
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
आजकाल तरुणाईला सारं काही ‘इन्स्टंट’ हवं आहे हे कटुसत्य आपल्याला मान्य करावेच लागेल. मुलांमधले पेशन्स पटकन संपत चालले आहेत. ‘मला फाइव्ह जी वेगाने पाहिजे तो परिणाम मिळायलाच हवा’ या अपेक्षेनेच हल्ली मुलं कुठलेही काम हाती घेतात. मग तो त्यांचा अभ्यास असो की खेळ! त्यात त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला नाही तर त्या गोष्टी ते सोडूनच देतात. त्या गोष्टींसाठी करावी लागणारी मेहनत, चिकाटी आणि विश्वास या गुणांना त्यांच्याकडून सोडचिठ्ठी दिली जात आहे.
साधारण चार वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग. तेव्हा मी एका नामांकित शाळेत समुपदेशनासाठी म्हणून जात होते. त्या शाळेतील मुलं आणि माझं एक अनोखं नातं तयार झालेलं होतं. अभ्यासात मागे असणारी, द्वाड, अबोल, स्वतकडे लक्ष वेधून घेणारी, संतापी अशा आणि अशा प्रकारच्या अनेकविध मानसिक तसंच वर्तणुकीसंबंधित समस्या असणाऱया विद्यार्थ्यांना शिक्षक समुपदेशनासाठी पाठवत असत.
त्या शाळेतील असाच एक चुणचुणीत, हुशार, पण अभ्यासाच्या बाबतीत बराचसा बेफिकीर असा वेदांत (नाव बदलले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या वर्गशिक्षकांनी पाठवला होता. वेदांत हा वर्गातल्या टवाळखोर मुलांचा म्होरक्याच होता. शाळेत असताना तो वर्गात कमी आणि शिक्षा म्हणून वर्गाबाहेर जास्त असायचा. तो नववीत होता. अभ्यासाबाबतीत त्याची बेफिकिरी वाढतच होती. त्यातच भरीला म्हणजे वेदांत आता वयातही आला होता. त्यामुळे त्याचे ‘कूल डूड’ बनून राहणेही वाढत होते. गळ्यात शर्टाच्या आत लपवलेली जाड फॅशनेबल चेन व बोटात त्यालाच शोभेल अशी अंगठी.
वेदांतचे समुपदेशन चालू होते. त्याचे अभ्यासातले लक्ष दिवसेंदिवस उडतच चालले होते. एके दिवशी समुपदेशन चालू असता “मला दहावीची परीक्षा देण्यातही इंटरेस्ट राहिलेला नाही” असं तो बिनधास्तपणे म्हणाला. “का रे?” असं त्याला विचारताच “पुढे काय करणार एज्युकेशन घेऊन? आणि किती वर्षे शिकणार? पैसे कमवायला अजून त्यापुढे दहा-बारा वर्षे.”, “मग न शिकता तू पैसे कमावणार आहेस की काय?” असं त्याला छेडताच, “देअर यू आर मॅम, यू गॉट माय पॉइंट” असं तो आनंदाने ओरडला. त्याच्या डोळ्यांत विलक्षण चमक आली होती. “मॅम, तुम्हाला एक सांगायचं होतं.” वेदांत आता त्याचे फ्युचर प्लॅन्स सांगत होता. मॅम, माझ्या ओळखीत एक दादा आहे. तो स्वत त्याचे यूट्यूबवर व्हिडीओज बनवतो. त्यात त्याला भरपूर पैसे मिळतात. त्याचं चॅनल तुम्हाला दाखवू का?” असं म्हणत त्याने मला माझा मोबाइल उघडायला लावला. “डॅम्बिस पोरगा…! हे टाईप करा आणि पहा … किती व्हिडीओज आहेत बघा… वन थाऊजन्ड व्ह्युअर्स आहेत त्याचे.”
पुढे वेदांतने जवळ जवळ वीस मिनिटे त्या यूट्यूबर दादाचे गुणगान गायले. तो कसा दहावी फेल आहे, तरीही महिन्याला फक्त व्हिडीओ अपलोड करून लाखो रूपये कसे कमवतोय आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला कसं तो ट्रेनिंग देणार आहे या सगळ्याचं रसभरीत वर्णन त्याने सत्रामध्ये केलं. “दादाने मला सांगितलंय मॅम! तो म्हणतो, या लिखापढीत अर्थ नाही. त्यापेक्षा तू मला असिस्ट कर. तुला कुठच्या कुठे नेईन. त्याच्या ािढएटिव्ह टीममध्ये मी आता आहे. त्यानेच मला ही चेन आणि रिंग दिलीय.”
वेदांतवर त्याच्या ‘डॅम्बिस पोरगा’ दादाचा बराच पगडा होता. त्या यूट्यूबरला मिळणारी आभासी जगतातील प्रसिद्धी, पैसा आणि एकूणच त्याचे असणारे राहणीमान या सर्वांचा त्याच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे त्याने त्यांच्याप्रमाणे राहायला, वागायला सुरुवात केली होती. “दादा जर न शिकता एवढे पैसे कमावतोय आणि जर स्वतच्या पैशांतून बाईक घेऊ शकतोय, तर मी का नाही?” असा बिनधास्त आविर्भाव वेदांतने स्वतमध्ये आणला होता आणि त्याच्या देहबोलीतूनही तो आविर्भाव जाणवायचा. हे सगळं इतकं पुढे गेलं होतं की, वेदांत सहामाही परीक्षेत नापास झाला तरीही “हरकत नाही. नाहीतरी काय करणार शिकून? माझं लाईफ दादासारखं सेट आहे” अशा स्थितीत तो वावरत होता.
‘झटपट प्रसिद्धी आणि पैसा’ याचे वेदांत हे काही एकमेव उदाहरण नव्हे. सर्व काही झटपट मिळवण्याच्या नादात सवंग आदर्श बनवण्याच्या पिढीतील वेदांत हा प्रतिनिधी म्हणावा लागेल. या वेळेस ही केस लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे आज चार वर्षांनंतरही समुपदेशनासाठी पौगंडावस्थेतील मुलं-मुली किंवा तरुण-तरुणी येतात तेव्हा त्यांच्या समस्या या मुख्यत्वे ‘अपयशाची भीती’ (इाar द इaग्त्ल्rा), ताण आणि नैराश्य अशाच असतात. या समस्यांच्या खोलात जाऊन जेव्हा पडताळून पाहिलं जातं तेव्हा त्यांचं मूळ हे ‘अवास्तव अपेक्षा आणि स्वतच्या मर्यादांची नसलेली जाणीव’ यातच सापडतं.
आजकाल तरुणाईला सारं काही ‘इन्स्टंट’ हवं आहे हे कटुसत्य आपल्याला मान्य करावेच लागेल. मुलांमधले पेशन्स पटकन संपत चालले आहेत. ‘मला फाइव्ह जी वेगाने पाहिजे तो परिणाम मिळायलाच हवा’ या अपेक्षेनेच हल्ली मुलं कुठलेही काम हाती घेतात. मग तो त्यांचा अभ्यास असो की खेळ! त्यात त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला नाही तर त्या गोष्टी ते सोडूनच देतात. मग त्या गोष्टींसाठी करावी लागणारी मेहनत, चिकाटी आणि विश्वास या गुणांना त्यांच्याकडून सोडचिठ्ठी दिली जात आहे. हे सर्व गुण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आवश्यक आहेत. मात्र या गुणांचा अभाव (काही अपवादात्मक उदाहरणे वगळता) सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये पहायला मिळतो.
आदर्श त्यासाठीच बदलायला हवेत. खरं आणि आभासी, प्रसिद्धीपाठची मेहनत, ऊर्जा या सगळ्याची जाणीव आपणच या मुलांना करून गरजेचं आहे. तरच कधीतरी बदल होतील. शेवटी काय; सोशल मीडियाला यात दोष देऊन उपयोग नाही. कारण रिमोट आणि मोबाइल शेवटी आपणच ‘कंट्रोल’ करू शकतो, नाही का?
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)




























































