लेख – उदारस्य तृणं वित्तं

454

>> दिलीप जोशी

‘उदारस्य तृणं वित्तं, शूरस्य मरणं तृणम्’ म्हणजे उदार व्यक्तीला संपत्ती तृणवत वाटते तर शूरवीराला मृत्यूही तसाच वाटतो. वैराग्य प्राप्त झालेल्या निःस्पृह माणसाला सर्व जगच तृणवत् वाटतं असा त्या सुभाषिताचा शेवट. इथे या लेखात विचार करायचा तो उदारतेची भावना एखाद्याच्या मनात कशी रुजते, वाढते आणि त्या व्यक्तीला त्यातून नेमकं काय मिळतं?

आपल्या संस्कृतीमधला औदार्याचा मापदंड म्हणजे कर्ण. ‘कर्णासारखं औदार्य’ असं आपण अनेकदा ऐकलेलं असतं. आपल्या राजकोषातून अंगराज कर्ण उदारतेने जनसामान्यांना संपत्तीचं दान करत असे. त्याची दानशूरता हा त्याचा स्वभाव होता. शेवटी त्याने आपली कवचकुंडलंसुद्धा इंद्राला ‘दान’ केली अशी कथा आहे.

या झाल्या पुराणातल्या गोष्टी. अर्वाचीन आणि आजच्या आधुनिक काळातही अनेक उदार माणसं समाजाचं आपण काही ‘देणं’ लागतो या भावनेने अफाट संपत्ती दान करत असतात. अगदी अलीकडची उदाहरणं द्यायची तर वॉरन बफेट या उद्योजकाने त्यांची जवळजवळ नव्याण्णव टक्के संपत्ती दान केली. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सने आणि आपल्याकडच्या ‘विप्रो’चे अझीज प्रेमजी यांनीही औदार्याचा आदर्श घालून दिला. स्वकष्टाने आणि आपल्या संकल्पनेतून साकारलेल्या व्यवसायातून या मंडळींनी कोटय़वधी, अब्जावधी डॉलर किंवा रुपये कमावले. टॅक्स वगैरेची पूर्तता करून त्यांनी ते केवळ स्वतःसाठी आणि आपल्या माणसांपुरते ठेवले असते तरी त्यात गैर काहीच नव्हतं. पुढच्या पिढय़ांसाठी ‘तरतूद’ करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. तो मनुष्यस्वभावच म्हणावा लागेल पण नाना शंकरशेट, भाऊ अजिंक्य अशा मराठी मंडळींच्या औदार्यातूनच आजची आधुनिक मुंबई उभी राहिली हे लक्षात घ्यायला हवं.

मात्र आपण जे मिळवलं ते समाधानाने समाजाला परत करावं असं वाटण्यामागे कोणती भावना असते? याला अनेक कारणं असू शकतात. धनवंत होण्यापूर्वी काहीजण अत्यंत सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत वर आलेले असतात. आपला भूतकाळ आणि त्या काळातली वेदना त्यांना ठाऊक असते. प्रत्येकालाच प्रयत्न करूनही आपल्यासारखं यश प्राप्त होईलच असं नाही याचीही जाणीव अनेकांना होते. शिवाय समाजातच आपण आपलं कर्तृत्व गाजवून यशसिद्धी प्राप्त केली. याविषयी अंतर्मनात कुठेतरी कृतज्ञताही असू शकते. त्यामुळे ‘आपण ज्या समाजात वाढलो, ज्यांच्या प्रत्याप्रत्यक्ष सहकार्याने यशस्वी झालो त्याबद्दल काही ‘देणं’ लागतो हे मनात रुजतं आणि दानशूरतेतून समाजात एक आदर्शही निर्माण होतो. गरजूंना पैसा तर मिळतोच पण अनेकांना स्फूर्तीही मिळू शकते अशा विविध कारणांनी ‘दान’ दिलं जातं. ‘दान’ सत्पात्री असावं असं आपल्याकडे म्हटलं जातं. तसं उत्तम सामाजिक, शैक्षणिक, संशोधनात्मक कार्यासाठी दिलं जाणारं दान श्रेष्ठ असतं. नैसर्गिक आपदा आणि केवळ पैशावाचून ज्यांची प्रगती खुंटली आहे अशांसाठी देणगी देणं अतीव समाधान देतं.

अशी देणगी केवळ श्रीमंत माणसंच देतात असं नाही. एखादी समाजोपयोगी संस्था सुरू केली तर धनवंतांपासून अगदी सामान्य लोकांपर्यंत अनेकजण आपल्या आर्थिक कुवतीनुसार देणगी देतात असा अनुभव येतो. म्हणजे केवळ खिशात पैसा आहे म्हणूनच माणसं दानशूर होतात असं नाही. गाडगेबाबांनी सुरू केलेल्या कार्याला गरीबच म्हणता येईल अशा अनेकांनी जाणीवपूर्वक हातभार लावला होता. उदार देणगीतून जसं संस्थात्मक कार्य उभं राहतं तसंच अंतरातील ऊर्मीने उत्तम कार्य करायला प्रवृत्त झालेली मंडळी घरातलं किडूकमिडूक विकूनही त्यासाठी पैसा कसा उभा करतात याचा प्रत्यय अनेक संस्थांच्या आरंभकाळाचा मागोव घेतला तर येईल. एका गरीब शिक्षकाची जुनी ऐकीव गोष्ट. आपल्या मुलाचा सदरा फाटला म्हणून नवा घेण्याची वेळ आली आणि त्याचवेळी आपल्या चार विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल घ्यायचीही ऐपत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मुलाला समजावलं. या महिन्यात त्यांना पाटी-पेन्सिल घेऊन देऊ. तुलासुद्धा पुढच्या महिन्यात घेऊ.. आणि मुलगाही तयार झाला. हा औदार्याचा संस्कार.

ज्ञान किंवा विद्या हे धन ‘देण्याने’ वाढतं असं म्हणतात पण पैशाच्या रूपातील धन देण्याने मनाची श्रीमंती वाढते. समाधान मिळतं. इतरांच्या चेहऱयावरचा आनंद पाहून त्याला कृतकृत्य वाटतं. तो मदतीसाठी आढेवेढे घेत नाही. नुकतीच अशी उदारता युत्साका मेजावा नावाच्या जपानी उद्योजकाने दाखवली. त्याची कल्पकता निराळीच. आपल्या एक हजार ट्विटर फॉलोअरना प्रत्येक नऊ हजार डॉलर देऊन त्यांना होणारा आनंद पहावा असं त्यांना वाटलं.

‘देणारे हात’ जगात पूर्वी होते, आजही आहेत. मात्र घेणाऱया हातांनीही कविवर्य विंदा करंदीकरांचा संदेश ध्यानात ठेवावा. ‘घेता घेता घेणाऱयाने, देणाऱयाचे हात घ्यावे!’ घेणाऱयानेही आपली वेळ आल्यावर सत्कार्यासाठी ‘दाता’ जरूर व्हावं. अन्यथा गमतीने असं म्हटलं जातं की, कंजूष ‘सर्वश्रेष्ठ’ दानी असतो, कारण त्याच्या पश्चात त्याची संपत्ती कोणाला तरी मिळते. पण असं ‘दान’ काय कामाचं? ते डोळस हवं. जाणिवा जागृत करणारं हवं.

आपली प्रतिक्रिया द्या