ आणि ‘स्वयंसिद्धता’ अभावानेच दिसते. विवाहानंतर आपण कुठे राहणार, घर कसं सजवणार वगैरेचा विचार ‘प्रेमवीर’ करीत असतात. घरच्यांचा त्याला पाठिंबा असतो, पण हस्तक्षेप क्वचितच.

बदलत्या काळात पुढच्या पिढीच्या स्वतःच्याच जीवनाबद्दलच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. तिथे आणि इथेही. ‘अंथरुण पाहून पाय पसरावेत’ किंवा ‘आपली मीठ-भाकर बरी’ असं आता पुढची पिढी स्वतःला समजावणार नाही. संपूर्ण पृथ्वीवर कुठे काय चाललंय, जागतिक ‘लाइफ स्टाइल’ कशी बदलतेय, सध्या कोणतं लेणं (कपडे वगैरे), खाणं, गाणं आणि नातंही प्रचलित आहे याचा अंदाज त्यांना येतो. ‘डॉलर’च्या देशाकडे जगातल्या तरुणांची धाव त्यासाठीच असते. शिवाय तिथला ‘सिव्हिक सेन्स’ आणि ‘सर्वसामान्यां’ना कोणताच त्रास नसतो वगैरे.

परंतु पुढच्या काळात त्या देशातल्या तरुण-तरुणींना अशा वाढत्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहण्यासाठी भरपूर पैसे मिळवावे लागणार आहेत. त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. पूर्वी आपल्याकडे ‘पेन्शनीत आल्यावर चार पैसे गाठीला राहतील आणि आराम करू’ असं इथं काही उद्याच्या पिढीला म्हणता येणार नाही तर तिथलं काय! मुळात ‘चार पैशा’त समाधान होणंच दुरापास्त. पूर्वी ‘स्वस्त ते आपलं बरं’ अशी जी धारणा होती ती आता ‘मस्त ते सारं हवं’ इथपर्यंत येऊन ठेपली आहे. ही कालगती ती थोपवता येत नाही. मग वाढत्या गरजांसाठी वाढता पैसा आणि काम हे सारं आलंच.

… त्याचा नवतरुणांवर तिथे जो विपरीत परिणाम होतोय तो असा की, त्यांना परस्परांना द्यायला वेळच मिळत नाही. कष्टाला त्यांची ना नाही, पण ते ज्यासाठी करायचे ते सहजीवनाचं सुख त्यामुळेच दूर पळतंय. परस्परांना ‘डेट’ देताना आधी कामाचं स्वरूप आणि एखाददिवशी लवकर जायची सवलत मिळेल का याचा भरवसा नसतो. त्याशिवाय भलीमोठी घरं, बंगले, मोटारी आणि ऐहिक सुखसोयी घेण्यासाठी सतराशे साठ कर्जे काढली असतील तर उत्तम पैसे देणारा जॉब टिकवावाच लागतो. एका जुन्या नाटकात नायक शब्दकोडं सोडवताना ‘प्रेमिकांना चित्त अधिक महत्त्वाचं वाटतं की वित्त?’ असा प्रश्न असतो. तो भावुकपणे ‘चित्त’ लिहितो. उत्तर ‘वित्त’ असतं. उद्याच्या जगात हव्यास नसला तरी ‘साधं’ जगायलाच भरपूर ‘वित्त’ लागणार आहे. बिचारे ‘चित्तचोर’ प्रेमिक. परिस्थितीचा ‘सासुरवास’ त्यांना सतावतोय!