आनंदाचा महामार्ग

832

>> नीलांबरी जोशी

यशाचं रहस्य काय याची प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतात. खूप कष्ट, महत्त्वाकांक्षी वृत्ती, लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती, त्याग करण्याची तयारी ही तर सर्वसाधारणपणे मिळणारी उत्तरं. म्हणूनच निष्ठेने काम करणं, खूप काम करणं, नियोजनबद्ध तयारी करणं हा यशस्वी होण्याचा फॉर्म्युला आहे असं मानलं जातं. परंतु आनंदप्राप्तीसाठी यशस्वी होणं हेच मुळात चुकीचे असून आनंदात असलेली माणसं कायम यशस्वी होतात हेच खरं आहे. 

ऍण्टोनियो होर्टा ओसोरियो हा विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला पोर्तुगीज मनुष्य आणि ‘लॉईडस् बँकिंग ग्रुप’ ही इंग्लंडमधली सर्वात महत्त्वाची वित्तसंस्था.  बाजारपेठेत 3445 कोटी मूल्य असलेला ‘लॉईडस् बँकिंग ग्रुप’ न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. ‘लॉईडस् बँकिंग ग्रुप’मध्ये 1 मार्च 2011 रोजी ओसोरियो आजपर्यंतच्या तिथल्या इतिहासात सर्वात तरुण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून दाखल झाला. आठवडय़ाला 90 तास काम करून बँकेचे भले करायचा विडाच उचलला. त्याचा ग्रुपला मुबलक प्रमाणात आर्थिक फायदा व्हायला सुरुवात झाली. 1 नोव्हेंबर 2011 रोजी म्हणजे आठ महिन्यांनंतर ओसोरियोनं प्रचंड ताण आणि थकवा यासाठी वैद्यकीय सुट्टी घेतली. ओसोरियोच्या आजारपणाची बातमी वर्तमानपत्रात झळकल्यानंतर लॉईडसचं बाजारपेठेतलं मूल्य 100 कोटी पौंडानं लगोलग खाली आलं. ओसोरियोनं लॉईडस् बँकिंग ग्रुपला जेवढं वर नेऊन ठेवलं होतं त्यापेक्षा हे नुकसान कितीतरी जास्त होतं.

ओसोरियोच्या या केससारखं दीर्घकाळ खूप ताण घेऊन केलेलं काम असं उलटू शकतं, पण ताण घेऊन काम केल्याशिवाय आपण यशस्वी होऊच शकणार नाही हे गृहीतक भोवतालच्या संस्कृतीनं आपल्या मनावर ठसवलेलं आहे. खूप ताण घेऊन काम करणारे डॉक्टर्स, रात्र रात्र जागून केसेस जिंकणारे वकील, मोठमोठय़ा कंपन्यांचे यशस्वी सीईओज ऑफिसचं काम करून सेवाभावी संस्थांना भेटी देतात आणि आपल्या मुलांचा गृहपाठही कसा घेतात ते दाखवणारे टीव्ही शोज आणि यशस्वीतेचं रहस्य म्हणजे कठोर परिश्रम असं सांगणाऱया यशस्वी माणसांच्या मुलाखती छापणारी पुस्तकं, रात्रंदिवस आपल्या मनावर अतिश्रमाचं, सतत व्यस्त राहण्याचं महत्त्व बिंबवत असतात. त्यामुळे अशा तऱहेनं यशस्वी असणं हा आनंदप्राप्तीचा मार्ग आहे असं लहानथोर सर्वांनाच वाटत असतं.

यशाचं रहस्य काय याची प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, खूप कष्ट, महत्त्वाकांक्षी वृत्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि त्याग करण्याची तयारी ही सर्वसाधारणपणे मिळणारी उत्तरं आहेत. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ताणतणाव गरजेचे असतात असंही मानलं जातं. निष्ठsनं काम करणं याला आपण महत्त्व देतो. खूप काम करणारे, सतत योजना आखणारे आणि ध्येयाकडे वाटचाल करणारे नेते आपल्याला महान वाटतात. पण यात आपली भयंकर चूक आहे, ‘आनंदप्राप्तीसाठी यशस्वी होणं’ हा मार्ग योग्य नसून ‘मुळात आनंदा’त असलेली माणसंच नंतर यशस्वी होतात.

आपण काहीतरी साध्य करायच्या सतत मागे पळायलाच हवं, सतत पहिल्या क्रमांकावरच राहण्याचा अट्टहास बाळगावा त्यासाठी इतरांना मागे टाकावं या यश मिळवण्याच्या चुकीच्या थिअरीज आहेत. मग आनंदी राहण्यासाठी काय करावं? त्याचे सहा मार्ग आहेत.

ते सहा मार्ग म्हणजे सतत पुढच्या क्षणी काय करायचंय याचा विचार न करता आताच्या क्षणात जगा किंवा काम करा. तुमची ताण सहन करायची मानसिक लवचिकता वाढवा म्हणजे ताण लवकर विसरायला शिका, तुमच्यातल्या ऊर्जेचे व्यवस्थापन करा, तुम्हाला दमवणाऱया भावना किंवा विचार यात बुडणार नाही याची मेंदूला शिस्त लावा, काही काळापुरतं काहीच न करता शांतपणे जगायची सवय लावून घ्या, स्वतःशी मैत्री करा म्हणजे चुकांसाठी सतत अपराधी वाटून घेऊ नका. स्वतःवरही थोडी दया दाखवा. आपल्याला चुकांमधून शिकायला संधी मिळते हे मेंदूला कळू द्या, तसेच इतरांशीदेखील दयाळूपणे वागा. संवेदनाशील बनून इतरांच्या समस्या जाणून घ्या, त्यांना वेळ द्या.

यातल्या पहिल्या मार्गानुसार जाऊन जर एखाद्या कामात जर आपण 100 टक्के लक्ष घातले तर ते काम चांगले होते. पण आताच्या क्षणात आपण फक्त 50 टक्केच जगत असतो. आताच्या क्षणात जगण्यानं तुमचे भोवतालच्या लोकांशी नातेसंबंध सुधारतात.

ताण सहन करायची लवचिकता वाढवणे हा दुसरा मार्ग आहे. यासाठी सगळेच ताण वाईट नसतात. थोडा ताण गरजेचाच असतो हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या जगात बॉसनं वैतागानं केलेला एक फोन, मित्राचा किंवा जोडीदाराचा एक रागारागात आलेला मेसेज, कोणीतरी अनोळखी माणसानं दिलेल्या शिव्या क्षणार्धात आपल्यात रासायनिक बदल घडवतात. आपण अस्वस्थ होतो आणि ताण घेतो. ताण आल्यावर आपण जंकफूड, सिगारेटस्, दारू, टीव्ही, व्हिडीओ गेम्स खेळणे यांचा आसरा घेतो. ‘आय नीड अ ड्रिंक’ किंवा ‘आय नीड अ स्मोक’ यासारखी वाक्यं मग त्यातून निर्माण होतात.

तिसऱया मार्गानुसार जाणेही सोपे नाही. महत्त्वाचं म्हणजे मनाला दमवणाऱया ज्या गोष्टींचा विचार करायचा नाही असं आपण ठरवतो त्या गोष्टी मनाचा जास्तच ताबा घेतात. यावर मात करण्यासाठी निसर्गात फिरणे तसेच सावकाश करता येतील असे व्यायाम करणे हे उपाय आहेत.

थोडा वेळ काहीच न करता बसणे हा चौथा मार्ग. यातच मनोरंजनात्मक किंवा आपल्या कामाशी निगडित नसलेलं काहीतरी करणं हेही येतं. असे केल्यानं मेंदूतला थकवा निघून मेंदूतली प्लेजर सेंटर्स खुली होऊन सृजनशीलतेकडे प्रवास चालू होतो. मनोरंजनामुळे ताण कमी होतो आणि आपण असतो त्यापेक्षा 12 टक्क्यांनी जास्त उत्पादनक्षम बनतो असे अनेक संशोधकांनी सिद्ध केलेय.

यशस्वीतेचा पाचवा मार्ग म्हणजे स्वतःच्या चुकांबद्दल सतत स्वतःला टोचून न घेणे. ‘फरगिव्ह ऍण्ड फरगेट’ – म्हणजे स्वतःच्या चुकांना माफ करून त्या विसरून जाण्याने आपल्याला मनःशांती लाभते. चुकांमधून शिकावं जरूर, पण त्याबद्दलची सततची अपराधी भावना तुमचं मनःस्वास्थ पार बिघडवते.

स्वतःला माफ करावं आणि स्वतःशी चांगलं वागावं. यानंतर आपोआप दुसऱयांशी दयाळूपणानं वागावं हा सहावा मार्ग येतोच. मानसशास्त्राrय संशोधनानुसार सतत पहिल्या क्रमाकांवर येण्यासाठी करायच्या झगडय़ापेक्षा आपला मेंदू सहवेदना अनुभवणं आणि समाजप्रिय असणं या गोष्टी जास्त मानतो. त्यामुळेच नंबर एकच्या पोझिशनपर्यंत सगळ्यांना बाजूला करून पोहचणारे नार्सिसिस्टिक लोक आपल्या टीममध्ये अप्रिय होतात. दयाळू, नम्र आणि मिळून मिसळून वागणारे नेतेच आपण पसंत करतो. जर एखाद्या मॅनेजरने आपल्या कामाच्या ठिकाणी दयाळू वृत्ती जोपासली तर ऑर्गनायझेशन जास्त उत्पादनक्षम आणि प्रभावी बनते, ग्राहकांना जास्त समाधान लाभतं.

हे सगळं तुम्हाला गरजेचं आहे का? तर गेल्या वर्षभरात जर तुम्ही तुमचा फोन पलंगाशेजारी ठेवून झोपत असाल, सकाळी उठल्यावर प्रथम ई-मेल चेक करत असाल, मित्रांबरोबर तुम्ही प्रत्यक्षात न बोलता फेसबुक, व्हॉटस्ऍप, लिंकड्इन किंवा ट्विटरवर बोलत असाल, आठवडाभर न संपणाऱया टु डू यादीवर काम करता करता तुम्ही थकूनभागून अंथरुणावर कोसळत असाल, तुमच्या शरीराला गरज असेल त्यापेक्षा तुम्हाला झोपायला कायमच उशीर झालेला असेल आणि आपण एका न संपणाऱया रॅटरेसमध्ये अडकलो आहोत, आपल्याला हव्या त्या गोष्टी करायला वेळ नाही, काम सोडून वेगळंच आवडीचं काहीतरी करण्यात वेळ घालवला याबद्दल अपराधी वाटत असेल, आपण करतोय त्यात काय अर्थ आहे असं तुम्हाला अनेकदा वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या