हरवलेलं संगीत (भाग 11) – सूर की गती मैं क्या जानू?

>> शिरीष कणेकर

मला एकदा लता मंगेशकरनं विचारलं होतं, ‘तुम्ही ओ. पी. वाले का?’ मला एकदा ओ. पी. नय्यरनं विचारलं होतं, ‘तुम लतावाले हो क्या?’ मला एकदा राजेश खन्नानं विचारलं होतं, ‘तू दिलीपकुमारवाला नं?’ मला एकदा नौशादनं विचारलं होतं, ‘तू अनिल विश्वासवाला वाटतं?’ मला अनिल विश्वासनं एकदा विचारलं होतं, ‘तू तलतवाला की मुकेशवाला?’…
या सगळय़ा प्रश्नांना आज एकरकमी, एकगठ्ठा उत्तर देऊन टाकतो. होय, मी ओ. पी. वाला, लतावाला, दिलीपकुमारवाला, अनिल विश्वासवाला, तलतवाला आणि मुकेशवालासुद्धा. ओ.पी. व लता यांच्यातून भलेही विस्तव गेला नसेल, पण माझ्या मनात दोघंही आरामात वस्तीला राहिले आहेत. ओ.पी.नं लताला एकही गाणं दिलं नाही म्हणून त्याच्या उज्ज्वल कारकीर्दीत काही उणीव राहिल्येय असं मला चुकूनही वाटत नाही अन् लता ओ.पी.कडे एकदाही गायली नाही म्हणून तिच्या अलौकिक कारकीर्दीला एक गालबोट लागलंय असंही कधी माझ्या मनात येत नाही. तलत की मुकेश असा एकच का निवडायचा मला कळत नाही. दोघांनाही माझ्या (व अनेकांच्या) मनात लाडाचं व मानाचं स्थान असू शकत नाही का? कितीही लतावाले (व लतामय) असलो तरी गाणाऱया अन्य कोकिळांचे व बुलबुलांचे आम्हाला यथायोग्य कौतुक नसावं का?

एका रेकॉर्डस् संग्रहकानं मला गाणी ऐकवण्याच्या बहाण्यानं घरी बोलावलं. मग अत्यंत खोचक व छद्मी आवाजात त्यानं मला विचारलं होतं, ‘‘शमशाद लावली तर चालेल ना?’’ मी दुखावलो गेलो. शमशादशी, सुरैय्याशी, गीता दत्तशी, खुर्शीदशी, नूरजहानशी, आशाशी माझं काय वैर होतं? मी तलत असतो तर तिथंच गायलो असतो, ‘किसी गरीब को घर में बुलाके लूट लिया’…

मला कळत नाही की खेडी दत्तक घ्यावीत त्याप्रमाणे माणसं कोणी एक संगीतकार, एक गायक, एक नायक दत्तक का घेतात? त्यांच्याबद्दल ब्र ऐकून घ्यायची तयारी नसते. आता दिलीपकुमार (आणि अर्थातच लता मंगेशकर) माझं सर्वस्व आहे. पण म्हणून तो तुम्हाला आवडत नसेल तर न का आवडेना. व्हॉट गोज ऑफ माय फादर? माझ्या बाचं काय जातंय? शारदा लतापेक्षा श्रेष्ठ गायिका आहे असं तुमचं ठाम मत असेल तर असेना का. तुम्हाला खोडून काढणं हे माझं काम नाही. फार तर दिवाळं वाजलेल्या तुमच्या अकलेची मी मनातल्या मनात कीव करीन. मुकेशविषयी तुम्ही चुकूनही बदसूर काढलात तर आजही लेग-स्पिनर चंद्रशेखर तुमचं दांडकंच काढेल…

तुम्हाला माहीत होतं का की ‘यहूदी’मधलं ‘ये मेरा दीवानापन है’ हे अजरामर गाणं आधी तलत गाणार होता. दिलीपकुमारनं तलतच्या नावाचा आग्रह धरला होता. शंकर-जयकिशनना मुकेश हवा होता. अखेर मुकेशच गायला व तो कसा गायला आपण जाणतोच. मुकेशनं त्याच्यासाठी ‘अनोखा प्यार’, ‘मेला’, ‘अंदाज’, ‘शबनम’ व ‘मधुमती’मध्ये एकापेक्षा एक भारी व गाजलेली गाणी गायलेली असताना ‘ये मेरा दीवानापन’ला मुकेशपेक्षा तलत अधिक न्याय देऊ शकेल असं दिलीपकुमारला का वाटलं असेल? आज त्या गाण्याची मुकेशशिवाय दुसऱया कोणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. तलतप्रमाणेच राजबिंडं व छाकटं रूप असल्यानं मुकेशलाही हीरो व्हायच्या भुतानं झपाटलं. तलतप्रमाणेच मुकेशनंही यात मार खाल्ला. ‘निर्दोष’, ‘दुखसुख,’ ‘आदाब अर्ज’, ‘थँक यू’ आणि ‘‘माशुका’ या चित्रपटांच्या अपयशानंतर मुकेशनं हीरोगिरीला ‘थँक यू’ म्हटलं. गाणं सोडून त्याला काहीच जमलं नाही. ‘मल्हार’ व ‘अनुराग’नंतर तो पुन्हा निर्मितीत उतरला नाही. ‘अनुराग’च्या अपयशानंतर त्यानं स्वतःतील संगीतकाराला मारलं (तेवढं ‘किसे याद रखू, किसे भूल जाऊ’ हे त्यानं स्वतःच गायलेलं ‘अनुराग’मधलं गाणं कसंही करून ऐका. मुकेश ऍट हिज स्वीटेस्ट ऍण्ड बेस्ट!) चित्रपट वितरणात उतरून त्यानं हात पोळून घेतले. गाण्यात मात्र तो अखेरपर्यंत आब राखून राहिला. रफी सर्व काही पादाक्रांत करीत होता तेव्हाही मुकेशचं संस्थान अबाधित होतं. कारण त्याच्या क्षेत्रात त्याला कोणाचीही भीती नव्हती, कोणापासूनही धोका नव्हता.

पंचेचाळीस साली मुकेशनं ‘पहली नजर’मध्ये अनिल विश्वासकडे गायलेले दरबारी रागातलं ‘दिल जलता है तो जलने दो’ हे त्याचं पहिलं चित्रपटगीत समजलं जातं. (पण वास्तवात आदल्या वर्षी मुकेशनं ‘उस पार’, चित्रपटात संगीतकार फिरोज निजामीकडे ‘जरा बोलो री’ हे द्वंद्वंगीत गायलं होतं. त्यापाठोपाठ ‘मूर्ती’ नावाच्या चित्रपटात खुर्शीदसह ‘बदरिया बरस गयी उस पार’ हे द्वंद्वगीत गायलं होतं.) किती तरी काळ ‘दिल जलता है’ सैगलनेच गायलंय असं लोक समजत होते. दस्तुरखुद्द सैगलही म्हणे चकला होता. ‘कधी गायलं होतं मी हे गाणं?’ असं त्यानं विचारल्याचं सांगतात.

सज्जाद सोडून मुकेश सर्व संगीतकारांकडे व मोतीलालपासून राजेश खन्नापर्यंत सर्व नायकांसाठी गायला. तो राज कपूरचा आवाज होता. त्याच्या आकस्मिक निधनानंतर भावूक झालेला राज कपूर म्हणाला, ‘‘आज माझा आवाज गेला.’’
चला, आपण आपला नेहमीचा आवडीचा खेळ खेळू या. मुकेशची मला सर्वात आवडणारी दहा गाणी निवडतो. एका संगीतकाराचं एकच गाणं बरं का. नौशाद (‘भूलने वाले याद न आ’, ‘अनोखी अदा’), एस. डी. बर्मन (‘चल री सजनी’,- ‘बबई का बाबू’) ही सुंदर गाणी खूप इच्छा असूनही घेता येत नाहीत याचा सल उरात आहे. ही घ्या माझी निवडः
(1) तेरी दुनिया में दिल लगता नहीं’-‘बावरे नैन’- रोशन. (2) ‘जीवन सपना टूट गया’- ‘अनोखा प्यार’- अनिल विश्वास. (3) ‘मुझे तुमसे कुछ भी न चाहिये’- ‘आवारा’- शंकर -जयकिशन. (4) ‘आँसू भरी है जीवन की राहें’- ‘परवरीश’- दत्ताराम. (5) ‘दो रोज में प्यार का आलम’- ‘प्यार की राहे’- कनू घोष. (6) ‘प्रीत लगाके मैने’- ‘आँखे’- मदन मोहन. (7) ‘किसे याद रख्खू’- ‘अनुराग’- मुकेश. (8) ‘कहाँ तक जफाए हुस्नवालों की सहते’- ‘तोहफा’- एम. ए. रौफ. (9) ‘वक्त करता जो वफा’- ‘दिल ने पुकारा’- कल्याणजी-आनंदजी. (10) ‘टूटेना दिल टूटेना’- ‘अंदाज’- नौशाद.

‘आ लौटके आजा मेरे मीत’ (‘रानी रुपमती’- एस. एन. त्रिपाठी) या गाण्यात ‘मेरा सूना पडा रे संगीत’ या ओळीतल्या ‘पडा’वर त्याचा आवाज चक्क फाटलाय. पण तिथंही तो कानांना गोडच लागतो. इतका की संगीतकाराला ही चूक सुधारून गाणं पुन्हा रेकॉर्ड करावंसं वाटलं नाही. हेच मुकेशचं वैशिष्टय़ होतं. त्याचे गुणच नाहीत तर त्याचे दोषही रसिकांनी स्वीकारले होते. सर्व गुणदोषांसकट कानसेनांनी त्याला छातीशी धरला होता. मुकेशच्या आवाजाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर? अवघड आहे. रफीचा आवाज कसा पहाडी, मन्ना डेचा कमावलेला, तलतचा मखमली, किशोरकुमारचा हरहुन्नरी, तसा मुकेशचा कसा? अनुनासिक हे वर्णन फार थिटं आहे. दर्दभरा हे वर्णनही मुकेशला पूर्ण न्याय देत नाही. त्याचं असामान्यत्व त्याच्या साध्यासुध्या गानशैलीत होतं, आवाजातील उपजत दर्दाला होतं की सिनेसंगीतातील अनेक स्थित्यंतरे पचवून रसिकांच्या मनावरील मोहिनी कायम ठेवण्याच्या किमयेत होतं सांगता येणार नाही. ‘सूर की गती मैं क्या जानू’ या त्याच्याच गाण्याच्या भावनेनं तो गायला व जगला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या