
>>विनायक सरदेसाई
खंडोबाचं खरं नाव काय होतं, मनी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं, खंडोबांचं आणि त्यांचं वैर काय होतं, खंडोबाचं मूळ गाव कोणतं, वंश कोणता, खंडोबाने दोन विवाह का केले, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे देणारी आणि खंडोबाचं बालपण उलगडून दाखवणारी मराठी साहित्यातली पहिली कादंबरी म्हणजे ‘खंडोबा’. पुराण ग्रंथ, साहित्य, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून आपण खंडोबाची कीर्ती अनुभवलेली आहेच. महाराष्ट्राच्या या कुलदैवतावर भाविकांची अफाट श्रद्धा असली तरी आजवर एकाही माध्यमातून खंडोबाच्या बालपणावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. नितीन थोरात लिखित ‘खंडोबा’ या कादंबरीतून आपल्याला खंडोबाच्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. खंडोबाचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातली ही पहिलीच कादंबरी ही या पुस्तकाची जमेची बाजू.
नितीन थोरात यांनी लिहिलेल्या ‘खंडोबा’मध्ये आपल्याला खंडोबाच्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष वाचायला मिळतो. आजवर महाराष्ट्राच्या कुलदैवताला आपण अवतार म्हणून गौरवलं. त्या अवताराची चौकट बाजूला करत लेखकाने देवत्व लाभलेल्या एका शूर योद्धय़ाच्या स्वरूपात आपल्यासमोर खंडोबा सादर केला आहे. त्यामुळे हा खंडोबा अधिक जवळचा आणि मानवी भावनांना स्पर्श करत आपलासा होऊन जातो.
कथेची सुरुवात कलियुगातल्या आदित्य नावाच्या एका मराठी चित्रपट दिग्दर्शकापासून सुरू होते. खंडोबावर चित्रपट करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर येतो आणि खंडोबाच्या आयुष्याचा उलगडा करण्याची त्याची धडपड सुरू होते. ही धडपड त्याला थेट खंडोबाच्या काळात घेऊन जाते आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. लेखकाने आदित्यच्या नजरेतून खंडोबा टिपला आहे. कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांची पद्धतशीर गुंफण केल्यामुळे ते अगदी तंतोतंत खरे आणि वास्तवदर्शी वाटतात. खंडोबाला मानवी अवतारात सादर केल्यामुळे त्याच्या भावनांशी जोडले जाणे वाचक म्हणून सहजशक्य होते. देव काहीही करु शकतो, पण माणूस हे कसं काय करू शकतो? असा प्रश्न वाचकांना पडतो आणि त्याचं उत्तरही मिळू लागतं. मग आपोआप लोकांनी जनपद बहाल केलेला एक शूर योद्धा कशा प्रकारे अनभिषिक्त सम्राट बनतो याची ‘खंडोबा’ ही कथा.
आपल्या घराच्या देव्हाऱयात असणार्या प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, पार्वतीपुत्र गणपती, अंजनीसुत हनुमान अशा सर्व देवतांना लहानपण आहे, पण देव्हाऱयासोबतच आपल्या मनाच्याही गाभाऱयात वसणाऱया खंडोबाला लहानपण नाही. तीच कमी भरून काढण्याचा प्रयत्न ‘खंडोबा’ या कादंबरीतून झाला आहे. खंडोबाच्या आयुष्यातले खाचखळगे जाणून घ्यायचे असतील तर ही कादंबरी नक्कीच प्रभावी ठरते.
खंडोबा
लेखक: नितीन थोरात
प्रकाशक: न्यू ईरा प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या: 328, किंमत: रुपये 320/-



























































