
गेल्या काही दशकांत ‘तणाव’ हा शब्द नेहमी ऐकण्यास मिळतो. काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात. घरातली कामे करण्यातून मुलांना सूट, तर मुलींना सवय हवी म्हणून कामे करावीच लागतात. एवढंच काय, ताजे/उरलेले अन्न, शाळेचे माध्यम याबाबतीतही एकाच घरातील भाऊ व बहिणीत भेदभाव केला जातो, तसे करू नका अशा अर्थाच्या उद्बोधक जाहिराती आपण पाहतो. समाजातही कुमारवयीन मुलींना चेष्टा-मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो. अशा स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी/व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आई-वडील अशा कारणांनी काही मुले लहानपणापासून एकाकी होतात व मानसिक ताणतणावांचा सामना करतात. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे शिक्षण,नौकरी, व्यवसाय यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
मित्र -मैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालक या सर्वांशी संवाद साधणे, जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करणे, मनातले विचार लिहून काढणे, हसणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त होण्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद जोपासल्याने फावला वेळ सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळल्याने नकारात्मक घटक आपोआप दूर होतात.
मोठय़ाने व मनमोकळे हसून ताणतणाव हलका करणे, योग हा केवळ आसने, प्राणायाम यापुरता मर्यादित नसून त्यात नियम, संतुलित आहार, ध्यानधारणा इ. घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. दीर्घ श्वासोच्छ्वास, योगनिद्रा, योगासने यांचे शरीराला फायदे होतात. ध्यानधारणेमुळे वाईट स्वभावात सकारात्मकता येते. विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणेचा खूप उपयोग होतो.
आनंददायी संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आपल्याला आनंद मिळतो व तणाव दूर होतात. संगीतात मनःस्थिती बदलण्याची ताकद असते. मैदानी खेळांचे महत्त्व तर अतुलनीय आहे. खेळांमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी आंतरक्रिया, संघभावना वाढणे, एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे असे अनेक फायदे होतात.
हे नेहमी लक्षात ठेवाः निसर्ग हा माणसाचा जवळचा मित्र आहे. बागकाम, पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविणे, एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन करणे अशा छंदांमुळे विचारसरणी सकारात्मक होते,आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल सजगता (mindfulness) विकसित करणे, मनात नकारात्मक भावना (उदा. सूड/बदला) असल्यास त्या नष्ट करण्याचा निर्धार करणे अशा मानसिक व्यायामांनीही सामाजिक आरोग्य प्राप्त करता येते.
ताणतणाव व्यवस्थापनाचे सगळे मार्ग आपल्या हातात आहेत, पण तरीही काही कारणांनी ते यशस्वी ठरले नाहीत तर औदासीन्य (Depression), नैराश्य (Frustration) अशा जास्त गंभीर समस्या निर्माण होतात.अशा व्यक्तींसाठी योग्य वैद्यकीय सल्ला, समुपदेशन (counselling), मानसोपचार हे उपाय उपलब्ध आहेत.
– गौरी राजेंद्रकुमार शिंदे
(सहा. शिक्षिका,मनपा माध्यमिक विद्यालय, गोरेगाव पूर्व )


























































