
- अनंत पावसकर
अकरावी आणि बारावीच्या मुलांना संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास शिकवताना त्यात ‘म्युझिक थेरपी’चा (अर्थात संगीतोपचार) समावेश असावा अशी एक कल्पना मांडण्यात आली आहे. परंतु त्यावर बराच ऊहापोह होताना दिसत आहे. बराच विरोधही होतो आहे. संगीतोपचार म्हणजे नेमकं काय?
सध्या व्हॉटसऍपवर आरोग्यविषयक ज्ञान देणारी पाणपोई उघडलीय. अनेक व्याधींवर उपचार म्हणून हे खा, ते खाऊ नका असे ते सल्ले देत असतात. काही लोक तर सत्यासत्यता न पडताळता प्रयोगशाळेतील उंदराप्रमाणे स्वतःवरच निरनिराळे प्रयोग करून घेतात. संगीतोपचार (म्युझिक थेरपी) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या रागांवर आधारित आहे आणि या माध्यमातून अनेक आजारांवर उपचार करता येतात हा सुगावा लागताच ‘व्हॉटस् ऍप’वर सध्या एक ‘मॅसेज’ पद्धतशीरपणे व्हायरल केला जात आहे. गुगलवर शास्त्रीय रागांविषयी उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे बिनधास्त सल्ले दिलेत. अमुक आजारांवर उपचार म्हणून त्यांनी चक्क फिल्मी गाण्यांचा संदर्भ दिलाय.
‘संगीतोपचारावर’ ऊहापोह करण्याइतकी माहिती नसली तरी संगीत क्षेत्रात कार्यरत असल्याने असे संदेश वाचले की नकोसे वाटते. एक सहज म्हणून विचार केला तरी सकाळी अंथरुणातून उठल्याउठल्या कानठळ्या बसवणारं संगीत नक्कीच आवडत नाही. सकाळी भूपाळी, पहाटेची भक्तिगीते, अभंग असले प्रकारच मनःशांती देतात. म्हणजेच संगीतोपचार अर्थात ‘म्युझिक थेरपी’ यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे. संगीतोपचार ही आयुर्वेदाच्या भक्कम पायावर उभारलेली सहायक (सप्लिमेंटरी) उपचार पद्धती आहे. या संगीतोपचाराने ‘डायरेक्ट इफेक्ट’ होऊन झटपट आराम मिळत नसेल, परंतु समाधानकारक परिणाम दिसून येतातच. म्हणूनच संगीतोपचार अर्थात ‘म्युझिक थेरपी’बाबत जाणून घ्यायला हवे. ‘म्युझिक थेरपी’चा उगम नक्की कधी झाला याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. संगीत सम्राट तानसेन यांनी ‘दीपक’ राग आळवून दिवे पेटवले ही गोष्ट इतिहासात वाचलीच आहे. अमुक संगीत ऐकवल्यास गाई आणि म्हशी जास्त दूध देतात, कुक्कुटपालन व्यवसायातही संगीत ऐकवल्याने फायदे झालेले आहेत वगैरे गोष्टीही आपण ऐकून आहोत. ‘म्युझिक थेरपी’चं उदाहरण म्हणून एक किस्सा मात्र चवीने सांगितला जातो. इटलीचा सम्राट मुसोलिनी सन 1933च्या दरम्यान निद्रानाशाच्या विकाराने त्रस्त झाला होता म्हणे! हकीम, वैद्य यांनी सर्व प्रकारे औषधोपचार करूनही गुण येईना. पं. ओंकारनाथ ठाकूर त्या काळात युरोपमध्ये बऱ्याचदा जात असत. त्यांना तेथील मुक्कामी कुणीतरी सम्राट मुसोलिनीच्या आजाराविषयी सांगितलं. आपल्या गायकीने काही गुण येईल का पहा असंही सुचवलं. पंडितजींनी ते थोडंसं हसण्यावारी नेलं, पण अति आग्रहाखातर त्यांच्यासमोर सादरीकरण करण्याची तयारी दर्शवली. हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचा प्रभाव पहा. पंडितजींनी आपल्या सादरीकरणात राग ‘पुरिया’ आळवला. चमत्कार व्हावा असं तिथे घडलं. केवळ अर्ध्या तासातच सम्राट मुसोलिनी गाढ झोपी गेला. या आणि तशा अनेक प्रसंगांनी काही संशोधकांचं लक्ष ‘म्युझिक थेरपी’कडे न वळतं तर नवलच. अनेक संगीतवेड्या प्रभृतींनी ‘संगीता’द्वारे उपचार करता येऊ शकतात असं सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार, ज्येष्ठ सतारवादक पं. शशांकजी कट्टी यांनी सुमारे दोन दशके अथक परिश्रम करून ‘संगीतोपचार’ विकसित केला आहे. या सन्माननीय संगीतोपचार तज्ञांच्या मते ‘भैरवी’च्या उपचारक वादनाने ‘कफ दोष’, अस्थमा, मुरलेली सर्दी, त्रासदायक कफ एवढेच नव्हे तर टी.बी. किंवा छातीशी संबंधित आजार बरे होऊ शकतात. ‘आसावरी’ हा राग रक्ताशी संबंधित विकारावर उपयुक्त ठरू शकतो. राग ‘मल्हार’ हा क्रोध, चिडचिडेपणा, तापट-तामसी स्वभाव अथवा मेंदूच्या असंतुलितपणावर चांगलाच परिणामकारक ठरू शकतो. राग ‘हिंडोल’ एकाग्रता व कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी उपचारक ठरतो तसेच काळजाच्या काही विकारांवर आशादायक परिणाम करतो. राग ‘दरबारी’ म्हणजे मनःशांती प्रदान करणारी सुरावट, तर ‘जौनपुरी’ राग हा बद्धकोष्ठता, अपचन तसेच जठराशी संबंधित आजारांवर उपचारक होऊ शकतो असा या तज्ञांचा दावा आहे. सात ‘शुद्ध’ (सारेगमपधनिसा) व ‘पाच’ कोमल (रेगमधनी) हा बारा सुरांचा प्रपंच खरा, पण त्यायोगे शारीरिक व मानसिक आजार बरे होऊ शकतात हे ऐकून आश्चर्यमुग्ध व्हायला होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ‘संगीतोपचार’ हे सर्वस्वी संबंधित संगीतोपचार तज्ञांवरच अवलंबून असतात. कारण ही उपचारपद्धााr त्यांनी अथक परिश्रम व प्रात्यक्षिके करून विकसित केलेली असते. ही थेरपी रुग्णांवर आपापल्या संशोधित थेरपीनुसार त्या तज्ञांनीच करायची असते व तरच ती परिणामकारक ठरते. अमुक रागातील अमुक रचनेचं वादन केलं की, पेशंट बरा होतोच असं नाही. रुग्ण व व्याधीनुसार त्या रागातील स्वरांमध्ये औचित्यपूर्ण फेरफार केलेले असतात. नाडीपरीक्षा व रुग्णाच्या आजाराची खातरजमा करून झाल्यावर रुग्णांना रुबरू बसवून सुमारे बावीस ते पंचवीस मिनिटांच्या एकेका सीटिंग्जमध्ये संगीतोपचार दिला जातो. पूरक उपचारार्थ दिलेल्या सीडीवर उपचारक रागांचे जे संकलन दिलेले असते, त्याचे श्रवण कधी आणि कसे करावे याच्या सूचना त्यांनी आपल्या रुग्णांना दिलेल्या असतात.
हिंदुस्थानी संगीतातील एकाहून एक दिग्गज कलावंतांचे आविष्कार ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत म्हणून उपलब्ध असलेली सीडी आणून राग ‘दीपक’ आहे ना! म्हणजे साक्षात दिवे पेटणारच असे मुळीच नाही. सीडीमधली गायकी अथवा वाद्यवादनाचं सादरीकरण ऐकून किंवा त्याच्या श्रवणभक्तीने अमुक आजार किंवा व्याधी बरी होऊ शकत नाही. संगीतोपचार तज्ञही असे सल्ले देत नाहीत. म्हणूनच ही पूरक उपचार पद्धती असल्याचे रुग्णांनीही लक्षात ठेवावे.
संगीताच्या सुवर्णकाळातली हिंदी चित्रपट गीते खरोखरच अप्रतिम होती. त्यातल्या अनेक गाण्यांनी आपल्याला मनमुराद आनंद दिला आहे, आपलं धकाधकीचं जीवन सुसह्य केलंय यात शंकाच नाही. प्रतिभासंपन्न संगीतकारांनी आपल्या ओंजळीत टाकलेलं हे कुबेरधन आपण हृदयाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवलं असलं तरी ते आजारांवर उपचारक ठरूच शकत नाही. संगीतोपचारातील राग-आविष्काराचा फिल्मी ध्वनिमुद्रित आविष्काराशी काडीमात्रही संबंध नाही. जुन्या फिल्मी संगीतावर रागदारी प्रभाव असला तरी तेथला राग हा ‘प्युअर फॉर्म’मध्ये शक्यतो नसतोच. मुखडय़ातून डोकावणारा राग अंतऱ्यामध्ये दुसऱ्याच एखाद्या रागाच्या कुबड्या घेऊन कधी सामोरा येईल याची खात्री नसते. कारण ती चाल ही संगीतकाराने बांधलेली असते. संगीत संयोजकाने ते गाणं आपल्या सृजनतेने सजविलेलं असतं. वापरलेल्या अमुक रागाचं चलन आपसूकच आलेलं असतं किंवा केवळ औपचारिकता म्हणून भूमिका बजावत असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमातली नव्वद टक्के गाणी ही मुख्यतः ‘सिच्युएशन साँग्ज’ असतात. राग एकच असला तरी त्यातील भाव वेगवेगळे असतात (‘लागा चुनरी में दाग..’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात..’, ‘दो हंसो का जोडा..’ तिन्ही गाण्यांतला राग एकच. ‘भैरवी’! पण रूपडं वेगळं आहे की नाही?) इंटरनेटवरील माहितीनुसार, राग ‘मल्हार’ हा आत्यंतिक क्रोध, चिडचिडेपणा यावर चांगलाच परिणामकारक ठरू शकतो म्हणून तिथल्या माहितीप्रमाणे ‘मल्हार’ रागावर आधारित ‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए..’ हे गाणं दिवसातून दहावेळा ऐकणं फलदायी ठरणार आहे का?
संगीत हे मनाला, चित्तवृत्तींला शांत करते म्हणूनच संगीताचा उपयोग रोगनिवारणासाठी करता येतो. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे. तसेच आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मन:शांती मिळवून देणारं असत. संगीतात असणाऱ्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहेत.



























































